IPL Auction : शाहरूख खान आणि मोहम्मद अझरुद्दीन आयपीएल लिलावात बाजी मारणार?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आयपीएल लिलावात शाहरुख खान आणि मोहम्मद अझरुद्दीन ही नावं ऐकायला मिळाली तर गोंधळून जाऊ नका. तसं अगदीच होऊ शकतं. कारण या नावांचे दोन खेळाडू देशांतर्गत ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत.

लिलावात त्यांच्याकडे संघांचं बारीक लक्ष असणार आहे. या दोघांसह कोण आहेत युवा भारतीय खेळाडू जे लिलावात कोटीच्या कोटी उड्डाणं करू शकतात.

मोहम्मद अझरुद्दीन

देशातली सगळ्यांत मोठी ट्वेन्टी-20 स्पर्धा म्हणजे सय्यद मुश्ताक अली स्पर्धा. काही दिवसांपूर्वीच ही स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत केरळच्या मोहम्मद अझरुद्दीनने मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईविरुद्ध खेळताना 37बॉलमध्ये शतकाला गवसणी घातली.

या स्पर्धेतल्या सगळ्यांत वेगवान शतकाची अझरुद्दीनने बरोबरी केली. या स्पर्धेत केरळच्या बॅट्समनने साकारलेली ही पहिलीच शतकी खेळी आहे. 1994 मध्ये जन्मलेल्या अझरुद्दीनचं नाव त्याच्या मोठ्या भावाने कामरुद्दीन असं ठेवलं.

कामरुद्दीनसाठी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आदर्श होता. सीनियर अझरुद्दीन यांच्या मैदानावरील कामगिरीची पुनरावृत्ती ज्युनियर अझरुद्दीन आतूर आहे.

शाहरुख खान

आयपीएल स्पर्धेसाठी शाहरूख खान हे नाव नवं नाही. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक आहे. कोलकाताच्या मॅचवेळी तो अनेकदा उपस्थित असतो.

यंदाच्या हंगामात मैदानावर शाहरुख खानला पाहायला मिळू शकतं. तामिळनाडूतर्फे खेळणाऱ्या शाहरुख खानने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत आपल्या फटकेबाजीने प्रभावित केलं आहे आणि संघाला विजयही मिळवून दिले आहेत.

हिमाचल प्रदेशविरुद्ध शाहरुखने 19 बॉलमध्ये 40 रन्सची खेळी केली होती. याआधी शाहरुखला आयपीएल संघांनी नाकारलं आहे. मात्र यंदाच्या लिलावात शाहरुखसाठी आयपीएलचे दरवाजे उघडू शकतात.

विष्णू सोळंकी

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बडोद्याने फायनलमध्ये धडक मारली. यामध्ये विष्णूचा वाटा मोलाचा आहे. हरियाणाविरुद्ध विष्णूने मॅचच्या शेवटच्या बॉलवर हेलिकॉप्टर शॉट लगावत बडोद्याला थरारक विजय मिळवून दिला.

फायनलमध्ये बडोद्याची अवस्था 36/6 अशी झाली होती, पण विष्णूने 55 बॉल 49 रन्सची खेळी केली आणि त्यामुळेच बडोद्याला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. महेंद्रसिंग धोनीने हेलिकॉप्टर शॉटची निर्मिती केली होती. विष्णूने धोनीला हा फटका मारताना पाहून शिकल्याचं मॅचनंतर सांगितलं होतं.

केदार देवधर

दीपक हुडावर शिस्तभंगाची कारवाई आणि वडिलांच्या निधनामुळे कृणाल पंड्या घरी परतल्याने बडोद्याची सूत्रं केदार देवधरकडे सोपवण्यात आली. गेली अनेक वर्ष बडोद्यासाठी नियमितपणे रन्स करणारा हा अनुभवी शिलेदार आहे.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत केदारने 8 मॅचेसमध्ये 349 रन्स केल्या. केदार डेक्कन चार्जर्स संघाचाही भाग होता. केदारचा अनुभव लक्षात घेता लिलावाच्या वेळी संघ त्याच्याकडे लक्ष ठेवून असतील.

ल्युकमन मेरिवाला

बडोद्यासाठी खेळणाऱ्या ल्युकमन मेरिवालाने आयपीएलच्या लिलावापूर्वी दमदार प्रदर्शन करत लक्ष वेधून घेतलं आहे. रन्स रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्या मेरिवाला उत्तम प्रकारे सांभाळतो.

आशुतोष अमन

बिहारच्या या डावखुऱ्या स्पिनरने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत विकेट्स घेतल्या. विकेट टू विकेट बॉलिंग करण्यात पटाईत आहे. आयपीएल संघांना चांगल्या स्पिनरची आवश्यकता आहे. त्यामुळे अमनकडे लिलावात लक्ष असेल.

पुनीत बिश्त

पुनीत बिश्त गेली अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेट खेळतो आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मिझोरमविरुद्ध पुनीतने 51बॉलमध्ये 146रन्सची तडाखेबंद खेळी केली. मेघालयाकडून खेळतान पुनीतने ही खेळी साकारली होती.

या खेळीत 6 चौकार आणि 17 षटकार लगावले. एका ट्वेन्टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकारांच्या ख्रिस गेलच्या विक्रमाची पुनीतने बरोबर केली. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतली ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.

पूर्वी दिल्लीकडून खेळणाऱ्या पुनीतने चांगल्या संधीच्या शोधात मेघालय गाठलं. दिल्लीला विकेटकीपर बॅट्समनची आवश्यकता आहे. पुनीत हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)