शेतकरी आंदोलन: ...तर मोदी सरकारची सत्ता धोक्यात येईल - राकेश टिकैत

फोटो स्रोत, Sakib Ali/Hindustan Times via Getty Images
भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवीन कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर सत्ता धोक्यात येईल असा इशारा टिकैत यांनी मोदी सरकारला दिला आहे.
हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या महापंचायतीत राकेश टिकैत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "शेतकरी आंदोलनाचा वेग कमी होणार नाही. या आंदोलनाचा नेता कोणीही एक नसून शेतकरीच या आंदोलनाचे नेते आहेत." असंही ते म्हणाले.
ते पुढे म्हणतात, "आंदोलन अधिक काळ चालेल पण गती कमी होणार नाही. शेतकरी नेत्यांशी सरकार चर्चा करत आहे. त्या नेत्यांशी सरकारने चर्चा सुरू ठेवावी. ते जसं सांगतील तसं आम्ही करू."
मोदी सरकारला आव्हान देत टिकैत म्हणाले, "सरकारने लक्ष देऊन ऐकावं, आम्ही सध्या केवळ कायदे मागे घेण्याची मागणी करत आहोत, पण आम्ही गादीवरून पायउतार होण्याचा आग्रह धरला तर काय कराल?"

फोटो स्रोत, Sakib Ali/Hindustan Times via Getty Images
"या आंदोलनावर कोणीही दबाव टाकू शकत नाही. ही लढाई आमच्या जमिनी वाचवण्याची आहे. आम्ही आमचं धान्य तिजोरीत बंद होऊ देणार नाही."
दिल्लीत शेतकऱ्यांना आंदोलनासाठी येण्यास होणारा विरोध पाहता टिकैत यांनी घोषणा करत म्हटलं, "जब-जब राजा डरता है, किलेबंदी करता है. (जेव्हा जेव्हा राजा घाबरतो, तो किल्ल्याची सुरक्षा वाढवतो.)"
सरकारने कृषी कायदे परत घेतले नाहीत तर हे आंदोलन ऑक्टोबरपर्यंत चालेल असा इशारा यापूर्वीच राकेश टिकैत यांनी दिला होता.

फोटो स्रोत, Ajay Aggarwal/Hindustan Times via Getty Images
शेतकरी आंदोलनाचा चेहरा म्हणून टिकैत हे समोर आले आहेत, पण त्याच वेळी इतर शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलनाबाबतची त्यांची भूमिका वेगळी आहे का? असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सिंघू, गाजीपूर आणि टिकरी सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























