You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत : 'सोनिया गांधींऐवजी पवारांना UPA अध्यक्ष करा असं म्हटलं नाही' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) सोनिया गांधींऐवजी पवारांना UPA अध्यक्ष करा असं म्हटलं नाही - राऊत
यूपीए अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाचं समर्थन करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यानंतर यूटर्न घेतलाय. सोनिया गांधी यांच्याऐवजी पवारांना UPA अध्यक्ष करा असं आपण कधीही म्हटलं नसल्याचं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
"विरोधी आघाडी आणखी मजबूत होण्याची गरज आहे. यासाठी सर्व विरोधी दलांनी राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत महाआघाडी उभारण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यावर आपण जोर दिला," असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
तसंच, "मी केवळ महाआघाडी मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची कोणत्याही पद्धतीनं निंदा केली नाही," असंही राऊत म्हणाले.
शरद पवार यांना UPA अध्यक्ष करण्याबाबत गेल्या काही महिन्यात संजय राऊत सातत्यानं बोलत असताना, यावेळी मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राऊतांना धारेवर धरलं. त्यानंतर राऊतांनी यूटर्न घेतला आहे.
2) संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन होताच कामा नये - भाई जगताप
महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याच्या उपायाला काँग्रेसनं कडाडून विरोध केलाय. लॉकडाऊनला काँग्रेसचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडलीय. आपलं महानगरनं ही बातमी दिलीय.
भाई जगताप म्हणाले, "लॉकडाऊनच्या बाबतीत वेगवेगळे सूर आणि प्रवाह ऐकायला मिळत आहेत. पण काँग्रेसचे स्पष्ट मत आहे की, लॉकडाऊन होताच कामा नये."
"मागच्या लॉकडाऊनमध्ये जनतेने आयुष्यभर जे जमवलं होतं, ते वापरुन कसाबसा आपला संसार चालवला होता. पण आता जर पुन्हा लॉकडाऊन झाले, तर मात्र त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होतील. म्हणून लॉकडाऊन होताच कामा नये," असंही भाई जगताप पुढे म्हणाले.
3) ममता दीदी, दुसऱ्या जागेवरून अर्ज भरणार आहात का? - मोदी
पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट टक्कर असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काल (1 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नंदिग्राममधील विजयावर प्रश्न उपस्थित केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, "ममता दीदी, बंगालमधील जनता तुमच्यावर नाराज आहे आणि जनतेच्या संतापापासून तुम्हाला आता कुणीही वाचवू शकत नाही. नीट ऐका, बंगालची जनता आता तुम्हाला शिक्षा देणार आहे."
"शेवटच्या टप्प्यातील अर्ज भरणं अद्याप बाकी आहे. हे खरंय का, की तुम्ही दुसऱ्या जागेवरून अर्ज भरणार आहात?" असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
नरेंद्र मोदी यांनी उलुबेरिया इथल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं. झी न्यूजनं ही बातमी दिली आहे.
4) GST चं आजवरचं विक्रमी कलेक्शन
वस्तू व सेवा कर (GST) सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच विक्रमी कलेक्शन झालं आहे. मार्च 2021 या महिन्यात तब्बल 1.23 लाख कोटी इतकी रक्कम वस्तू व सेवा कराच्या मार्फत जमा झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिली. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
ही माहिती देत असताना अर्थमंत्रालयानं म्हटलं, कोरोनानंतर अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे हे संकेत आहेत.
मार्चमध्य जमा झालेल्या जीएसटीमध्ये केंद्राकडून 22 हजार 973 कोटी, तर राज्यांकडून 29 हजार 329 कोटी जमा झाले. तर 62 हजार 842 कोटी इंटिग्रेटेड जीएसटी जमा झाला आहे.
मार्च 2020 च्या तुलनेत मार्च 2021 चा जीएसटी 27 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आल्यानं अर्थमंत्रालयानं समाधानही व्यक्त केलं आहे.
5) कोरोनामुळे मनरेगाकडे तब्बल 11 कोटी लोक वळले
कोरोनाला रोखण्यासाठी 2020 च्या मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आला आणि विविध राज्यांमध्ये काम करणारे मजूर आपापल्या गावी परतले. मात्र, हाताला काम हवं म्हणून अनेकजण महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर काम करू लागले.
2020-21 च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात तब्बल 11 कोटींहून अधिक लोक मनरेगाअंतर्गत काम करू लागले. 2006-07 नंतर इतक्या मोठ्या संख्येत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येची नोंद झालीय. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
यापूर्वी 2010-11 मध्ये 5.5 कोटी लोक मनरेगाअंतर्गत काम करत होते. ही आजवरची विक्रमी आकडेवारी होती.
2019-20 च्या तुलनेत हीच आकडेवारी पाहता, 2019-20 या वर्षात 5.48 कोटी लोकांनी मनरेगाअंतर्गत काम केलं होतं. मात्र, 2020-21 या वर्षात हे सर्व विक्रम मोडत 11 कोटी 17 लाख लोकांनी मनरेगाअंतर्गत काम केल्याचं नोंदवलं गेलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)