You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पश्चिम बंगाल: 'निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या हूकूमाचा विकलांग ताबेदार' #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. निवडणूक आयोग मृत झाला आहे - सामना
पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने केंद्रीय निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे.
आसाम आणि पश्चिम बंगालमधील घटनांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाल्या. बिहारात तेजस्वी यादव यांचा पराभव घडवून आणला गेला व मतमोजणीच्या त्या अखेरच्या क्षणी निवडणूक आयोगाने डोळे आणि कान बंद करून घेतले असं लोकांच्या मनात आहे. आपल्या देशाचा निवडणूक आयोग मृत झाला आहे किंवा राज्यकर्त्या पक्षाच्या हुकूमाचा विकलांग ताबेदार बनला आहे असं 'सामनाच्या अग्रलेखात' म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाची गाडी बंद पडताच तेथे एक गाडी प्रकट झाली. ईव्हीएम नेण्यासाठी निवडणूक आयोगास दुसरी गाडी मिळू नये? या सर्व प्रकरणात निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपचा बुरखा फाटला आहे.
निवडणूक आयोग पक्षपाती आहेत हे सिद्ध करणाऱ्या घडामोडी दररोज घडत आहेत. हेमंत बिस्वा सरमा यांच्यावरील 48 तासांची बंदी 24 तासांवर आणण्यात आली. निवडणूक आयोगाच्या इतिहासातील ही काळी पानं आहेत. टी.एन.शेषन यांची पदोपदी आठवण यावी असं दुवर्तन सध्याच्या आयोगाकडून होत आहे.
निवडणूक आयोगाने तरी चिखलात अडकू नये. जी आदर्श आचारसंहिता देशाच्या रक्षणासाठी जिवंत केली ती एखाद्याच्या राजकीय स्वार्थासाठी जाळू नका असं अग्रलेखात म्हटलं आहे.
2. कोरोना काळात गरोदर महिलांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक
करोनाकाळात वेगवेगळ्या कारणांमुळे गरोदर महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली तसेच जन्मत: अर्भक मृत असण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून आले आहे.
'लॅन्सेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखातून ही बाब स्पष्ट झाली असून प्रामुख्याने भारतासह विकसनशील देशात गर्भवती महिलांचे करोनाकाळातील मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे 'लॅन्सेट'मधील प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे.
महाराष्ट्रातही संपूर्ण आरोग्य यंत्रणा करोना रुग्णोपचारात गुंतल्यामुळे गर्भवती महिलांचे मृत्यू अधिक झाल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
एकूण 17 देशांत 40 अभ्यासगटांनी याबाबत गोळा केलेल्या तपशिलातून करोनाकाळातील गर्भवतींचे जास्त मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बुधवारी 'लॅन्सेट'मधून ही बाब प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोनाबाधित गर्भवती महिला तसेच वेगवेगळ्या संसर्गाने आजारी असलेल्या महिला, त्यांचे मानसिक स्वास्थ्य तसेच त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यात आलेले अडथळे या सर्वाचा विचार या अभ्यासात करण्यात आला आहे.
गर्भवती असताना तसेच बाळंतपणाच्या काळात मेक्सिको व भारतात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. तसेच गर्भारपणाच्या काळात आणि बाळंतपणानंतर नैराश्य व चिंताग्रस्त होण्याचे महिलांमधील प्रमाण वाढल्याचे लेखात नमूद केले आहे.
3. जया बच्चन टीएमसीचा प्रचार करणार
पश्चिम बंगालच्या राजकारणात खासदार आणि चित्रपट अभिनेत्री जया बच्चन यांची एंट्री होणार आहे. जया बच्चन या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांच्या तृणमूल पक्षासाठी प्रचार करणार आहेत. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
टोलीगंजमधील तृणमूलचे उमेदवार अरुप विश्वास यांच्यासाठी जया बच्चन रोड शो करणार आहेत. अरुप यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना उमेदवारी दिली आहे.
तृणमूल काँग्रेसने निजेर मेयके चाय (बंगालला आपली कन्या हवी आहे) असा नारा दिला आहे. जया बच्चन या बंगालच्या कन्या आहेत असं सुब्रत मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
4. राजकारणाच्या आड येत असेल तर सिनेमा सोडेन- कमल हासन
राजकारण हेच आपलं जनसेवेचं माध्यम असल्याचं सांगत, जर सिनेमा त्यांच्या राजकीय करिअरच्या आड येत असेल तर राजकारण सोडण्यासाठी तयार असल्याचं कमल हसन यांनी म्हटलंय. सध्या तामिळनाडू विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारादरम्यान ते बोलत होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
"सिनेमा हा जर माझ्या राजकीय करिअरसाठी बाधा बनत असेल तर मी माझ्या हाती असलेले सिनेमे संपवून ते क्षेत्र सोडून देईन. राजकारणात आपलं येणं ऐतिहासिक आहे. कारण आपण त्या 30 टक्के लोकांमधील आहोत जे राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. दिवंगत मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांनी आमदार असताना आपल्या आदर्शांचा प्रचार करण्यासाठी आणि जनसेवेसाठी आपलं लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं," असं हासन यांनी सांगितलं.
माझे विरोधी उमेदवार म्हणतात की मी राजकारणातून गायब होईल आणि पुन्हा सिनेमामध्ये जाईल. पण मी पाहतो की कोण गायब होईल, ते तर जनता ठरवेल अशा शब्दांत हासन यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
5. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत मविआचा भाजपला धक्का
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मंत्री अशोक चव्हाण आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात चुरस होती. काँग्रेसच्या हाताला शिवसेना आणि राष्ट्रवादीचं बळ मिळालं आणि नांदेडच्या जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत 'मविआ'ला एकहाती सत्ता मिळाली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत बँकेवर सत्ता मिळवली. या निवडणुकीतही 'मविआ'चा फॉर्म्युला यशस्वी ठरला आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)