पीएमसी बँक घोटाळा : प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
पीएमसी बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी तपास करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे 90 कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पीएमसी बँक घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. त्यात प्रवीण राऊत व त्यांची पत्नी माधुरी राऊत यांची चौकशी करण्यात आली आहे व त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
दुसरीकडे या प्रकरणात संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. प्रवीण राऊत यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते.
ईडीनं पहिली नोटीस बजावल्यानंतर वर्षा राऊत यांच्याकडून 5 जानेवारीपर्यंत मुदत मागण्यात आली होती. ही मुदत देताना ईडीनं आता 5 जानेवारी रोजी हजर राहण्यासाठी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे.
2. 'भाजप आणि संघप्रणित नवपेशवाईला गाडून टाका'
नवीन वर्षात नवपेशवाईला गाडून टाका, असं वक्तव्यं राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शौर्यदिनी (1 जानेवारी) केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
पुणे येथे शहर काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी म्हटलं, "200 वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांनी व भांडवलदारांनी पेशवाईचा पराभव केला. हे लक्षात ठेवून ही नवी पेशवाई भांडवलदारांशी जिगरी मैत्री करतेय. त्यांच्या मांडीवर बसून देशावर राज्य करतेय. राजेशाहीच्या काळात एखाद्या वारसाला वा दत्तकाला गादीवर बसवून राज्य कारभार चालवला जायचा. तसेच सध्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करीत आहेत.
"नवपेशवाई आपली नाकेबंदी करू पाहतंय, मनुस्मृती लादून पुन्हा युद्धकैदी करू पाहतंय. हे होऊ न देण्याचा संकल्प करा. देशातील तमाम धर्मनिरपेक्ष, समता व लोकशाही मूल्य जपणाऱ्या लोकांना एकत्र येऊन नवपेशवाईचे समूळ उच्चाटन करा."
3. कुणीही हिंदू भारत विरोधी असू शकत नाही - मोहन भागवत
हिंदू असेल, तर तो देशभक्त असायलाच हवा. कारण ते त्याच्या मुळातच आहे. तो झोपलेला असू शकतो, त्याला उभे करावे लागेल. मात्र, कुणीही हिंदू भारत विरोधी असू शकत नाही, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते 'मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज' नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, "गांधीजी म्हणाले होते की, माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. मी माझा धर्म समजूनच एक चांगला देशभक्त बनेन आणि लोकांनाही असंच करायला सांगेन. एवढंच नाही, तर स्वराज्य समजून घ्यायचं असेल, तर स्वधर्माला समजून घ्यावं लागेल."
4. 'सामना'तील लिखाण आक्षेपार्ह - चंद्रकांत पाटील
'सामना'तून आपल्यावर गलिच्छ भाषेत टीका होत असल्याविषयी तक्रार रश्मी ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter
चंद्रकांत पाटील यांनी हा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
'सामना'मधून गलिच्छ टीका झाली, असं म्हणणं योग्य नाही. 'सामना'त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच 'सामना'चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा 'सामना'त लिहिली जाते, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं.
5. चार जानेवारीनंतर आंदोलन तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
शेतकरी आंदोलनाचा आज (02 जानेवारी) 37वा दिवस आहे. मोदी सरकारच्या शेती कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images
4 जानेवारी रोजी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. अशातच शेतकरी संघटनांनी 4 जानेवारीपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांची पुन्हा एकदा 4 जानेवारीला सरकारसोबत चर्चा होणार आहे. या चर्चेत जर आमच्या मागण्यांबाबत जर तोडगा निघाला नाही तर मात्र आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील, असं म्हणत शेतकऱ्यांनी आता आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























