कर्नाटक अपघातः महिलांच्या गाडीला अपघात; 11 ठार #5मोठ्या बातम्या

धारवाड, कर्नाटक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, धारवाडजवळ झालेल्या अपघातात 11जणांचा मृत्यू झाला.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. महिलांच्या वाहनाला अपघात; 11 ठार

गोवा येथे मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी दावणगिरी येथून निघालेल्या मिनी बसला टिप्परने दिलेल्या जोराच्या धडकेने भीषण अपघात झाला असून, या अपघातात दहा महिलांसह 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

हा भीषण अपघात शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास धारवाड तालुक्यातील ईट्टगट्टी गावाजवळ असलेल्या बायपासवर घडला आहे. मृतांमध्ये दहा महिलांचा समावेश आहे. दावणगिरीहून गोव्याला जाणारी मिनी बस आणि बेळगावहून हुबळीकडे जाणारा टिप्पर यांच्यात हा अपघात झाला असून, बसमधील काहींची प्रकृती गंभीर आहे, तर टिप्परमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

एकूण 17 महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. दावणगिरी मेडिकल असोसिएशनच्या लेडिज विंगची ही सहल होती.

2. संभाजीनगर म्हणा, धाराशीव म्हणा, नामांतरावरून वाद नाही- पवार

नामांतर या मुद्द्यावर आमच्यात कोणतही वाद नाही. संभाजीनगर म्हणा, धाराशीव म्हणा अन्यथा अजून काही म्हणा, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. मी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचेही ते म्हणाले.

औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत एकमत नसताना, विशेषत: शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका वेगवेगळी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या विषयावर वेगळेच भाष्य केलं आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

औरंगाबाद, संभाजीनगर
फोटो कॅप्शन, औरंगाबाद

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर त्यावरून नवा वाद निर्माण झाला होता. हा वाद सुरू असतानाच आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आल्याने या वादात भर पडली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर असा उल्लेख झाल्याबाबत मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्नही विचारले. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, 'मी त्यात नवीन असे काय केले?, मी जे वर्षानुवर्षे बोलत आलेलो आहे तेच केले आहे आणि तेच स्वीकारणार.'

या वेळी मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पक्षाच्या नाराजीबाबतही विचारण्या आले. त्यावर औरंगजेब हा काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात असलेला धर्मनिरपेक्ष हा शब्दात औरंगजेब बसत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

3. स्वदेशी कोव्हॅक्सिन घेण्यास काही डॉक्टरांचा नकार

दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टरांनी 'कोव्हॅक्सिन' ही भारत बायोटेकनिर्मित स्वदेशी लस टोचून घेण्यास नकार दिला. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

कोरोना, कोव्हॅक्सिन, लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोव्हॅक्सिन

नागपूरमधील 'मेडिकल' या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आपल्याला 'ऑक्सफर्ड'ची 'कोव्हिशील्ड' लस देण्यात येईल, अशा अपेक्षेने डॉक्टर तेथे पोहोचले. परंतु तेथे स्वदेशी कोव्हॅक्सिन लस दिली जात असल्याचे समजल्यावर काही डॉक्टर या केंद्रातून आल्या पावली परतले. त्यामुळे स्वदेशी कोव्हॅक्सिन लशीच्या परिणामकारकतेबाबत डॉक्टरांनाच खात्री नसल्याची चर्चा सुरू होती.

दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी 'कोव्हिशील्ड' लस देण्याची मागणी केली आहे.'कोव्हॅक्सिन'च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्यामुळे डॉक्टरांना चिंता वाटत असल्याचे राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले. या रुग्णालयात सर्वप्रथम सुरक्षारक्षकाला लस टोचण्यात आली.

4. अमित शहांचा बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटण्यास नकार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह बेळगावला भेट देत आहेत. मात्र या दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांच्या भेटीची मागणी केली होती. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारली आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

अमित शहा, बेळगाव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 17 जानेवारीला हुतात्मा दिन पाळला जातो. या पार्श्वभूमीवर उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांची भेट मागितली होती. ही भेट महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून मागितली होती.

5. वर्षा, देवगिरीवर झुणका भाकरीच्या दरात बिर्याणी

मुख्यमंत्री यांचे वर्षा आणि उपमुख्यमंत्री यांचे देवगिरी या शासकीय निवासस्थानात येणाऱ्या अतिथींसाठी खानपान सेवा पुरवठादाराची काल नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी झुणका भाकर एवढ्या किंमतीत चिकन बिर्याणी मिळणार आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री यांचे वर्षा तर उपमुख्यमंत्री यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी खानपान सेवा पुरविण्यासाठी मे.सेंट्रल कॅटरर्स, मुंबई यांना जानेवारी 2023 पर्यंत हे काम मिळाले. या कंत्राटदाराने सर्वात स्वस्त दराने हे पदार्थ देण्याच्या ठरवले आहे. गेल्या पाच महिन्यात खाद्य तेलाचे दर 400 ते 500 रूपयांनी वाढले असताना या कंत्राटदाराने अतिशय स्वस्त दरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना खाद्य सेवा देण्याचे मान्य केले आहे.

चिकन बिर्याणी केवळ अकरा रुपये, दही मिसळ दहा रुपये, व्हेज सँडविच दहा रुपये, सुकामेवा दहा रुपये, मसाला डोसा 11 रूपये आणि साधा डोसा 10 रूपयांत देऊ अशी हमी कंत्राटदाराने दिली आहे.

राज्यातील कोणत्याही हॉटेलपेक्षा हे दर कमी आहेत. बिगर तारांकित साध्या हॉटेलमध्ये यापेक्षा सहा ते सात पट अधिक दर तिकडे तेलापासून सर्व खाद्यांनाचे दर वाढत असताना इतके कमी दर कंत्राटदार कंपनीला कसे पडतात हा प्रश्न विचारला जात आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)