शरद पवार संजय राठोड प्रकरणी नाराज? #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. संजय राठोड प्रकरणी शरद पवार नाराज?
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड हे मंगळवारी (23 फेब्रुवारी) पोहरादेवी इथं दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी या सर्व प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.
संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला होत असल्याचं शरद पवार यांचं मत असल्याचं एबीपी माझानं आपल्या बातमीत म्हटलं आहे.
तपास पूर्ण होईपर्यंत वनमंत्री संजय राठोड यांनी पदापासून दूर राहावं, अशी शरद पवार यांची भूमिका असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
2. मंत्रालयाच्या वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारितीने बसवता येतील तसंच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल, याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना मंगळवारी (23 फेब्रुवारी) झालेल्या बैठकीत दिल्या.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. 'कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं मी नीती आयोगाच्या बैठकीत सांगितले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी,' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, आपण नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू, ज्यामध्ये कामं पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील तसंच कोरोना संसर्गाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वाना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावं.
3. सांगली जिंकली, आता सगळीकडे भाजपला धोबीपछाड देऊ- वर्षा गायकवाड
सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेत महाविकास आघाडीचे महापौर आणि उपमहापौर निवडून आले आहेत. या विजयावर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/VARSHA GAIKWAD
सांगली जिंकली आता सगळीकडे भाजपला धोबीपछाड देऊ, असा प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत 78 जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप- 41, अपक्ष- 2, काँग्रेस- 20 आणि राष्ट्रवादी-15 असं होतं. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा तीन मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं, तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
4. कोरोना महाराष्ट्रातच का वाढतोय याचा सरकारनं विचार करावा- देवेंद्र फडणवीस
कोरोनाविरुद्ध लढाई आपल्या सर्वांनाच लढाई लढायची आहे, मात्र कोरोना महाराष्ट्रात का वाढत आहे याचाही विचार सरकारनं करावा, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बंगालमधील विधानसभा निवडणुकांसाठी ते प्रचार करत आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्याबद्दल बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की, यापूर्वीही महाराष्ट्रातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रातच झाले होते.
कोरोनाची दुसरी लाटही महाराष्ट्रात जाणवत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात सरकार कमी पडतंय का, याचा विचार आपण करायला हवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दुसरा लॉकडाऊन हा उपाय असू शकत नाही, पण नियमांचं पालन आपण सर्वांनीच करायला हवं, असंही त्यांनी म्हटलं.
5. सीमेवरील तणावानंतरही चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार
भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून चीनने पुन्हा एकदा आपले स्थान परत मिळवले आहे. 2020 मध्ये सीमावादामुळे भारत आणि चीनमधील संबंध चिघळले. केंद्रातल्या मोदी सरकारने चीन बरोबर व्यापार कमी करण्यासाठी पावले उचलली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जून-जुलैमधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी वस्तुंचा बहिष्कार करुन, स्वदेशीचा नारा देण्यात आला. पण प्रत्यक्षात व्यापारावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. 2020 मध्ये दोन्ही देशांमध्ये 77.7 अब्ज डॉलर्सचा व्यवहार झाला.
भारताच्या व्यापार मंत्रालयाच्या डाटावरुन हे चित्र स्पष्ट झाले आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये भारत-चीन व्यापारात काही प्रमाणात घट झाली आहे. 2019 मध्ये 85. 5 अब्ज डॉलर्सचा व्यवहार झाला होता. 2020 मध्ये भारत आणि अमेरिकेत 75.9 अब्ज डॉलर्सचा व्यवहार झाला.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























