योगी आदित्यनाथ म्हणतात, 'हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार' #5मोठ्याबातम्या

योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, NurPhoto

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार - योगी आदित्यनाथ

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हैदराबादेत आहेत.

प्रचारादरम्यान त्यांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर करण्याचं आश्वासन दिलं. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

योगी आदित्यनाथांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मलकजगिरी भागात रोड शो केला. यावेळी त्यांनी एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना लक्ष्य केले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यांनी म्हटलं, "इथं आल्यानंतर मला अनेकांनी हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? असं विचारलं. मी त्यांना म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही?"

2. 'दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं', सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (28 नोव्हेंबर) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दिव्य मराठीनं या संदर्भातली बातमी दिलीय.

'दुनिया घुमलो, हमारे पुणे के आगे कुछ नही' असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लशीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये, असंही त्यांनी म्हटलंय. पुण्यात आयोजित मेळाव्यामध्ये बोलत होत्या.

सुप्रिया सुळे

फोटो स्रोत, Getty Images

त्या म्हणाल्या, "दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे. तसंच आम्हाला दिल्लीची सवय आहे. इथं मी ऐकलं की, 1500 कोटी, 1600 कोटींची विकासकामं केली जात आहेत. दिल्लीमध्ये तर एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. आम्ही त्या गप्पा ऐकतो.. आता हे कोण बोलतं हे तुम्हाला माहिती आहे. आज ते पुण्यात आहेत."

3. ...तर शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढणार - मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या 2 डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा अल्टिमेटम मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी (28 नोव्हेंबर) नाशिकमध्ये महत्वाची बैठक झाली.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला २ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्याचं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. येत्या 2 डिसेंबरपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील घरावर मोर्चा काढण्यात येईल, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

4. लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींकडून ताब्यात - पृथ्वीराज चव्हाण

लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काम होताना दिसतं आहे. त्यामुळे लोकांना घटनेत अभिप्रेत असणारा न्याय मिळणार का अशी शंका लोकांमध्ये निर्माण झाल्याचं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. सरकारनामानं ही बातमी दिलीय.

पृथ्वीराज चव्हाण

फोटो स्रोत, facebook

त्यांनी पुढे म्हटलं, 'पाच वर्षांच्या भाजपच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली होती म्हणून तीन पक्षांनी मिळून हे सरकार स्थापन केलं आहे. चांगलं काम करणारे हे भक्कम सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने रोज उठून बोटे मोडली म्हणून हे सरकार बदलणार नाही.'

5. तब्बल 240 मराठी चित्रपट दोन वर्षांपासून अनुदानासाठी रांगेत

तब्बल 240 मराठी चित्रपट गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यामध्ये नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर वर्षभरापासून चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना रखडल्यामुळे चित्रपट निर्माते अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. ही रक्कम सुमारे 25 कोटी रुपयांच्या आसपास आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

मराठी चित्रपटांना प्रोत्साहन म्हणून राज्य शासनातर्फे चित्रपटांना अनुदान दिले जाते. चित्रपटांना अनुदान देण्यासाठी राज्य शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेली समिती राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर बरखास्त झाली होती. त्यामुळे चित्रपट अनुदान समितीची पुनर्रचना करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती.

मात्र, मार्चमध्ये करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर या समितीची पुनर्रचना लालफितीच्या कारभारामध्ये अडकली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)