भारत भालके : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं कोरोनामुळे निधन #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं शुक्रवारी (27 नोव्हेंबर) रात्री उशीरा पुणे इथं निधन झालं. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे आज (शनिवार, 28 नोव्हेंबर) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भारत भालके हे सलग तीनवेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी सर्वप्रथम अपक्ष, दुसऱ्यांदा काँग्रेस पक्षाकडून तर तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

भारत भालके यांना 30 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर वेळीच उपचार घेत त्यांनी त्यावर मात केली. पण काही दिवसांनी त्यांच्यी प्रकृती पुन्हा खालावली.

त्यांना पोस्ट कोव्हिड व्याधींनी ग्रासल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर गेले काही दिवस भारत भालके यांची प्रकृती चिंताजनकच होती. अखेरच्या काही दिवसांत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा पाहायला मिळाली नाही. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

2. कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद न्यायालयात

मुंबई येथील वादग्रस्त कांजुरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. कुलाबा ते सीप्झ (मेट्रो-3) या प्रकल्पासाठी पूर्वी आरे येथे नियोजित असलेलं हे कारशेड कांजुरमार्ग येथे हलवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. पण केंद्र सरकारने याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

कांजुरमार्गची प्रस्तावित जागा MMRDA ला देण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतरिम आदेशाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केंद्राने न्यायालयात केली.

याप्रकरणी पुढीत आठवड्यात सुनावणी होणार असून त्यावेळी युक्तिवाद केला जाणार आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

3. पुणे वगळता राज्यभरातील न्यायालयं दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

कोरोना संकटामुळे गेली 9 महिने बंद असलेली राज्यभरातील न्यायालयं दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील सर्व जिल्हा व इतर न्यायालयांना दिले आहेत.

कोव्हिड-19 संबंधित सुरक्षा नियमावलीचे पालन करून दोन शिफ्टमध्ये ही न्यायालयं सुरू करावीत, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे न्यायालयांचं कामकाज आता पुन्हा सुरू होऊ शकतं.

पण पुण्यातील न्यायालयांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे पुणे वगळता राज्यभरातील इतर न्यायालयांना ही सूचना देण्यात आली आहे.

न्यायालयात हजेरी लावताना मास्क बंधनकारक असेल. न्यायालयात सॅनिटायझर तसंच इतर सुरक्षा साधने उपलब्ध असावीत. ज्यांची सुनावणी असेल, त्यांना केवळ प्रवेश द्यावा. एकमेकांपासून अंतर राखावे, अशी सूचना उच्च न्यायालयाने दिली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.

4. तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही - राणे

"पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना धमकी देऊ नका. तुम्ही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत. आम्ही तुमच्या मागे लागलो तर झोप लागणार नाही," अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

टीव्ही 9 मराठी वाहिनीवरील मुलाखतीत नारायण राणे बोलत होते.

संजय राऊत यांनी नुकतीच 'सामना' दैनिकासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आक्रमक शब्दांत अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

यावेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तर केवळ मंत्रिपदांसाठी शिवसेनेसोबत गेली, असं नारायण राणे म्हणाले.

5. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसह कुणीही जाणार नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (28 नोव्हेंबर) पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पण त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कुणीही उपस्थित नसेल, अशी माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान मोदी हे कोरोना काळात अल्प स्वरुपातील दौरा करत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी कुणीही येऊ नये, अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून महाराष्ट्र प्रशासनाला करण्यात आली आहे. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)