देवेंद्र फडणवीस: 'उद्धव ठाकरे सरकार राज्यातील सर्वांत लबाड सरकार' #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. 'उद्धव ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील लबाड सरकार'- देवेंद्र फडणवीस

"महाराष्ट्राच्या इतिहासात उद्धव ठाकरे सरकार एक लबाड सरकार म्हणून ओळखले जाईल," अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

"ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही अशी घोषणा सरकारने सभागृहात केली होती. पण आता सरकारने घूमजाव केला आहे. त्यामुळे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम ठाकरे सरकारने केलं," असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं.

ते म्हणाले, "सरकारची केवळ नौटंकी सुरू असून केवळ घोषणा करायच्या आणि माघार घ्यायची. यामुळे जनेतेचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे."

2. महाराष्ट्रात लॉकडॉऊनच्या निर्णयाबाबात काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडॉऊनचा निर्णय घेतला जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडॉऊन लागू करण्याची सरकारची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलंय. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.

"लॉकडॉऊन टाळायचे असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

काही जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले असल्याने संपूर्ण राज्यातही लॉकडॉऊन होणार का? याबाबत सामान्य जनतेतही संभ्रम होता.

@OfficeofUT

फोटो स्रोत, @OfficeofUT

मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने विविध ठिकाणी कर्फ्यू लागू केला आहे.

3. 'शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य' - राहुल गांधी

नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन आजही सुरू असून काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी "शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य आहे," अशी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

ते म्हणाले, "सरकारला हे कायदे मागे घ्यावेच लागतील. शेतकऱ्यांना मागे हटवणं अशक्य आहे. शेतकऱ्यांचे आणि पावसाचे जुने नाते आहे. ते वातावरणाचे कारण देत त्याला घाबरत नाहीत. त्यामुळे सरकारला कायदे मागे घ्यावेच लागतील."

राहुल गांधी

फोटो स्रोत, PTI

प्रियंका गांधी यांनीही यापूर्वी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली होती.

त्या म्हणाल्या, "संसदेत शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला. आंदोलनजीवी म्हणत त्यांचा अपमान केला गेला. माझ्यात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत मी लढणार. यासाठी 100 दिवस असो किंवा 100 वर्ष. गावागावात आंदोलन उभं करा. काँग्रेस तुमच्या पाठिशी आहे." असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केले."

4. 'मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरू द्या' - उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप कायम असून आरक्षणाला कोर्टात मान्यता मिळवून देण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी सरकार समोर आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

'मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला विष पिऊन मरू द्या' या मथळ्याखाली त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. यात आरक्षणासाठी एक कलमी कार्यक्रम हाती घ्या असं उदयनराजे यांनी सरकारला सुचवलं आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

उदयनराजे भोसले

फोटो स्रोत, Getty Images

"तातडीने मराठा आरक्षणाचा निकाल लावा. अन्यथा खुर्ची खाली करा," असा इशाराही त्यांनी ठाकरे सरकारला दिला.

आपल्या पोस्टमध्ये ते लिहितात, "मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही. सरकारच्या बैठकांमध्येही गांभीर्य नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा समाजातील तरुण निराशेच्या गर्तेत आहेत. हा प्रश्न सुटला नाही तर ते वेगळे पाऊल उचलू शकतात."

5. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर, संध्याकाळी सात नंतर दुकानं बंद राहणार

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. झी 24 तासने हे वृत्त दिलं.

ठाणे

फोटो स्रोत, Getty Images

बुधवारी (10 मार्च) कल्याण-डोंबिवलीत 392 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

दुकानांसोबतच खाद्यपदार्थांच्या गाड्यांनाही संध्याकाळी सात वाजेपर्यंतच परवानगी असणार आहे. लग्न आणि इतर सार्वजनिक समारंभांमध्ये नियमांचे पालन करा तसंच रात्री नऊपर्यंत कार्यक्रम संपवा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

बार आणि रेस्टॉरंट्स रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील तर होम डिलिव्हरीसाठी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)