शरद पवार : 'ते काल-परवाही पुन्हा येईन म्हणाले, आशा ठेवायला हरकत नाही' #5मोठ्याबातम्या

शरद पवार, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा

1. 'ते काल-परवाही पुन्हा येईन म्हणाले, आशा ठेवायला हरकत नाही' - शरद पवार

"निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही त्यांची सत्ता गेली याची ही अस्वस्थता आहे. त्यांनी मागेही 'मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन' असं म्हटलं होतं आणि काल परवाही असंच काहीसं म्हटलं आहे. त्यांनी आशा ठेवायला काहीही हरकत नाही," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली आहे.

भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (24 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी भाजपवर टीका केली.

"राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मिळणारा सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहून काही लोकांना नैराश्य आलं आहे. या नैराश्येतूनच हे सर्वकाही होत आहे. आपल्याला सत्ता मिळणार नाही, यासंबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे तो या माध्यमातून व्यक्त केला जात आहे," असं पवार म्हणाले.

ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

2. अयोध्या विमानतळाचं 'मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम' असं नामकरण

उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येत तयार होणाऱ्या विमानतळाचं नाव बदलून 'मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ' असं केलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (24 नोव्हेंबर) कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अयोध्या येथील विमानतळाचं काम सध्या सुरू असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रस्तावित राम मंदिराची प्रतिमा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रस्तावित राम मंदिराची प्रतिमा

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने कथित लव्ह जिहादविरोधातही अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. या अध्यादेशाचं नाव 'बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश 2020' असं आहे.

या अंतर्गत पीडितेला आर्थिक मदतीची आणि दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आंतरधर्मीय विवाहाबाबत हा कायदा आहे. ही बातमी एबीपी न्यूजने दिली.

3. सत्ता आली की माणसं कशी बदलतात याचं उदाहरण म्हणजे शिवसेना - देवेंद्र फडणवीस

'व्हॅलेंटाइन डे'ला विरोध करणारी, जोडप्यांना मारझोड करणारी शिवसेना आज 'लव्ह जिहाद'च्या मुद्द्यावर जी भूमिका घेत आहे, ती भूमिका त्यांच्या अधःपतनाचा वेग दर्शवणारी आहे. सत्ता आली की माणसं कशी बदलतात याचं हे उदाहरण आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

"2014 ते 2016 दरम्यान शिवसेनेने व्हॅलेंटाइनबाबत घेतलेली भूमिका, केलेली आंदोलनं आठवा. संजय राऊत यांनी सामनात लिहिलेले अग्रलेख आठवा. आता सत्ता आल्यानंतर सगळं बदललं," असं फडणवीस म्हणाले.

"दरम्यान, महाविकास आघाडी सरकार पडण्याची आम्ही वाट बघत नाही. हे सरकार आपल्या वजनाने पडेल, असलं सरकार चालत नसतं. हे सरकार ज्यादिवशी पडेल त्यावेळी आम्ही सरकार स्थापन करू," असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

4. लॉकडाऊनबाबत अद्याप निर्णय नाही - राजेश टोपे

"अनलॉक मोठ्या प्रमाणात केल्याने दुसरी लाट कदाचित येऊ शकते, पण ती किती मोठी असेल हे सांगता येत नाही. जनहिताचा दृष्टीने आपल्याला अनलॉक करावं लागलं, पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत अद्याप सरकारचा निर्णय झालेला नाही," असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

ही बातमी झी 24 तासने दिली.

राजेश टोपे

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

"सध्या राज्याची स्थिती समाधानकारक आहे. संख्या कमी झाली आहे. गोवा, केरळ, दिल्ली अनेक राज्यात वाढ होत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा वाढीचा दर खूप कमी आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टेस्ट कमी झाल्या. त्या पुन्हा वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे 2 हजारावर आलेला आकडा 4 हजारावर गेलेला दिसतोय," असं टोपे म्हणाले.

"कोरोना रुग्णसंख्या वाढत असेल आणि लोक ऐकणार नसतील तर काही निर्बंध टप्प्याटप्प्याने घालावे लागतील. याबाबत नियम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक होईल आणि छोटे निर्बंध लावता येतील का याचा निर्णय घेऊ. पण लॉकडाऊन नसेल, कुणीही घाबरण्याचं कारण नाही," असंही टोपे यांनी म्हटलं.

5. सूडाचे राजकारण असले तरी प्रताप सरनाईकांनी चौकशीला सामोरे जावे

"ईडीची नोटीस राज ठाकरे आणि शरद पवार यांनासुद्धा आली होती. ते दोघेही या नोटीसाला सामोरे गेले होते. त्यामुळे आता शिवसेना नेत्यांनीही सामोरे जावं," असा सल्ला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रताप सरनाईक यांना दिला आहे.

प्रताप सरनाईक

फोटो स्रोत, Facebook/Pratap Sarnaik

हे सूडाचे राजकारण जरी असलं त्यांनी तरी चौकशीला सामोरं जावं, असंही बाळा नांदगावकर म्हणाले. सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना नांदगावकर यांनी वरील वक्तव्य केलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी (23 नोव्हेंबर) सकाळी ईडीने धाड टाकल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. नांदगावकर यांनीही या प्रकरणावरून प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)