You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला
कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती आणि जनता दलचे (सेक्युलर) नेते एस. एल. धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला आहे. चिकमंगळुर या त्यांच्या मूळगावी हा प्रकार घडल्याचे समजते.
एस. एल. धर्मेगौडा यांची सुसाईड नोटही सापडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
धर्मेगौडा यांचा मृतदेह सोमवारी मध्यरात्री दोन वाजता रेल्वे रुळावर आढळला, ते 64 वर्षांचे होते.
15 डिसेंबरला कर्नाटक विधानपरिषदेत गो-हत्या बंदी विधेयकावरून जोरदार गोंधळ घालण्यात आला. काँग्रेस आमदारांनी या विधेयकाला विरोध केला. यावेळी उपसभापतींना त्यांच्या खुर्चीवरून खाली खेचण्यात आले. या घटनेमुळे धर्मेगौडा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते.
धर्मेगौडा यांच्या मृत्यूमुळे आता कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल अशी माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी संध्याकाळी सात वाजता धर्मेगौडा यांनी घर सोडले. त्यांच्या खासगी वाहनातून ते बाहेर गेले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक नव्हते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत."
नेमकं काय घडलं?
"ते त्यांच्या खासगी कारमधून गेले आणि संध्याकाळी 6.45 च्या सुमारास होनसागरा गावापाशी पोहोचले. जेव्हा ते परत आले नाहीत, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना फोन केला आणि मोबाईल टॉवरच्या माध्यमातून त्यांनी धर्मेगौडा यांचा ठावठिकाणा शोधला. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास आम्हाला त्यांच्याबद्दल कळलं, अशी माहिती भाजप नेते सीटी रवी यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना दिली.
धर्मेगौडा यांच्या खिशात चिठ्ठी सापडल्याचंही रवी यांनी सांगितलं. "आपल्या संपत्तीच्या वाटपाबद्दल त्यांनी सूचना देऊन ठेवल्या आहेत आणि कुटुंबीयांची माफी मागितली आहे," असंही रवी यांनी सांगितलं.
धर्मेगौडा यांचा राजकीय प्रवास स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सुरू झाला होता. त्यानंतर ते आधी विधानसभेत आणि नंतर विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले होते.
धर्मेगौडा यांचे बंधू एसएल भोजेगौडा हेसुद्धा आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे नेते एचडी देवेगौडा यांनी धर्मेगौडा यांच्या धक्कादायक मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, "एसएल धर्मेगौडा यांच्या मृत्यूची बातमी समजल्यावर धक्का बसला. त्यांचे व्यक्तिमत्त्व शांत आणि साधे होते. त्यांच्या जाण्याने राज्याचे नुकसान झाले आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)