काँग्रेसः राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद द्या- नेत्यांची मागणी #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद द्या - नेत्यांची मागणी

पक्ष नेतृत्व आणि संघटनेतील अंतर्गत बदल याबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांपैकी काही नेत्यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक पार पडली. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद सोपवण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

या बैठकीत ठोस निर्णय मात्र झाला नाही. पुन्हा एकदा सिमला किंवा पंचमढी या ठिकाणी चिंतन शिबीर घ्यायचं ठरवलं गेलंय. मात्र, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, असं म्हणत राहुल गांधींनी अध्यक्षपदाच्या दृष्टीने सकारात्मक संकेत दिले आहेत.

कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक पुढच्या वर्षी जानेवारीच्या शेवटी होणार आहे.

जवळपास 5 तास चालेल्या या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पवन बंसल म्हणाले, "पक्षाला राहुल गांधी यांची गरज आहे. बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी आपले मत मांडले. बैठकीत सोनिया गांधींसह एकूण 19 नेते उपस्थित होते. कॉंग्रेसच्या धोरणांवर नाराज असलेले नेते देखील या वेळी उपस्थित होते."

तसंच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "सकारात्मक वातावरणात बैठक झाली. पक्षाच्या मजबूतीसाठी काही मुद्दे उपस्थित केले गेले. वर्किंग कमिटीची बैठक नियमीत होणार आहे. कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या होत्या."

2) सूडाच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी कोण असेल, तर तो मी - खडसे

भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा स्वत:वर अन्याय झाल्याचा दावा केला. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

राज्यातील स्थितीबाबत खडसेंना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, "राज्यात आता काय चाललं आहे, हे मला माहिती नाही. कारण मी घरी बसलो आहे."

मात्र, पुढे खडसे म्हणाले, "सूडाच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी कोणी असेल, तर तो एकनाथ खडसे आहे. माझ्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करण्यात आले."

जळगावातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं की, आपल्यावर सूडाच्या राजकारणातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी वरील 'सूडाच्या राजकारणा'चं विधान केल्याचं म्हटलं जात आहे.

3) ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा - उद्धव ठाकरे

"राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. जनतेचा विश्वास प्राप्त करा आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा," असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांना दिलेत. ईटीव्ही भारतने ही बातमी दिलीय.

जानेवारीत महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पक्षाच्या सर्व संपर्कप्रमुखांची बैठक घेतली होती.

तीसहून अधिक वर्षांची युती तोडून शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली आहे आणि सत्तेत आहे. यानंतर पहिल्यांदाच गावपातळीचा कौल या पक्षांना मिळणार आहे. हे तिन्ही पक्ष ग्रामपंचायतींना कसे सामोरे जातात आणि लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

4) गोवारी समाज आदिवासी नाही - सुप्रीम कोर्ट

गोवारी समाज आदिवासी नसल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने जाही केला आहे. त्यामुळे 14 ऑगस्ट 2018 रोजीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा गोवारी समाजाला अनुसूचित जमाती (ST) मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे. लोकसत्ताने ही बातमी दिलीय.

"गोंड गोवारी ही जमात 1911 पूर्वीच पूर्णपणे विलुप्त झाली होती. त्यामुळे तत्कालीन मध्य प्रांत व सध्याच्या मध्य प्रदेशात या जमातीच्या 1956 पूर्वीच्या अस्तित्वाच्या कुठल्याही खाणाखुणा आढळून येत नाहीत," असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे.

याआधी नागपूर खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले होते की, "गोवारी समाज हा आदिवासीच आहे. ही स्वतंत्र अनुसूचित जमात आहे. महाराष्ट्र राज्याशी संबंधित विशेष मागास वर्ग (एसबीसी) आणि केंद्र सरकारच्या इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) संयुक्त यादीत गोवारी समाजाची नोंद करण्यात आली असली तरी या समाजाला अनुसूचित जमातींसाठी देय असलेले लाभ नाकारता येणार नाही."

या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

5) फारु अब्दुल्लांविरोधात ED ची कारवाई, सुमारे 12 कोटींची मालमत्ता जप्त

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने कारवाई करत 11.86 कोटींची मालमत्ता जप्त केलीय. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या (JKCA) घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या निधी घोटाळ्याप्रकरणी ED ने फारुख अब्दुल्ला यांच्या एकूण सहा ठिकाणच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. यात तीन घरांचाही समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या कारवाईप्रकरणी टीका केलीय. जप्त केलेल्या मालमत्तांपैकी बहुतेक मालमत्ता वडिलोपार्जित असल्याचा दावा त्यांनी केलाय.

2005-06 ते 2011 या कालावधीत JKCA ला BCCI कडून 109.78 कोटी रुपये मिळाले होते, असं तपासात उघड झालंय. 2006-2012 यादरम्यान फारुख अब्दुल्ला JKCA चे अध्यक्ष असताना पदाचा गैरवापर करत या निधीचे ते लाभार्थी बनल्याचा दावा ED ने केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा..)