प्रकाश आंबेडकर म्हणतात, वीज बिलं भरू नका, तर मनसेही रस्त्यावर उतरणार : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) प्रकाश आंबेडकर म्हणतात, वीज बिलं भरू नका, तर मनसेही रस्त्यावर उतरणार
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला वीज बिलं न भरण्याचं आवाहन केलं आहे. नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकरांनी हे आवाहन केलं. ही बातमी लोकमतनं दिली आहे.
लोकांनी वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, वीज बिलात कुठलीही माफी अथवा सवलत नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. त्यानंतर सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.
लॉकडाऊन काळातील वीज बिलात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/PRAKASH AMBEDKAR
दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही वीज बिलांवरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिलीय.
वाढीव वीजबिलांविरोधात आता मनसे निदर्शनं आणि निषेध रस्त्यावर उतरून नोंदविणार असल्याची प्रतिक्रिया मनसे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे.
भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनीही वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
2) मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल - देवेंद्र फडणवीस
मुंबई महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला. झी 24 तासने ही बातमी दिली आहे.
मुंबई भाजपच्या कार्यकारणी बैठकीच्या समारोपात बोलताना फडणवीस म्हणाले, मुंबईतील नवी कार्यकारणी ही मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"कोरोना मृत्यू लपवले गेले आहेत, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रची भीषण अवस्था का? काही लोकांनी आपलेच चांगभल करून घेतले. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे. आम्ही आधी टीका करत नव्हतो, मात्र आता भ्रष्टाचारची लक्तरे टांगल्याशिवाय रहाणार नाही," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
कोरोनाच्या नावाने कोणाला कंत्राट द्यायचे याची चिंता होती. हे सर्व उघड केल्याशिवाय रहाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपांवर शिवसेनेकडून किंवा महाविकास आघाडीतील कुणा नेत्यांकडून अजून प्रतिक्रिया आलेली नाही.
3) महाराष्ट्रातील मंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध
जालना जिल्ह्यातील मंठा नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. बँकेनं वारेमाप कर्ज वाटप केल्याने कर्ज वसुली थकली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
या बँकेत ज्यांचं खातं आहे, त्यांना ठेवी काढण्यावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले आहेत. आरबीआयच्या या कारवाईने मंठा नागरी सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय नवीन कर्ज वाटप करता येणार नाही.
तसंच अनुदान, नूतनीकरण करता येणार नाही. पुढील सहा महिन्यात बॅंकेला इतर कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
त्यासोबतच कोणत्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारण्यास बंधन घालण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार (कर्ज, मुदतठेव, मुदतवाढ कर्ज, तारण) करता येणार नाही, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.
मंठा सहकारी बँकेवर १७ नोव्हेंबर २०२० पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुढील सहा महिने हे निर्बंध कायम राहणार आहेत. बँकेने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत.
4) लेह-लडाखला चीनचा भाग दाखवणाऱ्या ट्विटरकडून माफीनामा
लेह-लडाखला चीनचा भाग दाखवणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरनं भारताची लेखी माफी मागितली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत चूक दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं आहे. संसदीय समितीच्या अध्यक्ष खासदार मिनाक्षी लेखी यांनी याबाबत माहिती दिली. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
ट्विटरचे मुख्य प्रायव्हसी ऑफिसर डॅमियन केरिएन यांनी लेखी माफी मागितली असून, या महिन्या अखेरपर्यंत चूक दुरुस्त करण्याचं त्यांनी सांगितलं आहे, अशी माहिती खासदार लेखी यांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय नागरिकांच्या सेवेत आणि त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचेही ट्विटरने लेखी पत्रात म्हटलंय.
लेह-लडाखला चीनचा भाग दाखवण्याला ट्विटरने तांत्रिक चूक असल्याचं म्हटलं आहे.
5) बिहारमधील परभावावरून काँग्रेसमध्येच धुसफूस
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्यानंतर आता माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही बिहारमधील पराभवावरून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसला पराभवाचं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं पी. चिदंबरम म्हणाले. एनडीटीव्ही हिंदीने ही बातमी दिली आहे.
बिहारमध्ये काँग्रेसने 70 जागा लढवण्याबाबतही पी चिदंबरम यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बिहारमध्ये काँग्रेसची प्रत्यक्षात फारशी स्थिती चांगली नसून सुद्धा इतक्या जागा का लढवल्या, या दृष्टीने चिदंबरम यांच्या विधानाचा रोख होता.

फोटो स्रोत, Getty Images
याआधी कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या नेतृत्त्वावरच प्रश्न उपस्थित केले होते.
दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी मात्र पक्षावर टीका करणाऱ्यांना धारेवर धरलंय.
ज्यांना वाटतंय की काँग्रेस त्यांच्यासाठी योग्य पक्ष नाही, ते पक्ष सोडून जाऊ शकतात, असा थेट शाब्दिक हल्ला चौधरींनी केला आहे. काँग्रेसमध्ये राहून अशाप्रकारची विधानं पक्षाला कमकुवत करतात, असं चौधरी यांचं मत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)
























