ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा ढासळता किल्ला प्रशांत किशोर सावरू शकतील?

प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी
    • Author, प्रभाकर मणि तिवारी
    • Role, कोलकत्याहून, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी ममता बॅनर्जी पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांची मदत घेणार आहेत.

या निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर सत्तारूढ तृणमूल काँग्रसचा ढासळता गड वाचवू शकतील का? हा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

बिहार निवडणुकांच्या वेळेस प्रशांत किशोर राजकीय रणधुमाळीतून आश्चर्यकारकरीत्या गायब होते. पण पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बसलेल्या झटक्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या राजकीय रणनितीची कमान सांभाळली होती.

आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला विजयाची हॅट्रिक मिळवून देण्याची जबाबदारी सांभाळणारे प्रशांत किशोर पक्षात वरिष्ठ नेत्यांच्या डोळ्यात खुपत आहेत. त्यांच्यामुळे पक्षात असंतोष वाढीला लागला आहे. अनेक आमदारांनी त्यांच्या विरोधातली नाराजी सार्वजनिकरित्या बोलून दाखवलेली आहे.

पूर्व मेदिनीपूरचे ताकदवान नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री शुभेंदु अधिकारी बऱ्याच काळापासून बंडाच्या पावित्र्यात आहेत. प्रशांत किशोरांनी त्यांचं मन वळवण्यासाठी आतापर्यंत जेवढे प्रयत्न केलेत तेवढे अयशस्वी ठरलेत.

2014 साली पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्याच्या पुढच्या वर्षी बिहारमधल्या महागठबंधनच्या प्रचार मोहिमा यशस्वीरीत्या चालवल्याने प्रशांत किशोर चर्चेत आले होते.

त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये त्यांना आपल्याकडे आणण्यासाठी चढाओढ लागली होती. त्या काळात प्रशांत किशोर म्हणजे विजयाची खात्री असं समीकरण बनलं होतं.

पण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी होणारे मतभेद आणि सीएएच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांना यावर्षी जानेवारीत जनता दल यूनायटेडमधून काढून टाकलं. 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये प्रशांत किशोरांचा सर्वत्र वावर होता पण यंदाच्या निवडणुकांमध्ये ते कुठेही दिसले नाहीत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आता नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर त्यांनी एक ट्वीट केलंय ज्यात ते लिहितात, "भाजपपुरस्कृत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन. मुख्यमंत्र्यांच्या रूपात एका थकलेल्या आणि राजकीय महत्त्व नसलेल्या नेत्यासोबत बिहारला आता येणाऱ्या काही वर्षांसाठी प्रभावहीन सरकारसाठी तयार राहिलं पाहिजे." गेल्या चार महिन्यातलं त्यांचं हे पहिलं ट्वीट होतं.

प्रशांत किशोर यांच्याबद्दलची वाढती नाराजी

मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बसलेल्या जोरदार झटक्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पुतणे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी प्रशांत भूषण यांना तृणमूल काँग्रेसच्या गटात घेऊन आले होते. प्रशांत किशोर यांची संस्था फर्म आय-पॅकचे हजारो कार्यकर्ते येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूलच्या विजयाच्या व्यूहरचनेवर काम करत आहेत.

पण त्यांच्या सल्ल्यावरून ममता बॅनर्जींनी जे निर्णय घेतले आहेत ते पक्षांचा अनेक नेत्यांना पसंत पडलेले नाहीत, विशेषतः त्यांनी सांगितलेल्या संघटनात्मक बदलांमुळे पक्षांचे अनेक जुने नेते नाराज झालेले आहेत.

परिवहन मंत्री शुभेंदू अधिकारी नाराज होण्यामागचं एक कारण हेही आहे. त्यामुळेच त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्यात प्रशांत किशोर अयशस्वी ठरले आहेत. शुभेंदू भाजपमध्ये जातील किंवा नवीन पक्ष काढतील असेही अंदाज लावले जात आहेत. शुभेंदू नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीतही गेले नाहीत.

परिवहन मंत्री शुभेंदु अधिकारी

फोटो स्रोत, Sanjay Das/BBC

फोटो कॅप्शन, परिवहन मंत्री शुभेंदु अधिकारी

पूर्व मेदिनीपुरच्या अंतर्गत ते नंदीग्राम येतं जिथल्या जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनाने ममतांच्या पक्षाचा सत्तेत येण्याचा मार्ग सुकर केला. इथे शुभेंदू तृणमूल काँग्रेस नाही तर व्यक्तिगत पातळीवर प्रचारसभा आयोजित करत आहेत.

नुकतंच तृणमूल काँग्रसेचे अनेक आमदार आणि नेत्यांनी प्रशांत किशोरांच्या मुद्द्यावरून सार्वजनिकरीत्या नाराजी व्यक्त केली आहे. या नेत्यांचा आरोप आहे की जुन्या-जाणत्या चेहऱ्यांना बाजूला करून नव्या नेत्यांना जागा करून दिली जातेय ज्यांनी गेल्या निवडणुकीत भाजपला समर्थन दिलं होतं.

