पुण्याचे नाव बदलून 'जिजापूर' करा - संभाजी ब्रिगेड #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. पुण्याचे नाव बदलून 'जिजापूर' करा - संभाजी ब्रिगेड

एकीकडे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरत असताना आणि त्यावरून राजकारण सुरू झालं असताना, दुसरीकडे पुण्याच्या नामांतराची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.

पुण्याचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडची आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

"राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेल्या पुण्याला वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचं नाव देऊन पुण्याचं जिजापूर असं नामांतर करावं," असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले.

"राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी 'बाल शिवबा'ला घेऊन सोन्याचा नांगर चालवून पुणे वसवलं, त्या पुण्याचं आज सोनं झालेलं आहे," असंही ते म्हणाले.

2. औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न - अजित पवार

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून विरोधक महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.

नाशिकमध्ये कोरोनासंदर्भात बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी ईडीची कारवाई, केंद्राकडून कोरोनाकाळात मिळणारी आर्थिक मदत अशा मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं.

"सरकार येत जात असताना, त्यामुळे सूड बुद्धीने कुणीही काम करू नये. राजकीय हस्तक्षेप न होता कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे," असं अजित पवार ईडीच्या कारवाईबाबत म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी केंद्राने कोरोना काळात आर्थिक मदत केली नसल्याचा आरोप केला.

"कोरोनामुळे राज्यात आर्थिक अडचणी येत आहेत. केंद्राकडून हवा तसा निधी येत नसल्याने आर्थिक अडचणीत भर पडत आहे," असं अजित पवार म्हणाले.

3. OBC ला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या - संभाजीराजे

इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला (मराठा समाज) आरक्षण द्या, अशी मागणी राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

"मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लूएस) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. पण, EWS आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही हे सरकारने सांगावं," असं संभाजीराजे म्हणाले.

"EWS घेतल्याने SEBS ला धोका निर्माण होईल. किंबहुना EWS आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे ते फक्त मराठा समाजासाठी नाही," असंही ते म्हणाले.

न्यायालयावर विश्वास व्यक्त करत चांगल्या निर्णयाची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

4. मी कोरोनाची लस घेणार नाही, मला गरज नाही - बाबा रामदेव

"मी कोरोनाची लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही," अशी भूमिका योगगुरू बाबा रामदेव यांनी घेतली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

बाबा रामदेव म्हणाले, "करोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये."

करोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे, असंही ते म्हणाले.

5. GST चोरांविरुद्ध सरकार आक्रमक, आतापर्यंत 187 जण अटकेत

वस्तू व सेवा करात (GST) फसवणूक करणाऱ्यांविरोधात भारत सरकारचं अर्थमंत्रालय आक्रमक झालं आहे. 7000 संस्थांवर कारवाई केली जाणार आहे. इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.

यातील 187 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती अर्थसचिव अजय भूषण यांनी दिली.

अटक केलेल्यांमध्ये पाच चार्टर्ड अकाऊंटंट आणि एक कंपनी सेक्रेटरी सुद्धा आहेत.

जीएसटी लागू झाल्यापासून पहिल्यांच 1.15 लाख कोटी इतकं विक्रमी जीएसटी कलेक्शन झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)