IPL 2020 Final: मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोणता संघ मारणार बाजी?

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

कोरोना काळात होत असलेल्या आयपीएल 13 हंगामाच्या अंतिम लढतीत मुंबई आणि दिल्ली समोरासमोर असणार आहेत.

19 सप्टेंबर रोजी सुरू झालेला क्रिकेटमेळा 60व्या मॅचच्या निमित्ताने अंतिम टप्प्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 अशा चारवेळा जेतेपदांवर नाव कोरलं आहे. दुसरीकडे दिल्लीचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबईचा संघ सहाव्यांदा अंतिम लढतीत खेळणार आहे.

मुंबईचे बॅट्समन जोशात

मुंबईचे सगळेच बॅट्समन उत्तम फॉर्मात आहेत. सूर्यकुमार यादवने यंदाच्या हंगामात 148.23च्या स्ट्राईकरेटसह 461 रन्स केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. सलग तीन हंगाम चारशेपेक्षा जास्त रन्स करणारा मात्र भारतासाठी न खेळलेला सूर्यकुमार पहिलाच खेळाडू आहे.

यंदा सूर्यकुमारने फिनिशरची भूमिका अंगीकारण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई इंडियन्सचा भरवशाचा बॅट्समन अशी ओळख सूर्यकुमारने निर्माण केली.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव

इशान किशनने यंदाच्या हंगामात सातत्याने प्रभावित केलं आहे. मधल्या फळीत आणि रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानंतर सलामीवीर म्हणूनही इशानने छाप उमटवली आहे. इशानने यंदा 144.17च्या स्ट्राईकरेटने 483 रन्स कुटल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे.

क्विंटन डी कॉक याआधी दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद संघांसाठी खेळला आहे. मात्र मुंबईने क्विंटनच्या गुणकौशल्यांचा खुबीने उपयोग करून घेतला आहे. पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये तडाखेबंद सुरुवात करून देणं, चोख विकेटकीपिंग करणं ही क्विंटनची खासियत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असल्यामुळे त्याचा अनुभव रोहितसाठी मोलाचा ठरतो.

0
भाजप+
0
राजद+
0
इतर

सर्व निकाल

भाजप+
राजद+
इतर
निकाल नाही

सर्व मतदारसंघ

हार्दिक पंड्या आणि कायरेन पोलार्ड या जोडगोळीने हाणामारीच्या ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त रन्स चोपून काढण्याचं तंत्र विकसित केलं आहे. अवघ्या काही ओव्हर्समध्ये या दोघांनी मॅचचं पारडं फिरवून दाखवलं आहे. हार्दिकने ऑफस्टंपच्या बाहेर मागे जाऊन काऊ कॉर्नरमध्ये सातत्याने षटकार लगावण्याचं तंत्र विकसित केलं आहे. पोलार्ड आपल्या ताकदीच्या बळावर लाँग ऑन-लाँग ऑफ पट्ट्यात षटकारांची लयलूट केली आहे. हार्दिकने यंदा 25 तर पोलार्डने 22 षटकार खेचले आहेत. या जोडगोळीला रोखणं दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, कायरेन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या

रोहित शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या सत्रात सगळे सामने खेळू शकलेला नाही. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे रोहितच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. मात्र फायनलमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव ही हिटमॅन रोहितची जमेची बाजू आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत अव्वल तीनमध्ये असलेला रोहित मंगळवारी फायनलमध्ये महत्त्वपूर्ण इनिंग्ज खेळू शकतो.

मुंबईची बॉलिंग

ट्रेंट बोल्टने पॉवरप्लेमध्ये तर जसप्रीत बुमराहने संघाला आवश्यक असेल त्या ओव्हर्समध्ये विकेट्स काढण्याची किमया केली आहे. मोक्याच्या क्षणी बॉलिंगला येत प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला खिंडार पाडणं ही बुमराहची खासियत आहे. यॉर्कर, स्लोअरवन, बाऊन्सर, कटर अशी बुमराहच्या भात्यात अनेकविध अस्त्रं आहेत. बुमराह परपल कॅपच्याही शर्यतीत आहे.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, जसप्रीत बुमराह

दिल्लीकडून मुंबईकडे आलेल्या बोल्टने स्विंग आणि अचूकतेच्या बळावर पहिल्या सहा ओव्हर्समध्ये बॅट्समनना सळो की पळो करून सोडलं आहे. क्वालिफायर 1च्या लढतीत बोल्टने दोनच ओव्हर टाकू शकला. फायनलमध्ये तो खेळण्याची शक्यता आहे.

बोल्ट-बुमराहप्रमाणे नाही पण जेम्स पॅटिन्सनने संयमी बॉलिंग करत पूरक कामगिरी केली आहे. पॅटिन्सनऐवजी काही मॅचेसमध्ये नॅथन कोल्टिअर नील खेळला आहे. मात्र त्याला छाप सोडता आलेली नाही. तिसरा फास्ट बॉलर हा मुंबईसाठी कच्चा दुवा ठरू शकतो.

राहुल चहर आणि कृणाल पंड्या जोडीने विकेट्स पटकावणं आणि रन्स थांबवणं या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. सहावा बॉलर म्हणून पोलार्डने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

दिल्लीच्या बॅटिंगमध्ये सातत्याचा अभाव

दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिमोरन हेटमायर, मार्कस स्टॉइनस, ऋषभ पंत अशी बॅटिंगची तगडी फळी आहे. मात्र एकालाही कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर आणि शिखर धवन

शिखर धवनने दोन शतकं झळकावली मात्र त्यानंतर दोन मॅचेसमध्ये भोपळाही फोडता आला नाही. अनुभवी धवनकडून दिल्लीला फायनलमध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. बाकी बॅट्समननी खेळपट्टीवर स्थिरावून मोठी खेळी केली तर दिल्लीचा संघ धोकादायक ठरू शकतो.