प्रशांत किशोर, नीतीश कुमार, बिहार

फोटो स्रोत, SANJAY DAS

फोटो कॅप्शन, प्रशांत किशोर

मुर्शिदाबाद जिल्हातल्या हरिहरपाडाचे तृणमूल काँग्रेसचे आमदार नियामत शेख यांनी रविवारी एका प्रचारसभेत प्रशांत किशोर यांच्यावर हल्ला चढवला. त्यांचं म्हणणं होतं की, "पक्षातल्या सगळ्या समस्यांचं कारण प्रशांत किशोर आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी पक्ष बळकट केला आणि आता त्यांच्याशी बोलणाऱ्या नेत्यांवरही कारवाई केली जातेय."

त्यांचा प्रश्न आहे की आम्ही आता प्रशांत किशोर यांच्याकडून राजकारण शिकायचं का? नियामत याचं म्हणणं आहे की येत्या निवडणुकांमध्ये जर तृणमूल काँग्रेसला धक्का बसला तर त्यासाठी पूर्णतः प्रशांत किशोरच जबाबदार असतील.

इथे ही गोष्ट सांगायला हवी की मागच्या महिन्यात मुर्शिदाबाद जिल्हा मुख्यालय बरहमपुर टाउनमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या नावाने लावलेले पोस्टरमध्ये प्रशांत किशोर यांची टीम जबरदस्तीने देणग्या गोळा करते असे आरोप केले गेले होते.

विधायक नियामत शेख़

फोटो स्रोत, Sanjay Das/BBC

फोटो कॅप्शन, विधायक नियामत शेख़

पण या आरोपांचं खंडन करताना मुर्शिदाबादचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार अबू ताहिर खान म्हणतात की हे पोस्टर विरोधी पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी लावले होते.

कूचबिहारचे आमदार मिहीर गोस्वामी यांनीही सार्वजनिकरीत्या आपली नाराजी व्यक्त केली आहे. गोस्वामी यांनी सोशल मीडियावर आपल्या एका पोस्टमध्ये प्रश्न विचारला की तृणमूल काँग्रेस खरंच ममता बॅनर्जी यांचा पक्ष आहे? ते म्हणतात, "आता असं वाटतंय की हा पक्ष ठेकेदारांच्या हातात दिलाय. आता पक्षावर ममता बॅनर्जी यांचं काही नियंत्रण नाहीये. तृणमूल काँग्रेस पक्ष बदलला आहे. एकतर तुम्ही होयबा करा नाही तर पक्ष सोडा." मिहीर गोस्वामी यांनी सध्या सक्रिय राजकारणातून दूर राहाण्याचा निर्णय घेतला आहे.

याच जिल्ह्यातले सिताईचे आमदार असलेले जगदीश वर्मा बसुनिया म्हणतात, "येत्या निवडणुकांमध्ये जिंकायचं असेल तर सगळ्यांना आपला अंह सोडायला हवा. जुन्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचा कट रचला जातोय."

अचानक इतकी नाराजी का?

तृणमूल काँग्रेसचे एका जेष्ठ नेत्यांनी आपलं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "प्रशांत किशोर यांनी सगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यांनंतर एक रिपोर्ट तयार केला होता. त्याच आधारवर संघटनात्मक बदल केले गेले होते. प्रशांत किशोर यांनी असंतुष्ट नेत्यांचीही यादी बनवली होती. या बदलांचा हेतू स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना पुढच्या फळीत आणण्याचा होता."

प्रशांत किशोर यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही पण त्यांच्या टीमचा भाग असलेल्या एका सदस्याने आपलं नाव न छापण्याच्या अटीवर आम्हाला सांगितलं की, "आम्ही पक्षप्रमुख ममता बॅनर्जी आणि जेष्ठ नेत्यांच्या सल्ल्याने प्रचाराची व्यूहरचना ठरवतो आहोत. आमचं काम सल्ला देणं आहे. तो सल्ला अमलात आणायचा की नाही याचा निर्णय पक्षाचं नेतृत्व घेईल. त्यामुळे पक्षातल्या नाराजीच्या मुद्द्यावर मत मांडणं आमच्यासाठी योग्य ठरणार नाही."

विधायक जगदीश वर्मा बसुनिया

फोटो स्रोत, Sanjay Das/BBC

फोटो कॅप्शन, विधायक जगदीश वर्मा बसुनिया

राजकीय पर्यवेक्षक विश्वनाथ चक्रवर्ती म्हणतात की, "तृणमूल काँग्रेस सीपीएससारखा केडरवर आधारित पक्ष नाहीये. प्रशांत किशोर यांची टीम गटपातळीपासून प्रदेशपातळीपर्यंत पक्षात शिस्त आणि व्यावसायिक दृष्टिकोन आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे काही नेते नाराज होणं साहजिक आहे. पण पक्षप्रमुखांचा भरपूर पाठिंबा असल्याने या नाराजीचा प्रशांत किशोर यांच्या कामावर काही परिणाम होईल असं वाटत नाही."

बराच काळ पश्चिम बंगालच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेले जेष्ठ पत्रकार श्यामलेंदू मित्र म्हणतात की, "प्रशांत किशोर यांचा रस्ता यंदा बराच अवघड आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आमदार ममता बॅनर्जींना आपलं नेतृत्व मानतात. पण प्रशांत किशोरांच्या संघटनात्मक हस्तक्षेपामुळे नाराजी वाढतेय. त्यामुळे असं वाटतंय की आता त्यांना ते यश मिळणार नाही ज्यासाठी ते प्रसिद्ध आहेत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)