शेतकरी आंदोलनः सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलकांना नवीन वर्षाकडून काय अपेक्षा आहेत?

शेतकरी आंदोलन, शेतकरी,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलक
    • Author, रुपा झा
    • Role, बीबीसी भारतीय भाषांच्या प्रमुख
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. हरियाणा आणि पंजाबमधील या शेतकऱ्यांना नव्या वर्षाकडून खूप अपेक्षा आहेत.

आंदोलनाला सुरुवात होऊन महिनाभराचा कालावधी झाला आहे. केंद्र सरकारशी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये आतापर्यंत त्यांच्या हाती काही फारसं लागलेलं नाही. पण विजय आमचाच होईल असं त्यांचं म्हणणं आहे.

शेतकऱ्यांची प्रमुख मागणी हीच आहे की सरकार तीन कृषी कायदे कसे रद्द करणार आहे? तिन्ही कायदे रद्द व्हायला हवेत अशी त्यांची मागणी आहे. हे काळे कायदे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.

मागण्यांसाठी शेतकरी आंदोलक दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दिल्ली आणि परिसरात प्रचंड थंडी असते. तापमान 3-5 डिग्री पर्यंत खाली उतरतं. खुल्या हवेत वावरताना पारा शून्यावर गेला असल्यासारखं वाटतं. शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवरती तंबूंचं शहरच उभं केलं आहे.

सिंघू बॉर्डरवर जशी रात्र गहिरी होते, तापमान वेगाने खाली घसरतं. मात्र शेतकरी आंदोलकांच्या उत्साहावर जराही परिणाम होताना दिसत नाही.

2020 वर्ष इतिहासात नोंदलं गेलं आहे. कोरोना संकटामुळे नाही तर शेतकरी आंदोलनासाठीही लक्षात ठेवलं जाईल. गेल्या काही वर्षात असं आंदोलन देशवासीयांनी पाहिलेलं नाही.

गुरुवार-शुक्रवारी म्हणजेच 31च्या रात्री अख्खा देश 2020ला अलविदा करून नव्या वर्षात पदार्पण करत असताना सिंघू बॉर्डरवर कसं वातावरण आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही तिथे पोहोचलो.

काही शेतकरी बांधवांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याने नववर्षाचं स्वागताचा जल्लोष केला जाणार नाही असं इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं.

शेतकरी या आंदोलकांना शहीद असं संबोधतात. मात्र नव्या वर्षाकडून त्यांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत.

या अपेक्षा कोणत्या स्वरुपाच्या आहेत? येत्या काही महिन्यात ते कोणता बदल पाहू इच्छित आहेत? आंदोलन करताना त्यांना नाऊमेद झाल्यासारखं वाटतं का? असे प्रश्न आम्ही त्यांना विचारले.

विविध स्तरातील लोकांचा संघर्ष

शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पोहोचलेल्या रुपिंदर कौर यांनी सांगितलं की, हा केवळ शेतकऱ्यांचा संघर्ष नाही तर समाजातील प्रत्येक वर्गाचा संघर्ष आहे.

रुपिंदर कौर चंदीगढला राहतात आणि सहाय्यक प्राध्यापक आहेत.

शेतकरी आंदोलन, शेतकरी, सिंघू बॉर्डर
फोटो कॅप्शन, रुपिंदर कौर

त्या सांगतात, "हा आमच्या अस्तित्वाचा संघर्ष आहे. समाजातील विभिन्न घटकांचा संघर्ष आहे. नव्या वर्षात निर्भीड व्हा असा संदेश आम्ही देऊ इच्छितो".

नववर्षाच्या एक दिवस आधीच शेतकरी नेत्यांनी लोकांना जास्तीजजास्त संख्येने आंदोलनस्थळी पोहोचण्याचं आवाहन केलं होतं.

शेतकरी आपलं घरदार सोडून आले आहेत, रस्त्यावर राहत आहेत. नव्या वर्षी त्यांची साथ द्यायला या.

रुपिंदर कौर स्वत: शेतकरी नाहीत. मात्र त्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. नव्या वर्षीच्या सुरुवातीला त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावली.

शेतकरी आंदोलन, शेतकरी, सिंघू बॉर्डर
फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलक

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पंजाबचे शेतकरी हरियाणामार्गे दिल्लीच्या सीमेवर जाऊन थडकले होते. यानंतर हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले. आता या आंदोलनाला एक महिना झाला आहे.

लोकांच्या सहकार्यामुळे या शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी दैनंदिन आवश्यक गोष्टी मिळत आहेत. मात्र प्रचंड थंडीमुळे इथली परिस्थिती कठीण होऊन जाते. महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी इथे राहणं अवघड आहे.

हा महिना कसा गेला? यावर मोगाहून आलेले ज्येष्ठ नागरिक अमरजीत सिंह म्हणाले, "खूप अडचणी आल्या. मात्र आमच्यात चांगलं सहकार्य आहे. आंदोलनाच्या सुरुवातीपासून माझा मुलगा आंदोलनात आहे. आता तो घरी परतला आहे तर गेल्या दहा महिन्यांपासून मी इथे आहे".

