You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाशी लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली 'या' गोष्टींची मागणी
कोरोना लढ्यात राजकीय पक्षांनी कुठलंही राजकारण आणू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना समज द्यावी असं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 एप्रिल) दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरंसिंग) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
राज्यातील लशीच्या तुटवड्यावरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी "कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास महाविकास आघाडी सरकार कमी पडले", असा आरोप केला. यावरून राज्यातील नेते विरुद्ध केंद्र सरकार असा सामना दिवसभर रंगला.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता असं सांगत या मुद्यांवरून राजकारण होऊ देऊ नका अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
महाराष्ट्राला दर आठवड्याला 40 लाख लशींचा पुरवठा करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
केंद्र सरकारने मागणीनुसार लशींचा पुरवठा करावा तसंच ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर पुरावावेत, अशीही मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
हाफकिन संस्थेला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्राने लवकरात लवकर मान्यता द्यावी यामुळे लसीकरण वाढवता येईल, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात रुग्णसंख्या कशामुळे वाढली?
राज्यात आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यात 71 टक्के आरटीपीसीआर आणि 28 टक्के एंटिजेन चाचणी झाल्या आहेत. तरीही सरकारने चाचण्याचे प्रमाण वाढवावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका आणि लग्नसमारंभ अशा कार्यक्रमांमुळे कोरोनाची साथ वाढल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं.
ते म्हणाले, "मधल्या काळात तर संसर्गाची लाट आटोक्यात आणण्यात आम्हाला यश आले. महाराष्ट्रात त्यावेळी तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. विदर्भाच्या काही भागांतून अचानक विषाणूचा उद्रेक सुरू झाला. यात संपूर्ण कुटुंब संसर्गग्रस्त होऊ लागली."
"राज्यातील परिस्थिती सर्वसामान्य होत असतानाच विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढला. जगभरात हाच अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्रानेही काळजी घेतली पण तरीही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे," असंही ते म्हणाले.
यापुढे आरटीपीसीआर चाचण्या 70 टक्यांपेक्षा जास्त करु आणि लसीकरणाचा वेगही वाढवू पण यात केंद्र सरकारचे सहकार्य मिळावे असंही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं.
'मागणीनुसार लशीचा पुरवठा द्या'
महाराष्ट्राला दर आठवड्याला 40 लाख लशींचा पुरवठा करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राज्यात प्रधान्यक्रम गटातील जवळपास 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आत्तापर्यंत राज्याला 1 कोटी 6 लाख 23 हजार 500 डोस मिळाले आहेत. तसंच आजपर्यंत 92 ते 95 लाख डोस देण्यात आले आहेत.
मात्र, या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही लसीकरण केंद्र बंद पडली आहेत, अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली.
केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे 15 एप्रिलनंतर 17.43 लाख डोस देण्यात आले, तर लसीकरण मोहिमेत खंड पडेल त्यामूळे आमच्या मागणीप्रमाणे एकाचवेळी पूर्ण वितरण करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. 25 वर्षांपुढील सर्वाना लसीकरण करावे या मागणीचाही उल्लेख करण्यात आला.
ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणि रेमडेसिव्हीरचीही आवश्यकता
राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा अशीही मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. आताची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पहाता 1700-2500 मे.टन इतक्या ऑक्सीजनची मागणी एप्रिल अखेरपर्यंत असेल असा अंदाज आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा होणं ही निकड असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमडेसिव्हीरचा पुरवठा व्हावा आणि या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचे नियंत्रण असावे अशीही मागणी या बैठकीत राज्याकडून करण्यात आली.
महाराष्ट्रात रेमडेसिव्हीरच्या साधारण 50 ते 60 हजार बाटल्यांचा वापर सुरु आहे. सक्रिय रुग्णांची संख्या लक्षात घेता ही गरज एप्रिल अखेरपर्यंत प्रति दिन 90 हजार ते 1 लाख बाटल्या याप्रमाणे वाढू शकते.
अनेक ठिकाणी केवळ सिटीस्कॅन केलेल्या रुग्णाला रेमडेसिव्हीर दिले जात असल्याने आयसीएमआरने रेमडेसिव्हीरच्या वापरावर एक नियम तयार करावा तसंच या औषधाची निर्यातही थांबवावी अशीही मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
राज्यात आणखी 1200 व्हेंटीलेटर्स द्यावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आली. केंद्राकडून जे व्हेंटीलेटर्स मागवण्यात आले होते ते तांत्रिक कारणांमुळे बंद असल्याचं सांगण्यात आलं.
राज्य सरकारने हाफिकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. या परेल येथील संस्थेला कोव्हॅक्सिनचे उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकरात लवकर मान्य करावा जेणेकरून लशीचा पुरवठा होऊ शकेल असे निवेदनही उद्धव ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्रातील सविस्तर तपशील
- 1 मार्च 2021 पर्यंत राज्यात दर दिवशी 75 हजार चाचण्या होत होत्या. हीच संख्या गेल्या 3 दिवसांत 2 लाख पेक्षा जास्त चाचण्या एवढी झाली आहे.
- सध्या दररोज 1.25 लाख आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. 7 एप्रिल रोजी 2 लाख 35 हजार 749 एवढ्या चाचण्या राज्यात झाल्या यात 1 लाख 33 हजार 344 आरटीपीसीआर आणि 1 लाख 2 हजार 405 एन्टीजेनचा समावेश आहे.
- राज्यातील कोरोना रुग्णांमधील मृत्यूदर जानेवारी महिन्यात 1.69 टक्के, फेब्रुवारीमध्ये 0.82 टक्के, मार्च महिन्यात 0.37 टक्के इतका होता.
- 1 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीत 3 लाख 60 हजार 281 रुग्ण असताना मृत्यू दर 0.55 टक्के आहे.
- सध्या राज्यात 5 लाख 1 हजार 559 सक्रिय रुग्ण आहेत. 60 टक्के रुग्ण गृह विलगीकरण तर 40 टक्के संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
- 4.32 टक्के सक्रीय रुग्ण ऑक्सिजनवर आहेत तर 1 टक्के पेक्षा कमी रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
- राज्यातील कोरोना रुग्णांसाठी आयसोलेशन बेड्स सध्याच्या घडीला 80.51 टक्के एवढे भरले आहेत. संशयित रुग्णांसाठी 17.17 टक्के एवढ्या बेड्स भरल्या आहेत. ऑक्सिजन बेड्स 32.77 टक्के, आयसीयू बेड्स 60.95 टक्के भरल्या असून आताच्या घडीला 33.97 टक्के एवढे व्हेंटीलेटर्स लावले आहेत.
हेही वाचलंत का?
बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)