कोरोना व्हायरस : भारतातील रुग्णांची संख्या एक कोटीपर्यंत कशी पोहोचली?

फोटो स्रोत, Getty Images
भारतात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसची लागण झालेले 25 हजार 153 रुग्ण आढळून आले. यासोबत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक कोटींचा टप्पा पार केला आहे.
कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या सुमारे दीड लाखांच्या पुढे गेली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. भारतापेक्षा जास्त संसर्गाचं प्रमाण अमेरिकेत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 70 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी 2020 मध्ये आढळून आला. पण मार्च महिन्यापासून संसर्ग वेगाने वाढू लागला.
मार्च महिनाअखेरपर्यंत 1400 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर 35 जणांचा मृत्यू झाला होता.
सुरुवातीपासूनच दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वेगानं झाला. या राज्यात विशिष्ट ठिकाणी कोरोनाचा कहर सर्वाधिक होता.
ही ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून संबोधित करण्यात येत होती. यामध्ये निझामुद्दीन, दिलशाद गार्डन, नोएडा, मेरठ, भिलवाडा, अहमदाबाद, मुंबई, पुणे, कासरगोंड आणि पथानामथिट्टा.
लॉकडाऊन आणि वाढता आलेख
22 मार्चला जनता कर्फ्यू लावला गेला. तर 25 मार्च (24 मार्च मध्यरात्रीपासून) लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पहिलं लॉकडाऊन 25 मार्च ते 14 एप्रिल असं 21 दिवसांचं होतं. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे लॉकडाऊन लावण्यात आल्याचं सरकारने म्हटलं होतं.
पण पहिलं 21 दिवसांचं लॉकडाऊन संपणार होतं तोपर्यंत 14 एप्रिलपर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येनं 10 हजारांचा टप्पा पार केला होता. तोपर्यंत 353 जणांचा मृत्यू झाला होता.

यानंतर कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले. एका महिन्यानंतर यामध्ये दहापट वाढ पाहायला मिळाली. 19 मे 2020 रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला होता.
यादरम्यान, लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला. 31 मेपर्यंत हे लॉकडाऊन होतं. यानंतर पाचव्या टप्प्यातही 1 जून ते 30 जून लॉकडाऊन लावण्यात आलं. सरकारने याला अनलॉक-1 असं म्हटलं. या टप्प्यात गृह मंत्रालयाने अनेक निर्बंध हटवले. सगळे मिळून सुमारे 68 दिवस भारतात लॉकडाऊन होतं.
यादरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनशिवाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टींग यांच्यासारखं धोरण स्वीकारलं.
संसर्गात वाढ
पहिल्या अनलॉकच्या घोषणेपर्यंत देशात कोरोनाचे एक लाख 90 हजार 535 रुग्ण होते. त्यावेळी पाच हजारपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
3 जूनला कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा आकडा पार केला. यावेळी देशात प्रतिदिन सरासरी 10 हजार रुग्ण आढळून येत होते.
पण, 1 जूनपासून अनलॉक सुरू झाल्यानंतर संसर्गाचं प्रमाण वेगाने वाढू लागलं. जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रतिदिन सरासरी 20 हजार रुग्ण आढळून येत होते.

फोटो स्रोत, Reuters
यादरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत एका आठवड्यात सरासरी एक लाखांची वाढ होत होती. त्यानंतर कोरोना संसर्गाचं प्रमाण वेगाने वाढू लागलं.
पुढे एक काळ असा आला, ज्यादरम्यान प्रतिदिन 90 हजारपर्यंत कोरोना रुग्ण देशात आढळून येत होते. सप्टेंबर महिन्यात प्रतिदिन सरासरी 93 हजार रुग्ण आढळून येत होते.
महत्त्वाचा टप्पा
जुलै महिन्याच्या मध्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा आकडा पार केला. याच्यानंतर 20 दिवसांतच 20 लाखांचा टप्पाही ओलांडला. यादरम्यान प्रतिदिन सुमारे 50 हजार रुग्ण देशात आढळून येत होते.
16 सप्टेंबरला भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखांपर्यंत पोहोचली. तोपर्यंत देशात तब्बल 80 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

आता याच्या तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट बनली. हा आकडा एक कोटींच्या पुढे गेला आहे. पण गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण तुलनेने कमी झालं आहे.
सध्या दररोज सरासरी 22 हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या संपूर्ण कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनप्रमाणेच अनलॉकसुद्धा पाच टप्प्यात लागू करण्यात आलं. शेवटचं अनलॉक 15 ऑक्टोबर रोजी लागू झालं. यामध्ये मल्टीप्लेक्स, सिनेमा गृह, थिएटर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.
भारतात सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाला. दिल्लीत कोरोना संसर्गाच्या तीन लाटा दिसून आल्या.

मार्चपासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत हळूहळू कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढू लागलं. भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण तुलनेने कमीच राहिलं.
भारतात जगातील 17 टक्के लोकसंख्या राहते. पण मृत्यूचं प्रमाण जगाच्या 10 टक्के इतकं राहिलं.

फोटो स्रोत, NOAH SEELAM/AFP VIA GETTY IMAGE
दुसरीकडे, भारतात कमी प्रमाणात चाचणी होत असल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातो. पण सरकारने आपण चाचण्या वाढवल्याचंच नेहमी म्हटलं आहे.
ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिदिन 10 लाख कोरोना चाचण्या करण्याचं लक्ष्य निर्धारित केलं होतं. पण दररोज सरासरी 5 लाख इतक्याच चाचण्या होत होत्या.
आतापर्यंत देशात 15 कोटी चाचण्या करण्यात आल्याचंही सरकारने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























