IndvsAus: टीम इंडियावर रनआऊटची नामुष्की; 244वर ऑलआऊट

फोटो स्रोत, Jason McCawley - CA
सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 338 रन्ससमोर खेळताना टीम इंडियाचा डाव 244 रन्समध्येच आटोपला. टीम इंडियाचे तीन शिलेदार रनआऊट झाले.
टेस्ट मॅचमध्ये रन्स करण्याची घाई नसते. त्यामुळे रनआऊटची शक्यता कमी असते. मात्र टीम इंडियाचे हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह रनआऊट होऊन माघारी परतले. त्यातच ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या हाताला दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या चिंतांमध्ये भर पडली आहे.
टीम इंडियाने 96/2 वरून पुढे खेळायला सुरुवात केली मात्र ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या बॅट्समननी शरणागती पत्करली. पॅट कमिन्सचा उसळता चेंडू खेळण्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा प्रयत्न फसला आणि बॉल स्टंप्सवर जाऊन आदळला. त्याने 22 रन्स केल्या.
हनुमा विहारीनेही बचावात्मक पवित्रा स्वीकारला. मात्र चोरटी रन घेण्याचा त्याचा प्रयत्न सपशेल फसला. जोश हेझलवूडने बॉल अडवून अचूक थ्रो करत विहारीला आऊट केलं. विहारीला 4 रन्स करता आल्या.
ऋषभ पंतने आक्रमक पवित्र्यासह खेळायला सुरुवात केली. खेळपट्टीवर स्थिरावलाय असं वाटत असतानाच हेझलवूडच्या बॉलिंगवर डेव्हिड वॉर्नरच्या हाती कॅच देऊन तो तंबूत परतला. खेळपट्टीवर ठाण मांडून खेळणाऱ्या पुजाराचा बचाव पॅट कमिन्सने मोडून काढला. पुजाराने 176 बॉलमध्ये 50 रन्सची खेळी केली.
जडेजाने चोरटी रन घेण्याचा केलेला प्रयत्न अश्विनच्या अंगलट आला. त्याने 10 रन्स केल्या. नवदीप सैनीला ऑस्ट्रेलियाने बाऊन्सरने सतावले. मिचेल स्टार्कच्या बाऊन्सरवर तो आऊट झाला.
जडेजा स्ट्राईक आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न करत असताना जसप्रीत बुमराह रनआऊट झाला. मोहम्मद सिराजला कमिन्सने आऊट केलं. टीम इंडियाचा डाव 244 रन्समध्ये आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला 94 रन्सची आघाडी मिळाली.
पॅट कमिन्सने टाकलेला बॉल ऋषभ पंतच्या हातावर आदळला. फिजिओंनी ऋषभच्या हातावर उपचार केले. त्यानंतर तो खेळलाही. मात्र दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने हाताचे एक्स रे काढण्याकरता तो हॉस्पिटलला रवाना झाला.
रवींद्र जडेजाच्या हातावरही बॉल बसला. त्याच्या हातावरही उपचार करण्यात आले.
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अडलेड टेस्ट ऑस्ट्रेलियाने तर मेलबर्न टेस्ट टीम इंडियाने जिंकली. मालिका 1-1 बरोबरीत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























