गजानन मारणेला सातारा पोलिसांनी केली अटक #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) गजा मारणे याला सातारा पोलिसांनी केली अटक

गजानन मारणे उर्फ गजा मारणे याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गजानन मारणे पोलिसांना गुंगारा देत होता. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत गजा मारणेला बेड्या ठोकल्या. गजानन मारणे याच्यावर याआधी देखील खून, खुनाचा प्रयत्न, मोक्का असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्यांमधून त्याची सुटका झाली.

पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा मारणेनं साताऱ्यात प्रवेश केला होता. अनेक दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर साताऱ्यातील जावळी तालुक्यात त्याल पकडण्यात आलं.

गजानन मारणे याची 2014 सालच्या एका खुनाच्या गुन्हातून सुटका झाल्यानंतर त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून 15 फेब्रुवारी रोजी सोडण्यात आले. त्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आल्याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्यानंतर गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांवर तळेगाव दाभाडे आणि कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर मारणे आणि त्याच्या साथीदारांची सुटका केली. याच घटनेच्या अनुषंगाने आता वारजे माळवाडी आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

2) मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांमुळे आमचं नुकसान - नरेंद्र पाटील

मराठा आरक्षणावरून अण्णासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक चव्हणांमुळेच आमचं नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

अशोक चव्हाणांवर टीका करताना नरेंद्र पाटील म्हणाले, "अशोक चव्हाण यांना खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि विनायक मेटे यांच्यासह इतर समन्वयक वेळोवेळी भेटून सांगत होते. पण तरी गडी ऐकायलाच तयार नाही. आमचं खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांच्या योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झालंय."

"सभागृहात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल चर्चा केली. मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजित पवारांनी मराठा समाजाबद्दल एक शब्दही काढला नाही," आरोप नरेंद्र पाटील यांनी केला.

3) महाराष्ट्र सरकारविरोधात 20 हजार सभा घेणार - चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात 20 हजार छोट्या सभा घेणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

या सभांद्वारे व्यापक जनजागृती करणार असल्याचं सांगतानाच, चंद्रकांत पाटील म्हणाले, या सभांवेळी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं जाईल.

भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

"महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारांना बिनदिक्कत संरक्षण दिले जात आहे. तरुणीवर बलात्कार, तरुणींचे संशयास्पद मृत्यू या सारख्या गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची नावे थेटपणे घेतली जात आहेत. या मंत्र्यांना सरकारकडून संरक्षण दिले जात आहे," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

4) राम मंदिरासाठी जमा झाला सुमारे अडीच हजार कोटींचा निधी

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

तर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं की, "आता दारोदारी फिरून निधी गोळा करण्याची मोहीम थांबवण्यात आली आहे. ज्यांना अजूनही देणगी द्यायची आहे, त्यांनी ट्रस्टच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीनं द्यावी."

येत्या तीन वर्षात राम मंदिर उभारलं जाईल, असंही चंपत राय यावेळी म्हणाले.

"मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत," अशी माहितीही चंपत राय यांनी दिली.

5) मुख्यमंत्र्यांनी स्वखर्चानं एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी - राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन केलं. त्यावेळी त्यांनी नारायण राणेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. या टीकेला नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे.

नारायण राणे म्हणाले, "मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी." महाराष्ट्र देशानं ही बातमी दिली आहे.

"बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं. नाही तर लोक स्वत:साठी मेडिकल कॉलेज मागतात," अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)