2020 कसं गेलं?

आंदोलनात सहभागी एक शेतकरी म्हणाला, "सरतं वर्ष आमच्यासाठी अत्यंत कठीण काळ होता. कोरोनाच्या संकटाने आपल्याला घेरलं होतं. त्यानंतर सरकारने आणलेले हे काळे कायदे. अख्खं वर्ष वाईट गेलं.

आशा आहे की हे काळे कायदे रद्द व्हावेत आणि आमची शेती वाचावी".

घरची आठवण येत नाही का? यावर म्हणाले, "आम्ही इथे राहतोय याने फरक पडत नाही. इथे चांगलं आहे. गावी तर एकेकटं घर असतं. तेच तेच पाहतो. इथे रंगीबेरंगी दुनिया आहे".

शेतकरी आंदोलन, शेतकरी, सिंघू बॉर्डर, कृषी कायदे
फोटो कॅप्शन, सुखविंदर सिंह

अमृतसरहून आलेले सुखविंदर सिंह स्वत: शेतकरी नाहीत. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचं त्यांना वाटतं.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "मी शेतकरी नाही, माझ्याकडे जमीन नाही पण .. आहे.

आपलं घरदार सोडून लाखो शेतकरी रस्त्यावर आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्या मागण्या मान्य व्हायला हव्यात. कृषी कायदे रद्द व्हायला हवेत. त्यांनी आनंदाने घरी परतावं आणि नव्या वर्षाचं स्वागत करावं असं त्यांना वाटतं.

'आम्ही इथून हलणार नाही'

वीरपल कौर 26 नोव्हेंबर पासून या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्या म्हणतात, "26 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या आंदोलनात रोज थोडा बदल होत आहे. आम्ही आलो तेव्हा ट्रॉलीमध्येच घर तयार केलं होतं. आता हळूहळू यजमान नागरिकांची (आंदोलनाचे समर्थक) वाढत गेले आणि आत आंदोलन या पातळीवर पोहोचलं आहे. आता हे एक गावच झालंय."

शेतकरी आंदोलन, शेतकरी, सिंघू बॉर्डर, कृषी कायदे
फोटो कॅप्शन, वीरपल कौर

त्या म्हणाल्या, "लोक सांगतात की सरकार आणि पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत काही निर्णय होत नाहीये. पण असं नाहीये. प्रत्येक बैठकीनंतर लोकांच्या समजुतीत वाढ होत आहे. लोकांमध्ये एकात्मता वाढत आहे. हुरुप वाढत आहे."त्या म्हणाल्या, "जेव्हा आम्ही पंजाबातून बाहेर पडलो तेव्हा हा कायदा रद्द करूनच परतू असा निश्चय केला होता. त्यामुळे आम्ही कधीच निराश होत नाही."

30 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या दोन मागण्या सरकारने मान्य केल्या. परंतु जोपर्यंत सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. बीबीसी पंजाबी सेवेचे प्रतिनिधी खुशहाल लाली शेतकऱी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून बातम्या पाठवत आहेत.

खुशहाल म्हणतात, " या आंदोलनाने तीन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पहिली म्हणजे पंजाबची समृद्ध संस्कृती यामुळे सिद्ध झाली. दुसरी म्हणजे हा एक लोकशाही देश आहे आणि इथले लोक लोकशाही मार्गाने आपले हक्क मिळवण्यासाठी सक्षम आहेत. आणि तिसरी म्हणजे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा होत आहे."

2021 कसं असावं?

पंजाबच्या मोगामध्येच राहाणारे रमणसिंहसुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. ते सरकारच्या प्रतिनिधींविषयी थेट नाराजी व्यक्त करतात. ते म्हणतात, "2020मधली एखादी गोष्ट परत येऊ नये अशी वाटते ती म्हणजे हे सरकार."

ते म्हणाले, येणाऱ्या काळात हा देश सुखी संपन्न व्हावा, माणसांना लूटलं जाणार नाही एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.आंदोलन स्थळाचा उल्लेख करुन ते म्हणतात, "इथं जसं प्रेम दिसतंय तशी प्रेमभावना सगळ्या देशात पसरावी."

शेतकरी आंदोलन, शेतकरी, सिंघू बॉर्डर, कृषी कायदे
फोटो कॅप्शन, रमणसिंह

शेवटी आमची भेट दिल्लीत राहाणाऱ्या मनप्रित सिंह यांच्याशी झाली. आयटी क्षेत्रात काम करणारे मनप्रित कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. पण नववर्षाची सुरुवात साजरी करायला सिंघु सीमेवर आले होते.

शेतकरी आंदोलन, शेतकरी, सिंघू बॉर्डर, कृषी कायदे
फोटो कॅप्शन, मनप्रीत

ते म्हणाले, " प्रत्येक वर्षी मी माझ्या मित्रांबरोबर हा क्षण साजरा करतो. यावेळेस मला इथं माझ्या बंधुंबरोबर एकत्र येणं महत्त्वाचं वाटलं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)