कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेचं असं असेल नियोजन

फोटो स्रोत, SOPA IMAGES
कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड-19 लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी कृती दल (सिटी टास्क फोर्स) गठीत करण्यात आला आहे.
लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज दुपारी कृती दलाची पहिली बैठक पार पडली.
यावेळी काकाणी म्हणाले, "शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 ची लस उपलब्ध झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी योग्य तयारीसह आणि पूर्व नियोजनानं करणं आवश्यक आहे. सिटी टास्क फोर्सप्रमाणे क्षेत्रीय स्तरावरील (विभाग कार्यालय स्तर) समिती गठीत करण्याची कार्यवाही देखील लवकर पूर्ण करायची आहे. मोहिमेतील सहभागी मनुष्यबळास आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे."
"प्रत्यक्ष लसीकरण करण्यासाठी पाच जणांचे एक, याप्रमाणे मुंबईत सुमारे 500 पथकं नेमली जातील. लसीकरणाच्या लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या सर्व कार्यवाहीसाठी व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. सर्वांत आधी आरोग्य सेवक, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, नंतर वय वर्षं 50 पेक्षा अधिक आणि इतर नागरिक या क्रमाने लसीकरण करण्याचे नियोजित आहे. सर्व यंत्रणांनी प्रत्येक टप्प्यावर नेमून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. त्यासाठी सिटी टास्क फोर्सच्या माध्यमातून संपूर्ण देखरेख केली जाईल."

फोटो स्रोत, Getty Images
सहाय्यक आरोग्य अधिकारी (लसीकरण) डॉ. शीला जगताप यांनी सिटी टास्क फोर्स आणि कोविड-19 लसीकरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण करुन तपशीलवार माहिती दिली.
त्यांनी सांगितलं, "मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एस विभागात कांजूरमार्ग येथील एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर कोविड-19 प्रतिबंधात्मक लस साठवणुकीची पूर्व तयारी करण्यात आली आहे. सुमारे 5,000 चौरस फूट क्षेत्राची ही जागा प्रादेशिक लस भांडार (Regional Vaccine Store) म्हणून निर्देशित करण्यात आली आहे.
"शासन तसेच जागतिक आरोग्य संघटना यांनी लस वाहतूक, साठवणूक, लसीकरण केंद्रातील व्यवस्था, लसीकरणाचे प्राधान्य इत्यादी सर्व बाबींचे निर्देश ठरवून दिले आहेत. लसीकरण कार्यक्रमात सर्व सांख्यिकी माहिती संकलित करुन त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म देखील शासनाकडून तयार करण्यात आला आहे. पूर्व तयारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या दोन्ही टप्प्यांमध्ये महानगरपालिकेसह सर्व सहभागी यंत्रणांना जबाबदारी नेमून देण्यात आली आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























