संजय राऊत : 'औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा का विरोध, हे भाजपनं त्यांनाच विचारावं'

फोटो स्रोत, Getty Images
"औरंगाबादच्या नामांतराबद्दल शिवसेनेची भूमिका काय हे सर्वांना माहिती आहे. याविषयी राजकारण करू नये. भाजपने हा प्रश्न शिवसेनेला विचारण्यापेक्षा संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्या पक्षांना त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत," असं वक्तव्य शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे.
सोमवारी (4 डिसेंबर) सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली.
यावेळी औरंगाबाद नामांतर संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची भूमिका सर्वांनाच माहिती असल्याचं राऊत म्हणाले.
"औरंगाबाद-संभाजीनगरविषयी शिवसेनेची भूमिका काय हे नव्याने सांगण्याची गरज नाही. भाजप, काँग्रेस, अबू आझमी, MIM तसंच देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला माहिती आहे, औरंगाबादचं नामांतर 30 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी नामांतर केलेलं आहे, त्याच्यावर फक्त सरकारी सही-शिक्का उमटायचा आहे. तो उमटेल," असं राऊत यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, @airnews_pune
दरम्यान, या भाजपने या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
राऊत पुढे म्हणाले, "भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या भूमिकेबाबत चिंता करू नये. त्यांनी याविषयी राजकारणही करू नये. भाजपच्या काळातच हे नामांतर व्हायला हवं होतं. त्यामुळे भाजपने हा प्रश्न शिवसेनेला विचारण्यापेक्षा संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्या पक्षांना प्रश्न विचारले पाहिजेत."
यावेळी औरंगाबाद विमानतळाचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करण्याची मागणीही राऊत यांनी केली.

फोटो स्रोत, TWITTER/@imtiaz_jaleel
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करावं, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. भाजपने दिल्लीत जाऊन हा प्रस्ताव का रखडला आहे, याचा खुलासा राज्याच्या जनतेला करावा," असं राऊत म्हणाले.
शिवाय, "अबू आझमी यांनी राम मंदिराबाबत न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. हासुद्धा जनतेच्या न्यायालयाचा निर्णय आहे. अबू आझमी समजूतदार नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ते विरोध करणार नाहीत," असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
"खरंतर नामांतराबाबत भाजपला काय अडचण आहे, हे समजत नाही. औरंगाबाद नामांतराला काँग्रेसचा विरोध का आहे, हे त्यांनी त्यांना विचारलं पाहिजे. MIM शी भाजपची मैत्री आहे, त्यांची समजूत भाजपने काढावी," असा टोला राऊत यांनी लगावला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























