अर्णब गोस्वामी डेटा चॅट लीक: टीआरपी घोटाळा चौकशीमुळेच आल्या गोष्टी समोर - जयंत पाटील

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 'टीआरपी' घोटाळ्याची चौकशी केली नसती, तर देशाचे खरे गुन्हेगार समोर आले नसते - जयंत पाटील
महाविकास आघाडी सरकारने 'टीआरपी' घोटाळ्याची चौकशी केली नसती, तर देशाचे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
कथित टीआरपी घोटाळयानंतर पत्रकार अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी प्रमुख पार्थ दासगुप्ता यांचं व्हॉट्सअप संभाषण व्हायरल झालं आहे. त्यावर पाटील यांनी असं वक्तव्य केलं आहे.
पाटील यांनी म्हटलं की, "प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आलं आहे. मात्र, प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते."
"या व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक 'विजयाचा' क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल. संबंधित व्यक्ती अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना स्पष्टपणे दिसत आहे. हा न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे," असंही जयंत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, पैसे देऊन टीआरपी वाढवल्याचा आरोप रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी केला आहे. सध्या या प्रकरणात पार्थ दासगुप्ता यांच्यासहित दोन जण अटकेत आहेत.
दरम्यान, अर्णब गोस्वामींना राष्ट्रीय सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती आधीच कशी कळली असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत विचारला.
2. शिवसेना पश्चिम बंगालमधील निवडणूक लढवणार
शिवसेना पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
"शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षानं पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे," असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/AFP/GETTY IMAGES
3. 'शिवसेनेला मतांची चिंता, म्हणून नामांतराचा विषय'
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक घडत आहे.
काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत म्हटलंय, "नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत."

फोटो स्रोत, Balasaheb thorat/twitter
यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील सदर 'रोखठोक'मधून काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.
"औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं 'सेक्युलर' नव्हे!,"
त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
4. मुंबईत सहायक पोलीस निरीक्षकाचा मांजाने चिरला गळा
वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी दुचाकीवरून न्यायालयात जात असताना नायलॉन मांजाने त्यांचा गळा चिरला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे. जे. मार्ग जंक्शनवर अचानक पतंगीचा मांजा त्यांच्या गळ्याजवळ आला. दुचाकीवर नियंत्रण मिळवताना कधी मांजाने गळा चिरला हे त्यांच्या लक्षातच आले नाही. त्यांच्या गळ्यातून रक्त येताना पाहून कर्तव्यावरील वाहतूक पोलीस मदतीला धावून आले. त्यांनी गवळी यांना रुग्णालयात दाखल केलं.
वेळेत उपचार मिळाल्याने गवळी यांचा जीव बचावला.
5. कोरोना लसीकरण: 447 जणांवर साइड इफेक्ट
16 जानेवारीपासून संपूर्ण देशात लसीकरण सुरू झालं आहे. रविवारी (18 जानेवारी) लसीकरण मोहिमेचा दुसरा दिवस होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 2 लाख 24 हजार 301 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यापैकी 447 जणांना साइड इफेक्ट झाल्याचं नोंदवलं गेलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























