जितेंद्र आव्हाड : 'नरेंद्र मोदींप्रमाणेच हिटलरनेही स्टेडियमला स्वत:चे नाव दिले होते' #5मोठ्याबातम्या

जितेंद्र आव्हाड

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. 'नरेंद्र मोदींप्रमाणेच हिटलरनेही स्टेडियमला स्वत:चे नाव दिले होते' - जितेंद्र आव्हाड

अहमदाबाद येथील क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली आहे.

"हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वत:चे नाव दिले होते," अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. टीव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 24 फेब्रुवारीला नरेंद्र मोदी स्टेडियमच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला.

यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते आणि गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मतं मागून थकल्यावर त्यांचे नाव असलेल्या स्डेडियमला स्वत:चे नाव दिले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही स्टेडियम बनवून त्याला स्वत:चे नाव दिले होते."

2. 'नरेंद्र मोदी सर्वात मोठे दंगाबाज' - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना 'दंगाबाज' म्हटल्यानंतर ममता बॅनर्जींनी 'नरेंद्र मोदीच सर्वात मोठे दंगाबाज असल्याचं' म्हटलं आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

मोदी और ममता बनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान ममता बॅनर्जींचा उल्लेख 'दंगाबाज आणि दैत्य' असा केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनीही नरेंद्र मोदींना 'दंगाबाज' म्हटलंय. मोदींची परिस्थिती अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभव झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही वाईट असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली.

पश्चिम बंगालमध्ये तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि तृणमूल काँग्रेस आमने-सामने असणार आहे.

3. पेट्रोल-डिझेलची किंमत निम्म्याने कमी करण्याचा 'हा' आहे पर्याय

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असताना पेट्रोलियम उत्पादनांना गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सच्या (GST) अंतर्गत घेतले तर ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. यासंदर्भात केंद्र सरकारही विचाराधीन आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तसे संकेत दिले असून जीएसटीचा सर्वोच्च दर पेट्रोलियम उत्पादनांना लागू केल्यास पेट्रोल-डिझेलची किंमत सध्याच्या तुलनेत कमी होऊ शकते.

पेट्रोल

फोटो स्रोत, Getty Images

पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आकारतं आणि राज्य सरकार व्हॅट आकारतात. यामुळे 35 रुपये मूळ किंमत असलेले पेट्रोल वेगवेगळ्या राज्यांत 90-100 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहचलं आहे.

पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश जीएसटी अंतर्गत झाला तर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एकसारख्या असतील. जीएसटी परिषदेने कमी टक्केवारीचा पर्याय निवडल्यास या इंधनांच्या किमती कमी होऊ शकतात.

4. ...तर चार लाख नव्हे चाळीस लाख ट्रॅक्टरसह संसदेला घेराव घालणार - राकेश टिकैत

दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरू असून केंद्र सरकारसोबत सुरू असलेल्या चर्चेच्या फेऱ्या अपयशी ठरत आहेत.

कृषी कायदे मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी नेते ठाम आहेत. कृषी कायदे मागे न घेतल्यास संसदेला घेराव घालू असा इशारा आता शेतकरी संघटनांचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

राकेश टिकैत

फोटो स्रोत, Getty Images

संसदेला घेराव घालताना चार लाख नव्हे तर चाळीस लाख ट्रॅक्टर येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांनाही त्यांनी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

राजस्थान येथील सिकर येथे आयोजित केलेल्या किसान महापंचायतीत बोलत असताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला हा इशारा दिला आहे.

5. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महाराष्ट्रासह सहा राज्यात केंद्रीय पथकं दाखल

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय पथकं महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

कोरोना टेस्ट

फोटो स्रोत, Sopa images

कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय पथकं आता राज्य सरकारला मदत करणार आहेत. केंद्राच्या तीन सदस्यीय पथकांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पदावरील अधिकाऱ्यांचा आणि विविध तज्ज्ञांचा समावेश आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळ, गुजरात, पंजाब आणि जम्मु काश्मिरमध्ये ही पथकं विशेष लक्ष देणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

"ही पथकं राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील यंत्रणांसोबत मिळून काम करतील. कोरोना रुग्णसंख्या अचानक का वाढते आहे याचाही शोध घेतला जाईल. ही पथकं कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य आणि केंद्रातील आरोग्य यंत्रणांना मदत करतील," अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)