मुख्तार अन्सारी: भाजप नेत्याच्या हत्येचा आरोप असलेले अन्सारी का आले चर्चेत?

- Author, प्रियंका दुबे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
(बीबीसीच्या प्रतिनिधी प्रियंका दुबे 2019 मध्ये पूर्वांचलच्या 'बाहुबलीं'वर लेखमाला लिहिली होती. त्यावेळी बीबीसी हिंदीत प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद)
गुंडगिरीसाठी प्रसिद्ध असलेले आमदार मुख्तार अन्सारी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी पंजाबहून परत त्यांच्या राज्यात आणलं आहे. सध्या त्यांना बांदा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. अन्सारी यांना पंजाबहून उत्तर प्रदेशात आणलं गेल्याची बातमी गेले काही दिवस चर्चेत होती. कोण आहेत हे मुख्तार अन्सारी? त्यांची कहाणी काय आहे?
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल प्रांतात मऊ या मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मुख्तार अन्सारी यांची कहाणी जाडजूड पुस्तक भरेल इतकी लांबलचक आहे.
त्यांनी स्वतःच 2017 साली निवडणुकीवेळी जमा केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सध्या देशातील विविध न्यायालयांमध्ये त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र दंगलीला चिथावणी देणं, गुन्हेगारी कट रचणं, गुन्हेगारी धमक्या, मालमत्ता लुटण्यासाठी फसवणं, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, जाणीवपूर्वक इजा करणं, इत्यादींशी संबंधित 16 खटले सुरू आहेत.
एकेकाळी त्यांच्यावर मोक्का (महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्राइम कंट्रोल अॅक्ट) कायद्याखाली व गँगस्टर कायद्याखाली तीसहून अधिक खटले सुरू होते.
यातील काही महत्त्वाच्या खटल्यांमध्ये पुराव्यांची कमतरता, साक्षीदारांनी घेतलेली माघार व सरकारी वकिलांचा कमकुवतपणा यांमुळे अन्सारी यांना दोषमुक्त करण्यात आलं.
परंतु, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येसह इतर 16 गंभीर प्रकरणांशी संबंधित खटले मात्र अजून सुरू आहेत.

मुख्तार पहिल्यांदा 1996 साली बहुजन समाज पक्षाच्या (बसप) उमेदवारीवर निवडणूक लढवून उत्तर प्रदेश विधानसभेत पोचले. त्यानंतर सलग 2002, 2007, 2012 व 2017 या निवडणुकांमध्येही मऊ मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला. यातील शेवटच्या तीन निवडणुका त्यांनी देशातील विविध तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असताना लढवलेल्या आहेत.
या वृत्तलेखासंदर्भात मी पूर्वांचलमधील गाझीपूर जिल्ह्यातील मुख्तार अन्सारी यांच्या वडिलोपार्जित घरी गेले होते. पण तिथला वृत्तान्त सांगण्यापूर्वी मुख्तार यांच्या आयुष्याशी संबंधित तीन महत्त्वाचे संदर्भ नोंदवणं गरजेचं आहे-
गाझीपूरचा संदर्भ
गुन्हेगार, अफू आणि आयएएस अधिकारी असं सगळंच एकाच वेळी जन्माला घालणारा गाझीपूर जिल्हा कायमच पूर्वांचल प्रदेशातील गुंडगिरीचं मुख्य केंद्र राहिला आहे.
मुख्तार अन्सारी यांच्या राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमीमधील गाझीपूरचं महत्त्व सांगताना ज्येष्ठ पत्रकार उत्पल पाठक म्हणतात, "ऐंशी नि नव्वदच्या दशकांमध्ये गाजलेलं ब्रिजेश सिंह व मुख्तार यांच्यातील ऐतिहासिक टोळीयुद्ध गाझीपूरमधून सुरू झालं."

