नसिरुद्दीन शाह : 'यांनी' सात पिढ्या बसून खातील एवढं कमवलं आहे...#5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या 5 बातम्या
1) गप्प बसणाऱ्या कलाकारांवर नसिरुद्दीन शाह भडकले
शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी बॉलीवूड कलाकारांना चांगलंच सुनावलं आहे. शेतकरी आंदोलनावर देशात चर्चा सुरु असताना बॉलीवूड अभिनेते मात्र यावर मौन बाळगून गप्प आहेत अशी टीका नसिरुद्दीन शाह यांनी केली आहे.
दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नसिरुद्दीन शाह यांनी पाठिंबा दिला आहे.
स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नसिरुद्दीन शाह यांनी मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
"जर काही मत व्यक्त केलं तर, तो खूप काही गमावू शकतो. या लोकांनी इतका पैसा कमावला आहे की, त्यांच्या पुढील सात पिढ्या बसून खातील, तर तुम्ही किती गमावाल? अशा तीव्र शब्दात शाह यांनी कलाकारांना सुनावलं आहे.
लोकमत या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
2) भाई जगतापांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यावर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी हल्लाबोल केला आहे.

फोटो स्रोत, BHAI JAGTAP/FACEBOOK
"देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. फडणवीस सुरूवातीपासून सरकार पाडण्याबाबत वक्तव्य करत आहेत. हे सरकार स्थापन झाल्यावर फडणवीसांनी आधी 7 दिवसात सरकार पडणार असं भाकीत केलं. त्यानंतर 1 महिना आणि 1 वर्षात सरकार पडणार असं भाकीत केलं. या भाकिताचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं." असं भाई जगताप म्हणाले.
"फासा आम्हीच पलटणार, शिडीशिवाय फासा पलटणार" असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.
त्यावर भाई जगताप यांनी हे विधान केलं आहे.
टीव्ही-9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.
3) नौदल अधिकाऱ्याला जाळले
चेन्नई विमानतळावरून अपहरण करण्यात आलेल्या नौदल अधिकाऱ्याला पालघरमध्ये जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.
सूरजकुमार मिथिलेश दुबे असं या नौदल अधिकाऱ्याचं नाव आहे.
तलासरी तालुक्यातील वेवजी गावातील स्थानिकांनी दुबे यांच्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दुबे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, शनिवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सूरजकुमार दुबे 31 जानेवारीला चेन्नई विमानतळावर पोहोचले. तीन अज्ञात लोकांनी त्यांचं अपहरण केलं आणि 10 लाखांच्या खंडणीची मागणी केली. 5 फेब्रुवारीला त्यांना पालघर जिल्ह्यात आणण्यात आलं आणि पेट्रोल टाकून त्यांची हत्या करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे.
4) टूलकिटमधून अनेक गोष्टी उघड झाल्या- जयशंकर
पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने जारी केलेल्या टूलकिटचा खलिस्तानशी संबंध असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला.
त्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भाष्य केलं आहे.
या टूलकिटमधून अनेक गोष्टी उघड झाल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जे भाष्य केले त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने का प्रतिक्रिया व्यक्त केली ते कळू शकेल, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
या टूलकिटमधून आणखी काय उघड होतं, त्याची प्रतीक्षा करावी लागेल. ज्या गोष्टींची सेलिब्रिटींना जाणिव नाही त्याबाबत त्यांनी भाष्य केल्याने परराष्ट्र मंत्रालयास तातडीने का प्रतिक्रिया द्यावी लागली ते कळू शकण्यास मदत होईल, असे जयशंकर यांनी सांगितल्याची एक क्लीप एका वृत्तवाहिनीने पोस्ट केली आहे.
ही बातमी लोकसत्ता या वृत्तपत्राने दिली आहे.
5) हेमेंद्र मेहता शिवसेनेत
भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग सुरू झालं आहे. शुक्रवारी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
मेहता यांनी बोरीवली मतदार संघातून तीन वेळा विजय मिळवला होता. त्यामुळे गुजराती बहुल असलेल्या या भागात मेहता यांच्यामुळे शिवसेनेला मदत मिळण्याची शक्यता आहे.
वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेमेंद्र मेहता यांच्या हातावर शिवबंधन बांधलं.
मुंबई महापालिका निवडणुकीत कायम भाजपच्या बाजूने कौल देणाऱ्या गुजराती समाजाची मतं महत्त्वाची आहेत. त्यामुळे शिवसेनेने गुजराती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी हातपाय मारायला सुरूवात केली आहे.
महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























