You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे : माझ्या जीवाला धोका आहे, कमी जास्त झाल्यास सरकार जबाबदार - #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.माझ्या जीवाला धोका आहे, कमी जास्त झाल्यास सरकार जबाबदार - राणे
माझ्या जीविताला धोका आहे, माझं काही कमी जास्त झालं तर राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
माझ्या जीविताला धोका आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. ती सरकारने काढली आहे. याबाबत माझी काही तक्रार नाही, परंतु जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असं राणे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यावरून भाजप नेत्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
भंडारा इथल्या अपघातासंदर्भात राणेंनी टीका केली आहे. भंडाऱ्यात जिल्हा रुग्णाला लागलेल्या आगीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं ते म्हणाले.
2.नौदल जवानाने आयएनएस बेतवावर केली आत्महत्या
नौदलाच्या जवानाने मुंबईत आयएनएस बेतवावर आत्महत्या केली. 22 वर्षीय रमेश चौधरी असं या जवानाचं नाव असून, तो मूळचा जोधपूरचा आहे. रविवारी सकाळी त्याने सर्व्हिस रायफलमधून स्वत:वर गोळी झाडली. जहाजावर त्याचा मृतदेह सापडला. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
रमेश अविवाहित होती आणि नुकतीच सुट्टी संपवून कामावर परतला होता. नौदलाच्या बरोबरीने मुंबई पोलिसही याप्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आयएनएस बेतवा मिसाईल फिगेट श्रेणी नौका आहे.
3. गडकरींची स्टील, सिमेंट उद्योगावर जोरदार टीका
सिमेंट आणि स्टील उद्योगांमध्ये परस्पर हितसंबंध असल्याचा आरोप केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. हितसंबंध असल्यानेच या दोन्ही उद्योगांचा परस्पर फायदा होत आहे. ते म्हणाले की मागणी नसतानाही अलीकडच्या काळात सिमेंट आणि स्टीलच्या किंमतीत लक्षणीय वाढ होत आहे. याचा थेट परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर पडत आहे.
गडकरी पुढे म्हणाले की, हा प्रकार यापुढेही कायम राहिला तर येत्या काही काळात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.
"सिमेंट कारखाने सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठवत आहेत. हे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून चुकीचं आहे. पुढील पाच वर्षांत सुमारे 111 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्याच्या सरकारचा मानस आहे. त्यामुळे स्टील आणि सिमेंटचे दर जर असेच चढे राहिले, तर हे आमच्यासाठी फार कठीण असेल," असं गडकरी म्हणाले.
"देशातील सर्व स्टील कंपन्यांकडे स्वतःच्या लोह खाणी आहेत. तसंच कामगार आणि वीजदरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. असं असतानाही या कंपन्या खर्च वाढवूनही सिंमेट आणि स्टीलच्या किंमती वाढवत आहेत. यामागील मुख्य कारण समजणं खूप अवघड आहे," असंही गडकरी म्हणाले.
4. शिवसेनेची गुजराती मतांसाठी स्नॅक्स डिप्लोमसी
शिवसेनेने गुजराती भाषिक मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी खास मोहीम सुरू केलेली आहे. 'मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' म्हणत शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 'टीव्ही9'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
अंधेरी-ओशिवरा या ठिकाणच्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित होते. यावेळी 11 गुजराती उद्योगपतींनी शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
या मेळाव्यात मराठी भाषिकांची खासियत वडापाव आणि गुजराती भाषिकांची स्पेशल डिश जिलेबी फाफडा या दोन्ही पदार्थांची सांगड घालण्यात आली होती.
या मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्वांना वडापाव, फाफडा, जिलेबी, बटाट्याची भाजी, शेव हे पदार्थ खाण्यासाठी देण्यात आले. मुंबईतील 50 ते 55 वॉर्डमध्ये गुजराती भाषिकांची संख्या जास्त आहे. मुंबईत एकूण 227 वॉर्ड पैकी 50 ते 55 वॉर्डमध्ये गुजराती मतदारांची जर ही ताकद वाढवली तर शिवसेनेसाठी ती जमेची बाजू ठरेल.
5. अवकाळी पावसाचा फटका
पूर्वमोसमी, मोसमी आणि अवकाळी मिळून सरलेल्या पूर्ण वर्षांत राज्यात कोणत्या ना कोणत्या विभागात बारमाही पाऊस पडला. सुरुवातीचे सलग पाच महिने गारपिटीने दाणादाण उडवून दिली. २०२१ या नव्या वर्षांतील पहिल्या महिन्यातही सरी कोसळल्याने राज्यात पावसाचा हा सलग तेरावा महिना ठरला आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळं यामुळे देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले, तर हातातोंडाशी आलेल्या शेतीचंही अतोनात नुकसान झालं. 2020 मध्ये जानेवारीच्या सुरुवातीलाच ऐन थंडीत विदर्भात गारपिटीने पिकांची दाणादाण उडवून दिली, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही जोरदार पावसाने शेतीचे नुकसान केलं.
अम्फन, निवार, गती, निसर्ग आणि बुरेवी या चक्रीवादळांनी धुमाकूळ घातला. निसर्ग आणि गती हे अरबी समुद्रात, तर इतर तीन चक्रीवादळं बंगालच्या उपसागरात तयार झाली होती. निसर्ग चक्रीवादळाने प्रामुख्याने महाराष्ट्रात हाहाकार उडवून दिला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्यानं प्रचंड नुकसान केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)