पश्चिम बंगाल निवडणूक: 'मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार'

"मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार" डॉक्टरांचं निवडणूक आयोगाला पत्र

फोटो स्रोत, EPA

    • Author, प्रभाकर मणि तिवारी
    • Role, कोलकात्याहून बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"कोरोना काय आहे? कोरोना कुठेच नाही. कोरोना संपलाय."

पश्चिम बंगाल निवडणूक प्रचार रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने लोक सहभाग घेत आहेत. प्रचारसभा, रोड-शोमध्ये मास्क न घालता फिरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विचारा, बहुतांश लोकांकडून हेच उत्तर ऐकायला मिळतं.

राज्यातील एक वरिष्ठ नेते नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "सद्यस्थितीत आमच्यासमोर दुसरी लढाई आहे. कोरोनाविरोधातील लढाई दोन मे नंतर लढू."

देशभरात कोरोनाचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेण्याची अजूनही काही लोकांची तयारी नाहीये, असंच या वक्तव्यांवरुन दिसतं.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. त्याचसोबत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्यादेखील वाढतेय.

तज्ज्ञांच्या मते, पश्चिम बंगाल निवडणूक संपल्यानंतर राज्यात कोरोना संसर्गाचा नवीन रेकॉर्ड बनू शकतो. आठ टप्प्यातील मतदान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महागात पडू शकते.

सोशल डिस्टंसिंगचे नियम

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी प्रचार रंगात आलाय. हजारो, लाखोंच्या संख्येने लोक प्रचारसभा आणि रोड-शोमध्ये सहभाग घेत आहेत. पण, एकाच्याही तोंडावर मास्क नाही किंवा सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नाहीत.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ एप्रिलला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.

"मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार" डॉक्टरांचं निवडणूक आयोगाला पत्र

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC

पण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोना संसर्गाकडे लक्ष वेधताना निवडणुकीची चिंता व्यक्त केली आहे.

"कोरोना संसर्गाच्या नावाखाली मतदान स्थगित करणं आता कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही," असं त्यांनी म्हटलंय.

ममता बॅनर्जी म्हणतात, "देशात कोरोना संसर्ग फोफावतोय. अशा परिस्थितीत तीन किंवा चार टप्प्यात मतदान योग्य झालं नसतं? आठ टप्प्यात मतदान घेण्यात येतंय. आता मतदान रोखणं शक्य नाही. खेळ सुरू झालाय, त्यामुळे तो संपलाच पाहिजे."

ममता यांच्याविरोधात बंगालमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे, असं भाजपचे नेते सांगतात. भाजपचे नेते ममता यांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाहीत.

पश्चिम बंगाल भाजपचे महासचिव सायंतन बासू म्हणतात, "कोरोना संसर्गात बिहारमध्ये मतदान होऊ शकतं, मग, बंगालमध्ये का नाही? राज्यात निवडणुका थांबवण्यासारखी गंभीर परिस्थिती नाही. ममता बॅनर्जी फसवणूक करू शकत नाहीयेत. त्यामुळे अशी वक्तव्य करत आहेत."

काँग्रेस आणि सीपीएम नेते काय म्हणत आहेत?

कॉंग्रेस आणि सीपीएम नेत्यांनी राज्यात कोरोनाची परिस्थिती फार गंभीर नसल्याचं म्हटलंय.

सीपीएमचे नेते रबीन देब म्हणतात, "बंगालमध्ये निवडणूक रोखण्यासारखी कोरोना संसर्गाची स्थिती तुलनेने गंभीर नाही. मात्र, कोव्हिड-19 प्रोटोकॉल सर्वांनी पाळले पाहिजेत."

ममता बॅनर्जी आणि भाजप कोरोनाच्या मुद्यावरून राजकारण करत असल्याचा आरोप, कॉंग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी केला आहे.

"मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार" डॉक्टरांचं निवडणूक आयोगाला पत्र

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC

बंगालमधील डॉक्टरांची संघटना 'द ज्वॉइंट फोरम ऑफ डॉक्टर्स वेस्ट बंगाल' यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान नियमांची पायमल्ली होत असल्यावरून डॉक्टरांनी चिंता व्यक्त केलीये. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत असं अपील डॉक्टरांनी केलं आहे.

बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाने बनवलेल्या कोरोना प्रोटोकॉलचं बंगालमध्ये सर्व राजकीय पक्ष उल्लंघन करताना दिसत आहेत.

डॉक्टर आपल्या पत्रात लिहितात, "गृहमंत्री अमित शाह यांना मास्क घालून कधी पाहिलंय. पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोव्हिड-19 प्रोटोकॉलचं उल्लंघन करत असतील तर आम्ही काय करू शकतो?"

निवडणूक प्रक्रियेदरम्यान काय सुरू आहे ?

प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सुभाष दत्त निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सुनील अरोरा यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या कोव्हिड-19 प्रोटोकॉलच्या उल्लंघनावर निवडणूक आयोगाने न बोलणं चुकीचं आहे."

"मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार" डॉक्टरांचं निवडणूक आयोगाला पत्र

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC

प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ कुणाल सरकार सांगतात, "पश्चिम बंगाल निवडणुकादरम्यान कोव्हिड-19 प्रोटोकॉल लागू करण्यास निवडणूक आयोग असमर्थ राहिलाय. सर्व राजकीय पक्ष मास्क न घालता आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळता हजारो लोकांच्या उपस्थितीत रॅली करत आहेत."

पश्चिम बंगालसोबत देशातील इतर पाच राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. या राज्यातही कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.