दोन नद्यांमधील सुपीक प्रदेशात गाझीपूर वसलेलं आहे. राजकीय पातळीवर पाहायचं तर एक लाखांहून अधिक भूमिहार समुदायाची लोकसंख्या असलेलं गाझीपूर शहर उत्तर प्रदेशातील भूमिहारांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांपैकी एक मानलं जातं. काही स्थानिक पत्रकार तर गाझीपूरला 'भूमिहारांचं व्हॅटिकन' असंही म्हणतात.
देशातील सर्वांत मागास भागांमध्ये गणला जाणाऱ्या गाझीपूर जिल्ह्यात विशेष काही उद्योगधंदे नाहीत. अफूचा व्यवसाय चालतो आणि हॉकीचा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. गाझीपूरमध्ये गुन्हेगारांची पैदास होत आली आहे आणि पूर्वांचलमधील टोळीयुद्धाचं हे केंद्र राहिलेलं आहे, पण विरोधाभासाची बाब म्हणजे याच जिल्ह्यातून अनेक मुलंमुली दर वर्षी आयएएस व आयपीएसच्या परीक्षांमध्ये यश मिळवत असतात.
पाठक म्हणतात, "मुख्तार अन्सारी व त्यांच्या कुटुंबाचा राजकीय प्रभाव काझीपूरपासून मऊ, जौनपूर, बलिया व बनारस इथपर्यंत आहे. केवळ 8-10 टक्के मुसलमानांची लोकसंख्या असलेल्या गाझीपूरमध्ये अन्सारी कुटुंबीय कायमच हिंदू मतपेढीच्या पाठबळावर निवडणुका जिंकत आले आहेत."
अन्सारी कुटुंबाचा संदर्भ
गाझीपूरमधील 'प्रथम राजकीय कुटुंब' म्हणून ओळखलं जाणारं अन्सारी कुटुंब या जिल्ह्याशी निगडित अनेक विरोधाभासांनाच पुढे नेणारं आहे.

फोटो स्रोत, Empics
गेली सुमारे 15 वर्षं तुरुंगवास भोगत असलेल्या मुख्तार अन्सारी यांचे आजोबा डॉक्टर मुख्तार अहमद अन्सारी स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींचे एक सहकारी म्हणून ओळखले जातात, आणि 1927 मध्ये चेन्नई ( तत्कालीन मद्रास) येथे झालेल्या भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.
मुख्तार अन्सारी यांचे आजोबा (आईचे वडील) ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान यांना 1947 सालच्या लढाईत हौतात्म्य प्राप्त झाल्याबद्दल महावीर चक्र देण्यात आलं होतं.
गाझीपूरमध्ये सद्गृहस्थाची प्रतिमा असलेले, कम्युनिस्ट पार्श्वभूमीचे सुभानउल्ला अन्सारी हे मुख्तार यांचे वडील स्थानिक राजकारणात सक्रिय होते. भारताचे माजी उप-राष्ट्रपती हमीद अन्सारी नात्याने मुख्तार अन्सारी यांचे काका आहेत.
मुख्तार यांचे थोरले भाऊ अफझल अन्सारी गाझीपूरमधील मोहम्मदाबाद विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा (1985 ते 1996) आमदार म्हणून निवडून गेले आहेत आणि 2004 साली ते गाझीपूरचे खासदार म्हणून निवडणूक जिंकले होते.
मुख्तार यांचे दुसरे बंधू सिबकातुल्ला अन्सारीही 2007 व 2012 या वेळच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोहम्मदाबादहूनच निवडून गेले होते.

फोटो स्रोत, Priyanka Dubey/BBC
मुख्तार अन्सारी यांना दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा अब्बास अन्सारी शॉट-गन शूटिंगमध्ये विक्रमवीर म्हणून ओळखला जातो. अब्बास यांनी 2017 साली मऊ जिल्ह्यातील घोसी मतदारसंघातून बसपाच्या उमेदवारीवर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, पण सात हजारांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.
मुख्तार यांचा धाकटा मुलगा उमर अन्सारी परदेशात शिकत असला, तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच त्याने राजकीय क्षेत्रात उतरून आपल्या वडिलांसाठी मऊ भागात प्रचार केला होता.
तर, या कुटुंबातून येणारे मुख्तार अन्सारी अनेक गुंडगिरीच्या प्रकरणांशी संबंधित खटल्यांमध्ये आरोपी असणं, हा गाझीपूरच्या अनेक विरोधाभासांचाच एक भाग आहे.
कृष्णानंद राय यांचा संदर्भ
गाझीपूरमधील मोहम्मदाबाद विधानसभा मतदारसंघावर 1985 पासून अन्सारी कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं होतं, पण 17 वर्षांनी, 2002 साली भाजपचे कृष्णानंद राय यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आणि अन्सारी यांचं वर्चस्व मोडून काढलं.
पण त्यांना आमदारकीचा कार्यकाळही पूर्ण करणं शक्य झालं नाही. तीनच वर्षांमध्ये त्यांचा खून झाला.

