प्रजासत्ताक दिन : शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसाठी दिल्ली पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Sameer Sehgal/Hindustan Times via Getty Image
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसाठी दिल्ली पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय
शेतकरी संघटना आणि दिल्ली पोलिसांमध्ये प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ट्रॅक्टर परेडबाबत चर्चा झाली असून पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला आता परवानगी दिली आहे. बीबीसी हिंदीने हे वृत्त दिले आहे.
स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडसाठी जी जागा निश्चित केली आहे त्याठिकाणी परेडसाठी शेतकरी तयार असल्याचंही त्यांनी सांगितले.
'ही एक ऐतिहासिक परेड असून यावेळी शांततेचे पूर्ण पालन केले जाईल. तसंच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमुळे प्रजासत्ताक दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही,' असंही शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलं आहे.
2. देशाला 'हिंदुस्थान' म्हणून जगायचे असल्यास शिवसेनेची गरज - संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजप नेत्यांसमोर शिवसेनेचे कौतुक केले आहे. या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असल्यास शिवसेनेची गरज आहे, असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, RAJU SANADI/BBC
संपूर्ण देशाला हिंदुत्वाच्या धारेखाली आणून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची प्रतिमा छापायची आहे आणि या गोष्टी शिवसेनेच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतात असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं.
ते सांगली येथे एका कार्यक्रमाच्या निमित्त बोलत होते.
3. कांगारुंच्या गोलंदाजीपेक्षा मुंबई लोकलमध्ये सीट मिळणं अवघड- शार्दुल ठाकूर
'एकवेळ कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करणं सोपं आहे पण लोकलमध्ये सीट मिळणं अवघड आहे. कारण तिथे चांगल्या टायमिंगच्या गरज असते.' ही प्रतिक्रिया दिलीय क्रिकेपटू शार्दुल ठाकूरनं.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीचा सामना कसा केला? या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्याने मिश्कीलपणे हे उत्तर दिले. लोकससत्ताने हे वृत्त दिले आहे.
शार्दुल मुळचा पालघरमधील असल्याने क्रिकेट शिकण्यासाठी त्याला लोकलमधून मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागायचा. कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला याबाबत विचारलं असता शार्दुल म्हणाला, "2018 मध्ये सामन्यानंतर दुखापतग्रस्त झालो होतो.
माझ्या समोर दोनच पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे संधीची प्रतीक्षा करणे आणि दुसरा म्हणजे मेहनत करून संघात पुन्हा स्थान मिळवणे. मी दुसरा पर्याय निवडला."
माझे वडील शेतकरी आहेत. पीक वाया गेले म्हणून शेती करणं सोडायचे नसते. हे सूत्र क्रिकेटलाही लागू होतं, असंही शार्दुल म्हणाला.
4. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 95.22 टक्के, आरोग्य विभागाची माहिती
महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.22 टक्के एवढे आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (23 जानेवारी) 3,694 रुग्ण बरे झाले असून 56 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

फोटो स्रोत, SOPA IMAGES
राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असून कोरोना मुक्त होण्याचा दर वाढला आहे. दुसऱ्या बाजूला लसीकरणाची मोहिमही सुरू झाली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात 50,740 जणांचा मृत्यू झालाय. आताचा मृत्यू दर 2.53 टक्के इतका आहे. तर राज्यात 43,870 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
5. देशातील तब्बल 70 टक्के महिला इंटरनेटपासून दूर
ग्रामीण भागातील 70 टक्क्यांहून जास्त महिला इंटरनेटपासून दूर असल्याचे निरीक्षण राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण फेज-1 मधून नोंदवण्यात आले आहे. सकाळने हे वृत्त दिले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2015 च्या आकडेवारीनुसार चीननंतर भारतात इंटरनेट वापरणारे सर्वाधिक लोक आहेत. पण जगात आघाडीवर असलेल्या भारतात केवळ 30 टक्केच महिला इंटरनेट वापरतात. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणाच्या माध्यमातून देशातील लोकसंख्या, आरोग्य आणि आहार या गोष्टींबाबत विविध निरीक्षण नोंदवली जातात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























