जम्मू-काश्मीरच्या राजौरीतील 'ती' चकमक बनावटच असल्याची लष्कराकडून कबुली

फोटो स्रोत, Tauseef mustafa
- Author, माजिद जहाँगीर
- Role, बीबीसी हिंदीसाठी, श्रीनगरहून
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
काश्मीरमध्ये तीन मजुरांची 'कोणत्याही हेतू-विना' हत्या केल्याप्रकरणी भारतीय लष्करातील एका जवानाला दोषी ठरवण्यात आलं आहे.
काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी या तिन्ही हत्या झाल्या होत्या. 18 जुलै 2020 रोजी झालेल्या एका चकमकीत जम्मूत राजौरी जिल्ह्यात हे तीन तरूण मारले गेले होते. लष्कराने हे तिघेही तरुण अज्ञात कट्टरवादी असल्याचं त्यांच्याबाबत सांगितलं होतं. पण या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतलं असून तिघे तरूण राजौरी जिल्ह्यातील मजूर असल्याचं तपासात समोर आलं आहे.
मारले गेलेले तिघे कोण?
इम्तियाज अहमद (21), अबरार अहमद (25) आणि मोहम्मद इबरार (17) अशी या तीन तरुणांची नावे आहेत. तिघंही चुलत भावंडं होती.
तिन्ही तरुण राजौरी जिल्ह्याचे रहिवासी होते. शोपियांमध्ये ते मजुरीच्या कामासाठी गेले होते.
इबरार कुवैतहून सहा महिन्यांपूर्वी परतले होते. भारतात परतल्यानंतर ते आपल्या वडिलांची कामात मदत करत होते, असं त्यांच्या वडिलांनी बीबीसीला बोलताना सांगितलं होतं.
शोपियांमध्ये तिघंही एक खोली भाड्याने घेऊन राहत होते.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
चकमकीनंतर 22 दिवसांनी सोशल मीडियावर तिघांचाही फोटो व्हायरल झाला. पण, हे तरूण कट्टरवादी नसून जम्मू जिल्ह्यातील राजौरीमधले मजूर असल्याचं कॅप्शन फोटोसोबत लिहिलं होतं. लष्कराने केलेल्या गोळीबारात तिघे तरुण मारले गेल्याचं व्हायरल पोस्टमध्ये सांगण्यात येत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
10 ऑगस्ट 2020 रोजी श्रीनगरमध्ये लष्कराच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
18 जुलै 2020 ला झालेल्या चकमकीच्या संदर्भात सोशल मीडियावरील माहितीची आम्ही नोंद घेतली आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या तिघांची ओळख पटू शकलेली नाही. प्रोटोकॉलनुसार मृतदेहांचं दफन करण्यात आलं आहे. लष्कराकडून यासंदर्भात सखोल तपास करण्यात येत असल्याचंही प्रवक्त्यांनी सांगितलं.
याच्या एका आठवड्यानंतर 18 ऑगस्ट 2020 ला लष्कराकडून आणखी एक प्रतिक्रिया आली.
"शोपियां अमशिपोरामध्ये 18 जुलै 2020 रोजी झालेल्या चकमकीच्या संदर्भात तपासासाठी 11 ऑगस्ट 2020 ला एक उच्चस्तरीय समिती बनवण्यात आली होती. या समितीचा तपास सुरू आहे," असं लष्कराने सांगितलं.
त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या नेतृत्वाखाली एक पथक राजौरीला गेलं होतं. तिन्ही कुटुंबीयांच्या डीएनएचे नमुने पोलिसांकडून घेण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
"प्रमुख साक्षीदारांची साक्ष घेण्यात येत होती. तपासाच्या संपूर्ण प्रक्रियेवर सूक्ष्म नजर ठेवण्यात येत आहे. याशिवाय, इतर साक्षीदारांनाही कोर्टात साक्ष देण्यास सांगितलं आहे. तसंच राजौरी येथून जम्मू-काश्मीर पोलिसांनी डीएनएचे नमुनेही आणले आहेत," असं याबाबत समितीने कळवलं.
18 सप्टेंबर 2020 ला श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी एक प्रतिक्रिया दिली.
"चकमकीचा तपास पूर्ण झाला आहे. प्राथमिक तपासात काही गोष्टी पुढे आल्या आहेत. अफस्पा कायद्याच्या अंतर्गत अधिकारांचा गैरवापर झाल्याचं यातून निदर्शनात येतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील दिशानिर्देशाचं उल्लंघन झाल्याचं दिसून येतं. यामध्ये दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे," असं त्यांनी म्हटलं.
"तसंच तपासात जे पुरावे गोळा करण्यात आले त्यामधून तिघेही तरुण राजौरीचे रहिवासी होते, हे कळून येतं. त्यांच्या डीएनए रिपोर्टची अद्याप प्रतीक्षा आहे. कट्टरवाद आणि त्याच्याशी संबंधित कृत्यांमध्ये त्यांच्या सहभागाचाही पोलीस तपास करत आहेत," असं कालिया यांनी म्हटलं होतं.
चकमकीनंतर सरकारनं काय म्हटलं?
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी चकमकीनंतर म्हटलं की, मृतांच्या नातेवाईकांना 'पूर्ण न्याय' मिळेल.मनोज सिन्हा ऑक्टोबरमध्ये राजौरीतील तरकसी गावात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांना भेटले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला.

