कोरोना : इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन टाळण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर घेतले गेले पैसे?

फोटो स्रोत, Getty Images
परदेशातून मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांकडून सक्तीच्या इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन ऐवजी होम क्वारंटाईनसाठी पैसे घेतले जात होते.
मुंबई एअरपोर्टवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा कथित घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलाय.
पोलिसांच्या माहितीनुसार, या घोटाळ्याचा मास्टरमाईंड होता तो मुंबई महापालिकेचा एक सब-इंजीनिअर.
पोलिसांनी याप्रकरणी एका सब-इंजीनिअरला अटक केली आहे.
काय आहे हे प्रकरण?
परदेशातून मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये 15 दिवस इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावं लागतं. मुंबई महापालिकेने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हे सक्तीचं केलं आहे.
यूकेमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या नवीन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतलाय.
बीबीसीशी बोलताना सहार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, "या सब-इंजीनिअरसोबत एअरपोर्टवर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. होम क्वारंटाईन होण्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून 4000 रूपये घेतले जात होते."

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई पोलिसांनी अटकेतील व्यक्तीकडून 1 लाख 4000 रूपये रोकड. 200 सौदी रियाल आणि होम क्वारंटाईनचा स्टॅम्प जप्त केला आहे.
"आरोपीकडून मुंबईतील मोठ्या रुग्णालयांचे लेटरहेड जप्त करण्यात आले आहेत. हे लेटरहेड बनावट आहेत. गेल्या 8-10 दिवसांपासून हा घोळ सुरू होता," असं वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात.
अटकेतील व्यक्ती 26 डिसेंबरपासून मुंबई एअरपोर्टवर ड्यूटीला होता. दुबई आणि कुवेतहून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीची जबाबदारी त्याच्यावर होती.
कोर्टाने सदर व्यक्ती आणि त्याच्या साथीदारांची 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, EPA
घोटाळा कसा उघडकीस आला?
एअरपोर्टवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा उघडकीस आला.
वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात, "या व्यक्तीचं वागणं संशयास्पद वाटल्याने एका कर्मचाऱ्याने पोलीस आणि सीआयएसएफला माहिती दिली. संबंधितांची चौकशी करण्यात आली. ज्यात रोकड आणि बनावट स्टॅम्प आणि रुग्णालयाचे लेटरहेड्स आढळून आले."
पोलिसांनी या प्रकरणी ज्या प्रवाशांकडून आरोपीने पैसे घेतले होते. त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.
काय म्हणतात महापौर?
मुंबई एअरपोर्टवर सुरू असलेल्या या प्रकाराबद्दल बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं, "यात जे कोणी सापडतील त्यांच्यावर पालिकेकडून योग्य ती कारवाई केली जाईल. अशा घटना घडू नयेत यासाठी यंत्रणा लावण्यात आली आहे. अशा पद्धतीने चुकीचं काम करून, हे लोक इतरांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही धोक्यात आणत आहेत."या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉ























