You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपच खरी तुकडे तुकडे गँग - सुखबीरसिंग बादल #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं, वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. भाजपच खरी तुकडे तुकडे गँग - सुखबीरसिंग बादल
भाजप देशातील खरी तुकडे तुकडे गँग असून त्यांनीच शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी केलाय. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
"भाजपने राष्ट्रीय एकतेचे तुकडे केले. निर्लज्जपणे मुस्लिमांविरुद्ध हिंदूंना भडकावलं. आता ते आपल्या शीख बांधवांविरोधात असं करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजप जातीय आगीत ढकलत आहे", अशी टीका बादल यांनी केली.
"आंदोलनात ज्येष्ठ नागरिक महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या खलिस्तानी दिसतात का? असा सवाल बादल यांनी सरकारला केला आहे. शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची हिंमत कशी झाली? तो हक्क भाजपला कुणी दिला? शेतकऱ्यांनी देशासाठी जीवन समर्पित केलं आहे. जे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत तेच गद्दार आहेत", असं बादल म्हणालेत.
2. बुलेट ट्रेनला मागे टाकून कांजुरची मेट्रो कारशेड पुढे जाईल - सामना
मुंबई मेट्रोची कारशेड कांजुरमार्गलाच होणार याचा पुनरुच्चार सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
'मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पात कुणी असा मिठाचा खडा टाकणार असेल तर त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कांजुरमार्गाला कारशेड झाल्याने केंद्र सरकारवर आकाश कोसळणार नाही. मिठाचे आयुक्त हे केंद्र सरकारचे नोकर आहेत. त्यामुळे मीठ आयुक्तांना महाराष्ट्राचं मीठ अळणी लागत असेल. आरेचं जंगल ठाकरे सरकारने वाचवलं, याचं कौतुक राहिलं बाजूला. कांजुरमार्ग कारशेड रोखण्याचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. कोणी कितीही उपद्व्याप करा. बुलेट ट्रेनला मागे टाकून कांजुरमार्गची कारशेड पुढे जाईल. राजकीय मिठाचा सत्याग्रह कारशेड रोखू शकणार नाही.'
असं सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आलं आहे.
'केंद्र सरकार पाकिस्तान किंवा बांगलादेशचं नाही. ते आपलंच आहे. मग चांगल्या कामात केंद्राचं मांजर आडवं का जात आहे? मुंबईच्या विकासात खोडा घालण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. आरेचं जंगल कुणाच्या मालकीचे नाही तसंच कांजुरमार्गच्या जमिनालाही बाप नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेची संपत्ती आहे. आरेतली कारशेड कांजुर मार्गला हलवण्याच्या निर्णयानंतर मीठ आयुक्तांना जाग आली आहे,' अशी टीका ही करण्यात आली आहे.
3. शेतकरी आंदोलनामुळे रोज 3500 कोटींचे नुकसान
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दररोज तब्बल 3500 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचं भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाने म्हटलं आहे.
शेतकऱ्यांचं आंदोलन असंच सुरबच राहिलं, तर याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यताही उद्योग मंडळाने वर्तवली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वितरण साखळी तसंच दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर राज्यांच्या अर्थव्यवस्थांचा आकार जवळपास 18 लाख कोटी रुपये आहे.
शेतकरी आंदोलनामुळे रस्ते, टोल नाके, रेल्वे सेवा बंद असल्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार थांबले आहेत, असं वाणिज्य आणि उद्योग मंडळाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितलं. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
4. बाल संगोपन संस्थांमधील बालकांना दरमहिना २ हजार रुपये द्या- सर्वोच्च न्यायालय
देशाच्या विविध भागांमध्ये बाल संगोपन संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांना शिक्षणासाठी दरमहिना प्रत्येकी दोन हजार रुपये राज्य सरकारांनी द्यावेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
कोरोना संकटामुळे बाल संगोपन संस्थांमधील मुलांना त्यांच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलं होतं. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राज्य सरकारने महिनाभरात बाल संरक्षण कायद्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील केंद्रांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देता यावं यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. पाठ्यपुस्तकांसहित ऑनलाईन शिक्षणासाठीच्या सुविधांचाही समावेश असेल. न्यायाधीश एल.नागेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला.
देशातल्या बाल संगोपन संस्थांमध्ये जवळपास 2,27,518 विद्यार्थी होते. त्यापैकी 1,45,788 विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्यांकडे सोपवण्यात आलं होतं.
5. कोरोनाची लस घेतलेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली
कोरोनाची लस घेतलेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची प्रकृती ढासळल्याचं वृत्त आहे. अनिल यांनी 20 नोव्हेंबर रोजी लस घेतली होती. 'लाईव्हमिंट'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
अनिल यांच्या फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याचं स्पष्ट होतं आहे. रोहतक रुग्णालयातून त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
लस देऊनही अनिल यांना कोरोना झाल्याने भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यावर भारत बायोटेक आणि आयसीएमआरला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)