कोरोना लस : भारतीयांच्या वाट्याची लस परदेशात पाठवली जाणार नाही - हर्षवर्धन #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. कोरोना लस : परदेशात पाठवली जाणारी लस भारतीयांच्या खर्चावर नाही - हर्षवर्धन

कोरोना व्हायरसवरची लस मोठ्या प्रमाणात भारतातून परदेशात पाठवली जात आहे. पण भारतीयांच्या वाट्याची लस परदेशात पाठवत नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलं आहे.

मंगळवारी (16 मार्च) राज्यसभेत बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.

सोमवारी एकाच दिवसात भारतात 30 लाख जणांचं लसीकरण करण्यात आलं. देशात आतापर्यंत 3 कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

या संपूर्ण मोहिमेत एक संतुलित नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) तसंच इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून काही नियम ठरवण्यात आले आहेत, असं डॉ. हर्षवर्धन म्हणाले.

आतापर्यंत भारतातून जगरातील 72 देशांमध्ये लस पाठवण्यात आली आहे. आपलं तंत्रज्ञान स्थानिक असलं तरी विज्ञान हे जागतिक आहे. त्यामुळे ही लस सर्वांना पाठवायलाच हवी. पण भारतीयांच्या तोंडचा घास काढून ती देता येणार नाही, असंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. ही बातमी द हिंदूने दिली.

2. सत्तेसाठी आणखी किती जणांना वाचवणार - देवेंद्र फडणवीस

सचिन वाझे यांच्या प्रकरणानंतर आता शर्जील उस्मानी प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

शर्जील उस्मानी यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल एक विधान केलं होतं.

यावरून, सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचवणार, असा सवाल फडणवीस यांनी ठाकरे यांना केलाय.

शर्जील उस्मानी प्रकरणावर फडणवीस यांनी सलग तीन ट्विट करून सरकारला प्रश्न विचारले.

"शर्जील उस्मानी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असेल, तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणू, असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत म्हटलं होतं. पण तो प्रत्यक्षात येऊन गेला. जबाब देऊन गेला. पण महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्ष काय केले, असं फडणवीस म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.

3. महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे 20 लाख डोस उपलब्ध करावेत - राजेश टोपे

महाराष्ट्रात प्राधान्यक्रमातील 1.77 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचा उद्देश ठेवला आहे. त्यासाठी 2.20 कोटी लशींची आवश्यकता आहे. यानुसार, दर आठवड्याला 20 लाख लसींचे डोस महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

आरोग्यमंत्री टोपे मंगळवारी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. यादरम्यान महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिली.

राज्यात 367 खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे. त्यापैकी 209 रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित रुग्णालयांना लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही राजेश टोपे यांनी केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

4. रस्तेसुद्धा राष्ट्रीय संपत्ती, त्यावर खासगी गाड्या धावत नाहीत का? - पीयूष गोयल

रस्ते हेसुद्धा देशाची राष्ट्रीय संपत्ती आहेत. पण रस्त्यांवर फक्त सरकारी गाड्या धावतील, असं कधी म्हटलं जातं का? रस्त्यांवर खासगी गाड्या धावत नाहीत का, असा प्रश्न केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे.

केंद्र सरकार रेल्वेचं खासगीकरण करणार असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. मंगळवारी (16 मार्च) लोकसभेत या विषयावर बोलताना पीयूष गोयल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं.

रेल्वेचं खासगीकरण करण्यात येईल, असं कधीच कुणी म्हटलं नाही. रेल्वेमध्ये खासगी गुंतवणुकीचं स्वागत केल्यास त्यामुळे सुविधांमध्ये सुधारणा होतील. रेल्वेचं संपूर्ण खासगीकरण कधीच करण्यात येणार नाही. ही एक सरकारी मालमत्ता आहे आणि ती सरकारीच राहील, असं गोयल म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली आहे.

5. नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी. के. सिन्हा यांचा राजीनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी. के. सिन्हा यांनी मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा आपण वैयक्तिक कारणामुळे देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सिन्हा हे उत्तर प्रदेशच्या कॅडरचे 1977च्या बॅचचे अधिकारी होते. कॅबिनेट सेक्रेटरी पदाहून निवृत्त झाल्यानंतर 11 सप्टेंबर 2019मध्ये सिन्हा यांची प्रमुख सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

सिन्हा यांनी 13 जून 2015 ते 30 ऑगस्ट 2019 पर्यंत ते मंत्रिमंडळ सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी विद्युत आणि जहाजबांधणी मंत्रालायचे सचिव म्हणून काम पाहिलं आहे. त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालायचे विशेष सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)