फोटो स्रोत, Getty Images
लष्कराचं काय म्हणणं आहे?
गुरुवारी रात्री लष्करानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, "पुरावे गोळा करण्याचं काम पूर्ण झालं आहे. पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर सल्ल्यासाठी सूचवण्यात आलंय. भारतीय सैन्य ऑपरेशनच्या नैतिक संचालनासाठी कटिबद्ध आहे. यापुढे कायदेशीर कार्यवाहीला कुठलाच अडथळा येणार नाही, अशा पद्धतीने माहिती दिली जाईल."मृतदेहांना काढलं बाहेर
चकमकीनंतर मृतदेहांना बारामुला जिल्ह्याच्या गांटमुला कब्रस्तानात दफन करण्यात आलं होतं. ही जागा चकमकीच्या ठिकाणापासून सुमारे 100 किलोमीटर दूर होती.3 ऑक्टोबर 2020 रोजी स्थानिक प्रशासनाने तिन्ही मृतदेह बाहेर काढून त्यांच्या कुटुंबाकडे सोपवले.

कुटुंब आणि ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया आहेत?
कुटुंबीयांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.मोहम्मद इबरार यांचे वडील मोहम्मद युसूफ यांनी बीबीसीशी फोनवरून बोलताना म्हटलं की, "माझा मुलगा दहशतवादी नव्हता. जर माझा दहशतवादी असता आणि त्याने काही गुन्हा केला असता तर काहीच त्रास नसता झाला, पण तो निर्दोष होता. जेव्हा नायब राज्यपाल मनोज सिन्हा आमच्या घरी आले होते, तेव्हा त्यांना सांगितलं होतं की, मला माझ्या मुलाचा मारेकरी हवा आहे. मला पैसे नको. आमच्या मुलांना ज्यांनी मारलं, त्यांना फाशी झाली पाहिजे."ज्यावेळी त्यांना मी विचारलं की, तुम्ही चौकशीच्या कार्यवाहीने समाधानी आहात का, तर त्यांनी उत्तर दिलं,"मी पूर्ण विश्वासाने सांगत आहे की, चौकशी आणि कार्यवाहीमुळे समाधानी आहे. मला माझ्या मुलाचा मृतदेह मिळाला. चौकशी सुरू आहे. मी मनोज सिन्हा यांचे आभारी आहे. मी प्रशासन आणि सैन्याचे आभार मानतो की, त्यांनी हे स्वीकारलं की ही बनावट चकमक होती."युसूफ यांनी सांगितलं की, केवळ पाच लाखांची रक्कम पीडित कुटुंबाला दिली आहे. युसूफ म्हणतात, "ते (आमची मुलं) काही बकरे नव्हते, एवढी छोटी रक्कम घेऊन काय करू?"राजौरीचे सामाजिक कार्यकर्ते गुफ्तार अहमद मृतांच्या कुटुंबांसोबत कायम उभे राहिले. सैन्याकडून आलेल्या पत्रकावर गुफ्तार अहमद म्हणतात, या कृत्यात ये कुणी सहभागी झाले त्यांच्यावरील कारवाईची आम्ही वाट पाहतोय."आम्ही अंतिम निकालाची वाट पाहतोय. या गुन्ह्यात सहभागी झालेल्यांवर काय कारावई केली जाते, हे आम्ही पाहणार आहोत. या प्रकरणात आतापर्यंत सर्वात मोठी गोष्ट झाली ती म्हणजे, ज्या मृतांवर दहशतवादाचे शिक्के मारण्यात आले, ते पुसले गेले. बनावट चमकीत मारले गेलेले ते सर्व निर्दोष नागरिक होते. मृतांचे कुटुंबीय शेवटच्या निकालाची वाट पाहत आहेत. त्यांचं कोर्ट मार्शल होईल, त्यांना घरी पाठवलं जाईल की तुरुंगात जावं लागेल?" असे प्रश्न गुफ्तार अहमद विचारतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