आसाममध्ये तीन टप्प्यात 126 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर, इतर राज्यात सहा एप्रिलला मतदान झालं. मात्र, पश्चिमबंगालमध्ये पहिल्या तीन टप्प्यात फक्त 91 जागांवर मतदात झालंय. पाच टप्प्यात 29 एप्रिलपर्यंत 201 जागांसाठी मतदान होणं बाकी आहे.

आसाममध्ये मंगळवारी 92 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 683 झाली आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाचा ग्राफ

आसाममध्ये पाच एप्रिलला 70 तर, चार एप्रिलला 69 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. एप्रिल महिन्याचे आकडे पाहिले तर, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. या आधी सहा महिन्यात 420 कोरोना रुग्ण आढळून आले होते.

"मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार" डॉक्टरांचं निवडणूक आयोगाला पत्र

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदान करण्यासाठी पोहोचलेले कामरूख जिल्ह्यातील अलकेश डेका सांगतात, "कोरोना संसर्ग लक्षात घेता मतदान केंद्रांची संख्या वाढवली पाहिजे होती. जेणेकरून सर्व कोरोना प्रोटोकॉल योग्य पद्धतीने पाळले जातील. याठिकाणी लोक एकमेकांना चिकटून उभे होते."

तर, दुसरीकडे तामिळनाडूमध्ये सहा एप्रिलला एकाच टप्प्यात सर्व जागांसाठी मतदान झालं. मंगळवारी तामिळनाडूत 3645 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील 1303 कोरोना रुग्ण राजधानी चेन्नईमधील होते. राज्यात कोरोनाबाधित 15 रुग्णांचा मृत्यू झालाय.

निवडणूक प्रचारसभेत होणारी गर्दी

केरळमध्ये मंगळवारी 3502 कोरोना ग्रस्तांची नोंद करण्यात आली. यातील 360 केसेस कोळिकोडमध्ये तर 316 कोरोनाबाधित एर्नाकुलममध्ये आढळून आले.

"मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार" डॉक्टरांचं निवडणूक आयोगाला पत्र

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, "निवडणूक रॅली आणि प्रचारात होणारी गर्दी यामुळे कोरोना संसर्ग पसरल्याची शक्यता नाकारता येत नाही. या रॅलीमध्ये सोशल डिस्टंसिंगचं पालन झालं नाही."

पश्चिम बंगाल निवडणूकीत तृणमूल आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलाय. या सत्तासंघर्षात कोरोना संसर्ग राजकारणी आणि सरकारची प्राथमिकता राहिलेला नाही.

नवीन कोरोनाग्रस्तांची संख्या

तज्ज्ञ सांगतात, राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल येईपर्यंत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासूनच राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

"मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार" डॉक्टरांचं निवडणूक आयोगाला पत्र

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC

कोलकाता महापालिकेचे आरोग्य सल्लागार तपन मुखर्जी सांगतात, "कोरोना संसर्गाचा आलेख चढता राहिला तर, मे महिन्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन हजार पार करेल."

तज्ज्ञ काय सांगतात

कोरोनावर संशोधन करणारे आणि कोव्हिडग्रस्तांवर उपचार करणारे संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. अनिर्वाण दुलई सांगतात, "गेल्यावर्षी 24 मे ला 208 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती. रुग्णांची संख्या दहापट होण्यासाठी दोन महिन्यांचा काळ लागला. पण, आता एका महिन्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या दहा पट जास्त झाली आहे. या महिन्याअखेर कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवणं शक्य झालं नाही. तर, रुग्णांची संख्या सहा-सात हजारावर पोहोचेल."

मायक्रोबायोलॉजिस्ट भास्कर नारायण चौधरी म्हणतात, "कोरोना प्रोटोकॉलचं उल्लंघन, अजूनही लॉकडाऊन नाहीये. विना मास्क निवडणूक प्रचारात फिरणारे लोक आणि गर्दी ही कोरोनाचा संसर्ग तीव्र प्रमाणात पसरण्याची प्रमुख कारणं आहेत."

"आठ टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीमुळे दररोज राजकीय पक्षांच्या रॅली आणि सभा होत आहेत. प्रचारसभेत होणाऱ्या गर्दीत कोरोना नियमांचं पालन शक्य नाही. बहुतांश लोक विना मास्क फिरत असतात. अशा परिस्थितीत, दुसऱ्या लाटेचा पीक येणं अजून बाकी आहे," असं डॉ. दुलई म्हणतात.

"मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार" डॉक्टरांचं निवडणूक आयोगाला पत्र

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC

कोलकात्यातील इंन्स्टिट्युट ऑफ चाइल्ड हेल्थमध्ये असोसिएट प्रोफेसर असलेले प्रभाष प्रसून गिरी म्हणतात, "राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. कोरोना प्रोटोकॉल योग्य पद्धतीने पाळण्यात आले पाहिजे होते. सर्व नेत्यांनी सामान्यांना कोरोना प्रोटोकॉल पाळण्याची सूचना केली पाहिजे होती."

तज्ज्ञ सांगतात, निवडणूक आयोगाने प्रचार रॅलीत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या निश्चित केली पाहिजे. असं झालं नाही, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.

"मोदी-ममतांना कोरोनाची पर्वा नाही, आम्ही काय करणार" डॉक्टरांचं निवडणूक आयोगाला पत्र

फोटो स्रोत, PRABHAKAR MANI TEWARI/BBC

पण, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब म्हणतात, "सर्व राजकीय पक्षांना कोरोना संसर्गामुळे निर्माण होणारी परिस्थिती पाहाता, निवडणूक प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."

कोलकाता पोलिसांचे संयुक्त आयुक्त शुभंकर सिन्हा सांगतात, "आम्ही कोरोना प्रोटोकॉलच उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतोय. त्याचसोबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवत आहोत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)