सुधीर मुनगंटीवार - राज्यात ९५ हजार कोटींची दारू वर्षभरात संपते, पण लस मोफत पाहिजे : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. राज्यात 95 हजार कोटींची दारू वर्षभरात संपते, पण लस मोफत पाहिजे-मुनगंटीवार
कोरोना लस मोफत मिळावी असा दृष्टिकोन का? राज्यात दरवर्षी 95 हजार कोटीची दारू संपते, पण कोरोनाची लस मात्र मोफत पाहिजे असा टोला राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हाणला आहे. 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोनासारख्या आरोग्य संकटाने विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांनाही फटका बसला. कोरोना संकटात मांडण्यात आलेला अर्थसंकल्प निर्धारपूर्वक असा होता. कोरोना काळ असूनही गेल्या अर्थसंकल्पात गुंतवणुकीचं जे उद्दिष्ट होतं ते आम्ही पूर्ण केलं. 4 लक्ष 12 हजार कोटीची गुंतवणुकीचं लक्ष्य आपण पूर्ण केलंय. त्यादृष्टीने हा अभूतपूर्व अर्थसंकल्प आहे, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
2.निवडणुकीपूर्वी मनसेचे ११ नेते शिवसेनेत
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या 11 नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवबंधन बांधलं. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
राजेश कदम मनसेचे संस्थापक सदस्य होते. 2009साली डोंबिवली विधानसभा मतदार संघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. विविध कल्पक आंदोलनं करून शिवसेना-भाजप युतीला जाब विचारून धारेवर धरणारे विरोधक अशी त्यांची प्रतिमा होती.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी या सगळ्यांना घेऊन पक्षप्रमुख राज ठाकरे यांना भेटले होतो. त्यावेळी त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. अचानक केलेला शिवसेनाप्रवेश अनाकलनीय आहे, असं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं.
3. वीजदरवाढीविरोधात भाजप ५ फेब्रुवारीला आंदोलन करणार
५ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्ष वीजदरवाढीविरोधात आंदोलन करणार आहे. सर्व महावितरण कार्यालयाबाहेर भाजपकडून आंदोलन केलं जाणार आहे.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेश कार्यालयात झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वीजबिलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याप्रकरणी स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं.
4. दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर १०० शेतकरी बेपत्ता
प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत आयोजित ट्रॅक्टर रॅलीनंतर पंजाबचे शंभर शेतकरी बेपत्ता असल्याचं स्पष्ट होतं आहे. या शेतकऱ्यांचा तपास लागावा यासाठी पंजाबचे मंत्री सुखविंदर रंधावा आणि खासदार मनीष तिवारी यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. 'टीव्ही9'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"शेतकरी आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसेत अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची यादी सार्वजनिक करावी अशी विनंती गृहमंत्र्यांना केली आहे. जेणेकरून त्यांना कायदेशीर मदत केली जाईल. दिल्ली पोलिसांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर त्याची माहिती द्यावी", असं तिवारी यांनी म्हटलं आहे.
प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 35पेक्षा जास्त केसेस दाखल केल्या असून, 80पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचा शोध घेतला जाईल असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
5. रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी काढणार, पालकमंत्र्यांशी चर्चा
क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास उत्सुक असून यासंदर्भात धवल कुलकर्णीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची सोमवारी भेट घेतली. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
धवल कुलकर्णी आणि 'क्रिककिंगडम'चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर अशोक चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
धवल कुलकर्णीने यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली आणि नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. कुलकर्णी आणि दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून अशोक चव्हाण यांना एक टी-शर्ट भेट दिला. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























