उद्धव ठाकरे संजय राठोड यांना पाठिशी घालून काय साध्य करत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांवर गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप करण्यात आले. संबंधित प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाले. पण उद्धव ठाकरे सरकारने आपल्या मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप केलेली नाही.
भारतीय जनता पार्टीकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
तरीही उद्धव ठाकरे सरकार आपल्या मंत्र्यांवर कारवाई का करत नाहीत? धनंजय मुंडे यांच्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांना अभय देत महाविकास आघाडी सरकार कोणता संदेश देऊ पाहत आहे? आणि यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा डागाळली आहे का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.
दबावाचे राजकारण?
वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन घेत असताना केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्यू मोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Facebook
"पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय," असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
याप्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सरकारवरही टीका केली जातेय.
राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "मोठा समाज संजय राठोड यांच्या मागे आहे. त्यांनी नुकतेच त्यासाठी शक्तीप्रदर्शनही केले. त्यामुळे शिवसेनेला बंजारा समाज आपल्यापासून दुरावेल अशी भीती आहे.
राजकीयदृष्ट्या कारवाई करत असताना जनाधाराचा विचार प्राधान्याने करावा लागतो. मराठवाड्यात ओबीसींच्या जीवावर शिवसेना वाढली. त्यामुळे राजकीय जनाधाराला धक्का पोहचवण्यापूर्वी विचार करून निर्णय घ्यावा लागतो."

फोटो स्रोत, NiteshRaut
महाविकास आघाडी सरकार तीन पायांचे अशक्त सरकार आहे अशी टीका भाजप सत्तास्थापनेपासून करत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवरही विविध आरोप भाजपकडून करण्यात आले.
संजय राठोड आणि धनंजय मुंडे प्रकरणातही भाजपने ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे गंभीर आरोप झालेल्या मंत्र्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. पण सरकारने सत्तास्थापनेपासून आपल्या एकही मंत्र्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.
राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "असे मंत्र्यांचे राजीनामे मागितले तर आमदार फुटू शकतात ही भीती सरकारला असावी. तसंच मंत्री दोषी आढळल्याशिवाय कारवाई होऊ नये असा आमदारांचा दबाव असू शकतो."
धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या मंत्र्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे शिवसेना कारवाई करते अशी भावना पक्षांतर्गत निर्माण होऊ शकते,"

फोटो स्रोत, FACEBOOK/DHNANJAY MUNDE
"तातडीने संजय राठोड यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. याचे तात्कालिक कारण म्हणजे 1 मार्चापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यात अध्यक्ष पदाची निवडणूक होऊ शकते. कोरोनामुळे काही आमदार उपस्थित राहू शकले नाही तर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी होऊ शकते अशीही भीती असावी," असं नानिवडेकर सांगतात.
राजीनामे मागण्याचा 'ट्रेंड' होण्याची भीती?
महाविकास आघाडी हे तीन पक्षांचे सरकार असल्याने अनेक आव्हानं आहेत. विरोधक आक्रमक असल्याने विविध मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न होत असतो.
"संजय राठोड किंवा धनंजय मुंडे प्रकरणात राजीनामा घेतल्यास भविष्यात महिलांसंदर्भात इतर मंत्र्यांवरही असे आणखी आरोप समोर आले तर प्रत्येक प्रकरणात राजीनाम्याचा नियम लावावा लागेल ही भीती सुद्धा सरकारला आहे," असं संदीप प्रधान सांगतात.

फोटो स्रोत, EPA
यापूर्वीही राज्यातील बड्या नेत्यांवर महिलांसंदर्भात विविध आरोप झाले आहेत. अनेक नेत्यांना यामुळे पदावरून हटवण्यात आले. पण पुढे जाऊन असे आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत.
मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "त्यामुळे असे राजीनामे घेतल्यास विरोधकांकडून इतर मंत्र्यांवर सुद्धा आरोप करण्यात येऊ शकतात. किंवा महिलांकडूनही असे आरोप झाल्यास मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागतील आणि हा एक 'ट्रेंड' होईल असाही विचार सरकार करत असावे."
आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अनेक नेत्यांना राजीनामे द्यावे लागले. त्यावेळी एखाद्या मंत्र्यावर आरोप झाला तरी काहूर उठायचे. पक्षाचे प्रतिमा खराब व्हायची आणि नैतिकतेच्या आधारावर राजीनामे मागितले जात होते.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राजीनामा घेतला तरी संबंधित नेत्याची किंवा मंत्र्याची राजकीय उपयुक्तता संपत नाहीत. आता पक्षाचे धोरणही बदलले आहे. नितिमत्तेची व्याख्या बदलली आहे. रेल्वेचा अपघात झाला म्हणून पूर्वी माधवराव शिंदेंना राजीनामा द्यावा लागला होता. आता कोणी या कारणासाठी राजीनामा देत नाही."
महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणातही कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते. आता संजय राठोड प्रकरणातही चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिपदावरून हटवावे असं त्यांचं मत असल्याचं समजतं.

फोटो स्रोत, TWITTER/@SHIVSENA
मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "उद्धव ठाकरे यांची आतापर्यंतची प्रतिमा ही चांगली आहे. पण धनंजय मुंडे, संजय राठोड अशा प्रकरणांमुळे या प्रतिमेला फटका बसू शकतो."
पण सरकार कारवाई करत नाही म्हणून नाराज होणारा वर्ग कोणता आहे? हा विचार सुद्धा राजकीय पक्ष करत असतात असं राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सांगतात.
"शहरी मध्यमवर्गीय मतदार सरकारवर नाराज होऊ शकतो. अशा मंत्र्यांवर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी असू शकते. पण हा मतदारवर्ग कोणत्या पक्षाचा आहे? याचाही विचार होत असतो,"असंही ते सांगतात.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

फोटो स्रोत, Instagram
महाविकास आघाडीतील एका मंत्र्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केली होती.
"यासंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई होईल. सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतंय. असंही होता कामा नये आणि कोणावर अन्यायही होता कामा नये," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
संजय राठोड यांचे स्पष्टीकरण
"गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमं असेल किंवा समाजमाध्यमं असतील, अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची कृपया बदनामी करू नका," असं संजय राठोड यांनी मंगळवारी (23 फेब्रुवारी) पोहरादेवी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

फोटो स्रोत, facebook
"मी गायब झालो नव्हतो. माझे आई-वडील आहेत, मुलबाळं आहे , पत्नी आहेत. त्यांना मी सांभाळत होतो. मुंबईच्या ऑफिसमधूनही माझं काम सुरू होतं. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी होईल असं म्हटलं आहे. चौकशी, तपास सुरू आहे. तपासानंतर सत्य बाहेर येईलच," असं संजय राठोड यांनी म्हटलं.
"आमच्या समाजातील तरुणीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला, त्याचं आमच्या सर्वच समाजाला दुःख झालं आहे, या घटनेवरून केलं जाणारं राजकारण हे मात्र घाणेरडं आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, या गोष्टीत कोणतंही तथ्य नाहीये," असा दावा त्यांनी केला.
"सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. मी तीस वर्षं सामाजिक जीवनात वावरणारा कार्यकर्ता आहे. अनेक जण भेटतात. फोटो काढतात," असं स्पष्टीकरण त्यांनी व्हायरल झालेल्या फोटोबाबत दिलं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
























