World Brain Tumor Day : डॉक्टर ट्यूमरचं ऑपरेशन करताना 'ती' पियानो वाजवत होती

    • Author, शुरैह नियाजी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, भोपाळहून
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

आज जागतिक ब्रेन ट्यूमर डे आहे. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका वेगळ्याच पद्धतीनं 9 वर्षांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ब्रेन ट्यूमर काढण्यात आला आणि हे सुरू असताना मुलगी पियानो वाजवत होती.

ग्वाल्हेरच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये डॉ. अभिषेक चौहान यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. त्यांनी रुग्णांच्या डोक्याच्या हाडातून ट्यूमर बाहेर काढला आणि आता मुलगी सुस्थितीत आहे.

मुरैना जिल्ह्यातल्या बानमोरमधल्या सौम्याला सतत फिट यायची. गेल्या 2 वर्षांपासून ती त्यासाठी 4 औषधं घेत होती, पण तिला बरं वाटत नव्हतं.

एका वर्षांपूर्वी सौम्याला ब्रेन ट्यूमर असल्याचं समोर आलं. पण, यासंबंधीची शस्त्रक्रिया अवघडच नाही तर धोकादायही असते म्हणून शस्त्रक्रिया करायला तिच्या घरचे तयार नव्हते. शिवाय मुलगी आयुष्यभरासाठी अपंग होऊ शकते, अशीसुद्धा शंका त्यांच्या मनात होती.

कुटुंबीयांनी जेव्हा पुन्हा एकदा मुलीच्या डोक्याची तपासणी केली तेव्हा ट्यूमरचा आकार पहिल्यापेक्षा चारपटीनं वाढल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

ही शस्त्रक्रिया मोठ्या शहरात करण्याची कुटुंबीयांची इच्छा होती. पण, तिथला खर्च ग्वाल्हेरमधल्या खर्चापेक्षा तीनपट अधिक होता. त्यामुळे मग ग्वाल्हेरमध्येच शस्त्रक्रिया करण्याचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला.

डॉ. अभिषेक चौहान यांनी बीबीसीला सांगितलं, "हे एक अवघड ऑपरेशन होतं. यात थोडी जरी गडबड झाली असती तर मुलीच्या जीवावर ते बेतलं असतं."

बिर्ला हॉस्पिटलच्या मते, जगभरात या प्रकाराच्या शस्त्रक्रियेचं हे दुसरं प्रकरण आहे ज्यात ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियेवेळी 9 वर्षांची मुलगी पियानो वाजवत होती.

डॉ. अभिषेक यांनी सांगितलं, "हे ऑपरेशन अव्हेक क्रेनोटामीच्या पद्धतीनुसार करण्यात आलं. कधीकधी ट्यूमर डोक्याच्या अशा भागात असतो जिथं मेंदूशेजारचा तो भाग असतो जो आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कामांना नियंत्रित करत असतो."

ते पुढे सांगतात, ट्यूमरला काढताना डोक्यातल्या काही मिलीमीटर भाग जरी बाहेर काढला गेला, तर त्यामुळे नियंत्रित कामं आयुष्यभरासाठी करता येत नाहीत.

ते सांगतात, "अव्हेक क्रेनोटामीमध्ये रुग्णाला बेशुद्ध केलं जात नाही. शस्त्रक्रिया ज्या भागावर केली जाणार तो भाग सुन्न केला जातो आणि ट्यूमर काढताना डॉक्टर रुग्णाकडून वेगवेगळी कामं करून घेतात. शस्त्रक्रियेदरम्यान जेव्हा उपकरण आवश्यक भागाला स्पर्श करतं, तेव्हा त्या भागाकडून नियंत्रित केली जाणारी कामं थांबतात. ही बाब डॉक्टरच्या लगेच ध्यानात येते आणि मग ते सतर्क राहतात."

अशाप्रकारे डोक्यातील उपयुक्त भागाला कोणतीही हानी न पोहोचवता ब्रेन ट्यूमर काढला जातो.

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगात याहून कमी वयाच्या एकाच मुलाचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. बंगळुरूमध्ये ते झालं होतं. लहान मुलांचं असं ऑपरेशन करणं खूप अवघड काम असतं.

आता ही मुलगी सुस्थितीत असून तिला दवाखान्यातून सुट्टी देण्यात आल्याचं डॉक्टर अभिषेक यांनी सांगितलं आहे.

सौम्याचे मामा सूरज सिंग यांनी बीबीसीला सांगितलं की, "आता त्यांचं सगळं कुटुंब खूश आहे. तिचा ट्यूमर वाढत चालला होता. तिनं एकदाही औषध घेतलं नाही, तर तिला झटके येत असत. पण आता ऑपरेशननंतर तिली बरं वाटत आहे. "

सौम्या इयत्ता चौथीत शिकते. आता ती इतर मुलांप्रमाणे राहू शकेल, अशी आशा तिचे पालक व्यक्त करतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)