स्टॉइनसला सलामीला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत स्टॉइनस मेलबर्न स्टार्स संघासाठी नियमितपणे सलामीला येतो. प्रचंड ताकदीच्या बळावर चौकार-षटकारांच लयलूट करण्यात स्टॉइनस माहीर आहे. फायनलच्या दडपणाचया लढतीत स्टॉइनसकडून दिल्लीला खूप अपेक्षा आहेत.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, मार्कस स्टॉइनस आणि शिमोरन हेटमायर

बॉलिंग दिल्लीची ताकद

दिल्लीला यंदा बॉलर्सनी प्लेऑफ गाठून दिलं आहे म्हटलं तर वावगं ठरू नये. कागिसो रबाडाने फायनलपर्यंत तब्बल 29 विकेट्स घेतल्या आहेत. वेग, अचूकता आणि अनेकविध अस्त्रांचा शिताफीने उपयोग करून घेत रबाडाने श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. रबाडा परपल कॅपचा मानकरी होण्याची चिन्हं आहेत.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, कागिसो रबाडा

रबाडाला अँनरिक नॉर्कियाने तोलामोलाची साथ दिली आहे. पहिल्याच आयपीएल हंगामात नॉर्कियाने 20 विकेट्स पटकावल्या आहेत. दुसऱ्या सत्रात त्याच्या वेगाचा सामना कसा करायचा याचं उत्तर बॅट्समनला मिळालं आहे मात्र फायनलमध्ये तो हुकूमी एक्का ठरू शकतो. रवीचंद्रन अश्विनने चतुराईने बॉलिंग करत बॅट्समनला जाळ्यात अडकवलं आहे.

अक्षर पटेलने स्पर्धेत सर्वोत्त्म इकॉनॉमी रेटसह बॉलिंग करताना बॅट्समनला रन्स करण्यापासून रोखलं आहे. तिसरा फास्ट बॉलर ही दिल्लीसाठीही चिंतेचा विषय आहे.

दिल्लीने याजागी इशांत शर्मा, अवेश खान, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, हर्षल पटेल आणि फिरकीपटू प्रवीण दुबेलाही खेळवलं आहे. फायनलमध्ये अनुभवी हर्षल पटेलला संधी मिळू शकते. मार्कस स्टॉइनसने स्लोअरवनच्या बळावर बॅट्समनला फसवलं आहे.

यंदाच्या हंगामात कामगिरी

मुंबई आणि दिल्ली यंदाच्या हंगामात तीनवेळा आमनेसामने आले आहेत. तिन्ही मॅचमध्ये मुंबईने विजय मिळवत दणदणीत वर्चस्व गाजवलं आहे.

मुंबईने 18 गुणांसह लीग स्टेजनंतर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं होतं. दिल्लीने 16 गुणांसह दुसरं स्थान पटकावलं होतं. योगायोग म्हणजे याच दोन संघांमध्ये फायनलही होते आहे.

मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, दिल्लीचे कोच रिकी पॉन्टिंग

दरम्यान आयपीएल स्पर्धेतली हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर या दोन संघांमध्ये 27 मॅचेस झाल्या असून, मुंबईने 15 तर दिल्लीने 12 मॅचेस जिंकल्या आहेत.

आकडेवारी

आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स संघालाच सलग दोन वर्षी जेतेपद पटकावता आलं आहे.

आयपीएल फायनलमध्ये आठवेळा पहिलयांदा बॅटिंग करणारा संघ विजयी ठरला आहे.

दुबईच्या मैदानावर चेस करणं अवघड आहे. या मैदानावर कॅचेस सुटण्याचं प्रमाणही खूप आहे.

दुखापती

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे काही मॅचेस खेळू शकला नाही. रोहित परतला आहे मात्र तो शंभर टक्के फिट असल्याचं त्याच्या वावरातून जाणवत नाही. तो फायनल खेळण्याची दाट शक्यता आहे.

अनुभवी ट्रेंट बोल्ट क्वालिफायर1च्या लढतीत दुखापतग्रस्त झाला होता. त्याने सराव केल्याचं मुंबई इंडियन्स कॅम्पतर्फे सांगण्यात आलं आहे.

दिल्लीसाठी अश्विनची दुखापत चिंतेचा विषय ठरू शकतो. हंगामाच्या सुरुवातीला अश्विनच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यातून सावरत त्याने पुनरागमन केलं. मात्र त्यानंतर त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचं जाणवतं. फिल्डिंग करतानाही तो काही गोष्टी टाळत असल्याचं जाणवतं. फायनलमध्ये खेळण्याचा अनुभव लक्षात घेता, अश्विन खेळणं दिल्लीसाठी महत्त्वाचं आहे.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र तो फायनल खेळेल असं संकेत आहेत.

संघ

मुंबई इंडियन्स-रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरेन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मक्लेघान, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, शेरफन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, नॅथन कोल्टिअर नील, सौरभ तिवारी, मोहसीन खान.

दिलली कॅपिटल्स- श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, प्रवीण दुबे, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, कीमो पॉल, रवीचंद्रन अश्विन, संदीप लमाचीने, शिखर धवन, अॅलेक्स कारे, शिमोरन हेटमेयर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टोनिअस, ललित यादव.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)