उत्तर प्रदेशमध्ये सात महिन्यांची गरोदर असलेल्या बलात्कार पीडितेचा मृत्यू

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये 15 वर्षांच्या बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला. पीडिता सात महिन्यांची गरोदर होती. गरोदरपणातील समस्यांमुळे पीडितेचा मृत्यू झाला.

पोलिसांनी रविवारी (10 जानेवारी) यासंबंधी माहिती देताना सांगितलं की, पीडितेला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार या मुलीला अतिशय वाईट परिस्थितीत रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं आणि दाखल केल्यावर तिची तब्येत अजूनच बिघडली, अशी माहिती रुग्णालयाचे वरिष्ठ अधीक्षक डॉक्टर सुबोध शर्मा यांनी दिली होती.

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही या मुलीचे प्राण वाचले नाहीत, असंही सुबोध शर्मा यांनी म्हटलं.

बरेलीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रोहित सिंह साजवान यांनी म्हटलं, "पोस्टमार्टम रिपोर्टनुसार पीडितेचा मृत्यू जंतूसंसर्गामुळे झाला आहे. मुलीचा व्हिसरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

मुलीचे वडील मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत. त्यांनी सांगितलं की मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचं आम्हाला 6 डिसेंबरला कळलं.

गेल्यावर्षी जून महिन्यात तीस वर्षांच्या एका व्यक्तीनं आपल्या मुलीवर बलात्कार केला होता, असंही त्यांनी सांगितलं. मुलगी कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा या व्यक्तीनं तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेच्या वडिलांनी याबाबत फतेहगंज पश्चिम पोलिस ठाण्यात 4 डिसेंबरला तक्रार नोंदवली होती. आरोपीला 6 डिसेंबरला अटक करण्यात आली.

फतेहगंज पश्चिम पोलिस ठाण्याचे प्रमुख अश्विनी कुमार यांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली आहे.

मुलीच्या वडिलांनी जिल्हा रुग्णालयाकडे गर्भपातासाठी परवानगी मागितली होती. मात्र ती सात महिन्यांची गरोदर असल्यानं आणि पोलिसांकडे तक्रार केली असल्याने डॉक्टरांनी नकार दिला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)