या खुनाची बातमी पूर्वांचलमध्ये वणव्यासारखी पसरली, असं या घडामोडींचं प्रत्यक्ष वार्तांकन केलेले ज्येष्ठ पत्रकार पवन सिंह सांगतात, "ते एका कार्यक्रमाचं उद्घाटन करून परत येत होते, तेव्हा त्यांच्या बुलेटप्रुफ टाटा सुमो गाडीच्या चारही बाजूने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. हल्ला करण्यासाठी निवडण्यात आलेलं ठिकाणही असं होतं की तिथून गाडीला डावीकडे किंवा उजवीकडे वळायला काहीच जागा नव्हती. कृष्णानंद यांच्यासोबत गाडीत एकूण सहा जण होते. या वेळी एके-47च्या एकूण 500 गोळ्या झाडण्यात आल्या. गाडीतील सातही लोक मरण पावले."
या हत्याकांडाचं वार्तांकन केलेले दुसरे एक ज्येष्ठ पत्रकार उत्पल पाठक सांगतात, "इथला कोणीही रहिवासी तुम्हाला सांगेल की, या 500 गोळ्या जीव घेण्यासाठी नव्हे तर विशिष्ट संदेश देण्यासाठी मारण्यात आल्या होत्या. तुमच्याच विधानसभा मतदारसंघात, तुमच्याच जातीची बहुसंख्या असलेल्या ठिकाणी, तुमच्याच बालेकिल्ल्यात, तुमच्या तथाकथित 'सेफ झोन'मध्ये येऊन आम्ही तुम्हाला मारू शकतो, असा संदेश मारेकऱ्यांना द्यायचा होता."
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गाझीपूरमधील आपलं परंपरागत वर्चस्व असलेला मतदारसंघ हातातून गेल्याने मुख्तार अन्सारी नाराज होते. कृष्णानंद राय हत्याकांडावेळी अन्सारी तुरुंगात असूनही या प्रकरणात त्यांचं नाव आरोपी म्हणून लावण्यात आलं.

फोटो स्रोत, Mail Today
या हत्याकांडाच्या दुसऱ्या एका परिणामाविषयी सांगताना पवन म्हणतात, "गाझीपूरमधील खासदार व सध्याच्या सरकारमधील मंत्री मनोज सिन्हा यांची राजकीय कारकीर्दच या हत्याकांडानंतर वेगाने उभी राहिली. या खटल्यामध्ये मनोज सिन्हा मुख्तार यांच्या विरोधातील साक्षीदार आहेत. कृष्णानंद भूमिहार होते आणि त्याच जातीतील सिन्हा यांनी राय यांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीडपणे लढणारा एकमेव नेता अशी प्रतिमा निर्माण करत मतं मागितली आणि ते निवडणूक जिंकलेही."
अन्सारी निवासस्थानाचा संदर्भ
गाझीपूरमधील यसुफपूर भागातील मुख्तार अन्सारी यांचं वडिलोपार्जित घर 'बडका फाटक' किंवा 'बडा दरवाजा' या नावाने ओळखलं जातं. या छोट्याशा शहरात 'बडका फाटक'चा पत्ता सर्वांनाच माहीत असतो, त्यामुळे त्यांच्या घरापर्यंत पोचायला काहीच अडचण आली नाही.
मी डिसेंबर महिन्यात गाझीपूरला गेले होते, तेव्हा मुख्तार यांची वयोवृद्ध आई आजारी होती. त्यांची शेवटची भेट घेण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य देशातील व जगातील विविध कानाकोपऱ्यांमधून तिथे आलेले होते.

फोटो स्रोत, Priyanka Dubey/BBC
मुख्तार बांदा तुरुंगात होते, पण त्यांचे थोरले बंधू अफझल अन्सारी व मुलगा अब्बास अन्सारी यांनी बीबीसीशी संवाद साधला. त्यानंतर काहीच तासांनी मुख्तार यांच्या आईचं निधन झालं.
मुख्तार अन्सारी यांच्या घराबाहेरचं 'मोठं फाटक' दिवसभर भेटीगाठी घेण्यासाठी येणाऱ्यांकरिता उघडं असतं. अंगणात गाड्यांचा ताफा होता, त्या समोर एक मोठी बसायची जागा होती, तिथे अनेक स्थानिक लोक अन्सारी बंधूंच्या भेटीची वाट बघत बसले होते. बैठकीच्या जागी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मुख्तार अहमद अन्सारी यांच्यापासून माजी राष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यापर्यंत कुटुंबातील सर्व राजकीय सदस्यांची छायाचित्रं व दिवंगत पूर्वजांची छायाचित्रं लावलेली होती.
मुलाखतीसाठी मला घराच्या पहिल्या मजल्यावर बोलावण्यात आलं. तिथे मोकळं छत असणाऱ्या जागी आम्ही खुर्च्यांवर बसलो. पांढरा कुर्ता-पायजमा, शाल व टोपी घातलेले अफझल अन्सारी त्यांच्या आईच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे अस्वस्थ होते, पण आगामी निवडणुकांबाबत त्यांनी मोकळेपणाने संवाद साधला.
राजनैतिक संधीचा संदर्भ
अफझल यांची राजकीय कारकीर्द कम्युनिस्ट पक्षातून सुरू झाली, तिथून ते समाजवादी पक्षात गेले, त्यानंतर त्यांनी 'कौमी एकता दल' या नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि 2017 साली बसपमध्ये प्रवेश करते झाले.

फोटो स्रोत, Priyanka Dubey/BBC
मुख्तार यांचा प्रवास बसपमधून सुरू झाला, त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवली, 2012 साली ते घरच्याच कौमी एकदा दलाचे उमेदवार म्हणून उभे राहिले, आणि 2017 साली हा पक्ष बसपमध्ये विलीन झाल्यावर पुन्हा बसपमध्ये आले. पूर्वी मुख्तार अन्सारी यांना 'गरीबांचा वाली' असा गौरव करणाऱ्या बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी 2010 साली अन्सारी बंधूंना 'गुन्ह्यांमध्ये सहभागी' असल्याच्या कारणावरून पक्षातून काढून टाकलं.
मुख्तार यांचा संदर्भ
तुरुंगात असलेले धाकटे बंधू, 58 वर्षीय मुख्तार यांच्याविषयी बोलताना अफझल म्हणाले, "मुख्तार माझ्याहून दहा वर्षांनी लहान आहेत. शालेय शिक्षण झाल्यावर ते इथेच गाझीपुरातल्या कॉलेजात शिकले. त्या कॉलेजात राजपूत-भूमिहार यांचं वर्चस्व होतं. तिथेच त्यांची मैत्री साधू सिंह नावाच्या मुलाशी झाली. मैत्रीखातर साधूच्या खाजगी भांडणांमध्येही मुख्तार सहभागी होऊ लागले आणि काही बाबतीत त्यांची कुप्रसिद्धी झाली."

फोटो स्रोत, Priyanka Dubey/BBC
खासदार राहिलेले अफझल अन्सारी पुढे सांगतात, "मुख्तारसोबत सगळ्या कुटुंबाचीच बदनामी झाली, पण मुख्तारविरोधातील हे सर्व खटले राजकीय हेतूने उभे करण्यात आलेले आहेत. ते 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. त्यांनी खरोखरच काही चुकीचं केलं असतं, तर पोलीस, सरकार, सीबीआय सगळंच दुसऱ्यांचं असतानाही गुन्हा सिद्ध कसा झाला नाही?"
मुख्तार यांच्या राजकीय प्रभावाविषयी बोलताना ते म्हणतात, "मुख्तार मऊ इथून निवडणुका लढवत आले आहेत आणि विजयी होत आले आहेत. राजकीय पातळीवर आमच्याहून मुख्तारची पत खूप जास्त आहे. त्याला प्रचंड वलय आहे. आज आम्ही गाझीपूरच्या बाहेर कुठेही गेलो, तरी आमची ओळख त्यांच्या नावाने करून दिली जाते."
अफझल म्हणतात, "गाझीपूरमध्ये केवळ आठ टक्के असलेले मुसलमान आम्हाला विजय मिळवून देऊ शकत नाहीत, इथले हिंदूही आम्हाला विजयी करत असतात. शेवटी आम्हीसुद्धा प्रत्येक सुखाच्या-दुःखाच्या क्षणी त्यांची साथ देत असतो. रोझे सुरू असतानाही आम्ही तोंडावर रुमाल बांधून इथे लोकांसोबत हत्तीवर बसून होळी खेळलो आहोत. हे सगळे आमचेच लोक आहेत, म्हणूनच आम्ही त्यांच्या मतांवर विश्वास ठेवून असतो."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)




















