NDTV चे संस्थापक प्रणव रॉय यांच्यावर 2 वर्षांसाठी सेबीचे निर्बंध, आदेशाविरोधात कंपनी करणार अपील

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यावर 2 वर्षांसाठी निर्बंध लावले आहेत.

इतकंच नाही तर त्यांनी 12 वर्षांपूर्वी 'इनसायडर ट्रेडिंग'च्या माध्यमातून अवैधपणे कमावलेले 16.97 कोटी रुपये परत करण्याचे आदेशही दिले आहेत.

मात्र, या आदेशाविरोधात तात्काळ अपील करणार असल्याचं म्हणत कंपनीने आरोप फेटाळून लावले आहेत.

"इनसायडर ट्रेडिंगविषयी सेबीने दिलेला आदेश तथ्थ्यांच्या चुकीच्या आकलनावर आधारित आहे आणि अपील केल्यानंतर तपासणीत ते सिद्ध होणार नाही. आम्ही तात्काळ अपील दाखल करू," असं प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डीएमडी अॅडव्होकेट्सचे वरिष्ठ पार्टनर फेरेश्ते सेठना यांच्या नेतृत्त्वाखाली वकिलांनी म्हटलं आहे.

सेबीने एनडीटीव्हीच्या तीन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही दंड सुनावला आहे. यात कंपनीचे माजी सीईओ आणि सीएफओ यांचाही समावेश आहे.

याशिवाय, नियामक संस्थेने इनसायडर ट्रेडिंगच्या आरोपाखाली इतर सात व्यक्ती आणि कंपन्यांवरही एक ते दोन वर्षांसाठी निर्बंध लादले आहेत. यातल्या काहींना त्यांच्याकडे Unpublished Price Sensitive Information (UPSI) असताना अशाप्रकारच्या ट्रेडिंगच्या माध्यमातून अवैधपणे कमावलेले पैसे परत करण्याचेही आदेश दिले आहेत.

UPSI कंपनीच्या अंतर्गत विषयांशी संबंधित सार्वजनिक न केलेली माहिती असते. या माहितीच्या आधारावर एखादी व्यक्ती किंवा संस्था शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून नफा कमवत असेल तर अशा ट्रेडिंगला इनसायडर ट्रेडिंग म्हणतात. सेबीच्या 1992 च्या कायद्यानुसार इनसायडर ट्रेडिंग बेकायदेशीर आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)