'कोरोना लशीत डुकराचं मांस नाही, नपुंसक होण्याची भीती नाही' #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, SOPA Images
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. लशीत डुकराचे मांस नाही, नपुंसक होण्याची भीती नाही-डॉ. रमण गंगाखेडकर
कोरोनावरील लसीवर अनेक अफवा पसरत आहेत. सर्व अफवा आणि दावे निराधार आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका. भारत सरकारने मंजुरी दिलेल्या कोरोनावरील दोन्ही लशींमध्ये डुकराच्या मांसाचे अंशही नाहीत आणि नपुंसक होण्याची शक्यता नाही असं आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
कोरोना लशीशी संबंधित सोशल मीडियावरील मेसेज सत्यता तपासल्याशिवाय पुढे पाठवू नका असं आवाहनही त्यांनी केलं.
"लस मंजूर करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली गेली आहे हे नागरिकांना समजलं पाहिजे. सखोल विचार केल्यावरच त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही लस घेण्यास नकार देणाऱ्यांनी असा विचार करावा. केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यांचे नातेवाईक आणि मित्रही अडचणीत येऊ शकतात", असं त्यांनी सांगितलं.
"आतापर्यंत जगभरात सुमारे एक कोटी नागरिकांना लस देण्यात आल्या आहेत. पण यामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. काही जणांना त्रास झाला. पण या अडचणींवर मात करण्यात आली. पण लोकांनी अशा घटना लक्षात ठेवल्या तर त्यांना समस्या उद्भवतील असं ते म्हणाले.
आपल्याकडे काही संशयास्पद संदेश असल्यास आपण करोना हेल्पलाईनवर कॉल करून तिची सत्यता तपासू शकता. त्यानंतरच ते शेअर करा", असं आवाहन त्यांनी केलं.
2. मोदी सरकारच्या अहंकाराने 60पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव घेतला- राहुल गांधी
मोदी सरकारच्या अहंकाराने 60पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार त्यांच्यावर अश्रूधुराचा वापर करत आहे. अशी क्रूरता फक्त विशिष्ट भांडवलदारांच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. कृषीविरोधी कायदे रद्द करा असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शेतकरी आंदोलनाची सातवी फेरीदेखील निष्फळ ठरली आहे. आता 8 जानेवारीला पुन्हा चर्चा होणार आहे.
3. ... तर मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार
"नोटीस भाजपाच्या लोकांना नाही तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. भाजपाच्या विरोधकांना नोटीस आल्या आहेत त्याच्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने होत आहे. उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल", असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, ROHIT RAJENDRA PAWAR/FACEBOOK
सर्वसामान्यांना सुद्ध आता ईडीसारखी संस्था गेल्या पाच वर्षात फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचं लक्षात आलं आहे. इतकी मोठी संस्था फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापरली जात जात आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही असं रोहित म्हणाले.
रोहित यांनी एपीएमसी मार्केटला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी, व्यापारी, माथाडी कामागर यांच्याबाबतीत असणारे विषय समजून घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत असं त्यांनी सांगितलं.
4. सत्तेत आल्यास गृहिणींना पगार देण्याचं कमल हसन यांचं आश्वासन
सत्तेत आल्यास गृहिणींना दर महिन्याला पगार देऊ असं आश्वासन अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी दिलं आहे. तामिळनाडू निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.
कमल हसन यांच्या पक्षाचा जाहीरनामा सध्या चर्चेत आहे. शिक्षण, रोजगार आणि उद्योगांच्या माध्यमातून महिलांना प्राधान्य देण्यात येईल. गृहिणींच्या कामाकडे दुर्लक्ष होतं. त्यांच्या कामाला महत्त्व दिलं जात नाही, त्यामुळे पक्ष त्यांना मानसिक वेतन देईल. त्यामुळे महिलांची प्रतिष्ठा वाढीस लागेल. सुशासन आणि आर्थिक विषयांसंदर्भात सात कलमी कार्यक्रम राबवला जाईल असं हसन म्हणाले.
5. पोलिसांनी वर्दी बाजूला ठेऊन दोन हात करा- मनसे
पोलिसांनी वर्दी बाजूला ठेऊन दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक दाखवून देऊ असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. वसईत मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसे नेत्यांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. यावेळी अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करण्यात आली असंही त्यांनी म्हटलं आहे. 'टीव्ही9'ने ही बातमी दिली आहे.
पोलिसांनी सरकारच्या मध्यस्थींसारखे वागू नये. मनसे नेहमीच राज्यातील पोलिसांच्या पाठिशी उभी राहिली आहे असं देशपांडे म्हणाले. वसईत परिवहन सेवा सुरू करण्यावरून शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी आमनेसामने आले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात आयुक्त साहेब वेळ द्या अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. पोलिसांनी मनसेच्या माणसांना ताब्यात घेतलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























