'द डिसायपल'चा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेला बॉलिवूडमधल्या चिखलफेकीविषयी काय वाटतं?

चैतन्य ताम्हाणे

फोटो स्रोत, Pascal Le Segretain/getty images

फोटो कॅप्शन, चैतन्य ताम्हाणे
    • Author, जान्हवी मुळे,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

सगळी थिएटर्स बंद असतानाही एका भारतीय चित्रपटाची सध्या चर्चा होत आहे- 'द डिसायपल'ची. चैतन्य ताम्हाणेनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं गेल्या महिन्यात व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये इंटरनॅशनल क्रिटिक्स प्राईझ (FIPRESCI पुरस्कार) आणि सर्वोत्तम पटकथेचा पुरस्कार मिळवला.

एक संवेदनशील दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता म्हणून चैतन्य ताम्हाणे ओळखला जातो. 'कोर्ट' या त्याच्या चित्रपटानंही 2014 सालचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला होता. आता 'द डिसायपल'

आता 'द डिसायपल'च्या निमित्तानं जवळपास दोन दशकांनी एका भारतीय चित्रपटाला व्हेनिस फिल्म फेस्टिवलच्या मुख्य स्पर्धेतही स्थान मिळालं. कोरोना विषाणूची साथ आणि लॉकडाऊनमधून सावरल्यावर सप्टेंबर महिन्यात इटलीत या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

तिथल्या अनुभवाविषयी, आगामी फिल्मविषयी आणि भारतीय सिनेमात, बॉलिवूडमध्ये होत असलेल्या घडामोडींविषयी चैतन्यशी संवाद साधला आहे बीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे यांनी.

कोव्हिडच्या साथीनं ज्या इटलीमध्ये काही महिन्यांपूवी हजारो मृत्यू झाले, त्याच इटलीच्या व्हेनिसमध्ये फिल्म फेस्टिवलचं आयोजन झालं. चैतन्यला त्या अनुभवातून पुरस्काराच्या पलिकडे काय मिळालं?

हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप विचित्र आणि अनिश्चिततेनं, चिंतेनं भरलेलं असं आहे. हा इतका मोठा धक्का आहे, की सगळ्याच जगात उलथापालथ झाली आहे. अनेक मोठे समारंभ रद्द होत असताना, जेव्हा आम्हाला व्हेनिस फिल्म फेस्टिवल होत असल्याचं कळलं, तेव्हा आम्हाला तो आशेचा मोठा किरण वाटला.

फक्त सिनेमासाठीच नाही, तर सर्वच कला, संस्कृती आणि मानवतेच्या दृष्टीनंही काही प्रमाणात आपण 'नॉर्मल' आयुष्याकडे परतत असल्याचं ते एक प्रतीक वाटलं.

चैतन्य ताम्हाणे

फोटो स्रोत, Vittorio Zunino Celotto/getty images

अर्थात हे आयोजन खूप काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं करण्यात आलं, तिथे सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलं होतं. पण त्याचबरोबर हेही दिसून आलं, की 'शो मस्ट गो ऑन'. मोठ्या स्क्रीनवर थिएटरमध्ये चित्रपट दाखवले जाणं खूप महत्त्वाचं आहे.

आम्ही तिथे जाण्यासाठी उत्सुक होतो, पण आपण धोका स्वीकारतो आहोत याचीही आम्हाला जाणीव होती. पण हा क्षणच इतका महत्त्वाचा होता, कारण जवळपास दोन दशकांनंतर एक भारतीय सिनेमा तिथे मुख्य स्पर्धेत होता. खरं तर हा चित्रपट यंदा प्रदर्शित होईल अशी आशाही उरली नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर चित्रपटांसाठी हे सर्वात कठीण वर्ष असल्याचंही कुणी म्हटलं आहे.

हे सगळं आमच्या डोक्यात सुरू होतं. आम्ही व्हेनिसला पोहोचू की नाही, याचीही खात्री नव्हती, कारण व्हिसा मिळेल का, विमानात जागा मिळेल का, अशा अनेक अडचणींवर मात करून आम्ही तिथे पोहोचलो. आता या सगळ्याला फक्त महिना दीड महिना झाला आहे, पण मागे वळून पाहताना हे सगळं खूप महिन्यांपूर्वी घडलं असं वाटतं.

तसंच हे एका स्वप्नासारखं वाटतं, कारण तिथे सगळं अगदी सुरळीत सुरू होतं, आम्ही लोकांच्या भेटीगाठी घेऊ शकत होतो. आणि तिथून आल्यावर पुन्हा इथे लॉकडाऊनसारखी स्थिती आहे. पण या सगळ्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला याचा आनंद वाटतो.

फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे चित्रपट असोत किंवा आंतरराष्ट्रीय अल्फोन्सो क्वेरॉनसारख्या वेगवेगळ्या देशातील लोकांसोबत काम करण्याचा अनुभव असो, परदेशातल्या चित्रपटांमधले कुठले प्रयोग आपल्याकड्या प्रेक्षकांना माहिती असायलाच हवे असं तुला वाटतं. त्या सगळ्यांच्या मध्ये मराठी सिनेमा नेमका कुठे आहे असं तुला वाटतं?

बाहेर जग अशा कलाकृती करतंय आणि आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, असं मी कसं म्हणू शकेन? कारण मला माहीत आहे, आपल्या देशातले बहुसंख्य लोक अस्तित्वासाठी लढा देत आहेत. सध्या आपल्या देशात कला हा प्राधान्याचा विषय नाही, आपण मूलभूत गोष्टींसाठीच झगडत आहोत.

चैतन्य ताम्हाणे

फोटो स्रोत, Vittorio Zunino Celotto/getty images

कला आणि संस्कृती कधी निर्वातात उदयास येत नाहीत. त्या त्या समाजाचं जीवनमान, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक साक्षरता, इतिहास, कलेला आश्रय देणारे लोक आणि संस्थांवर बरंच काही अवलंबून असतं.

भूक, निरक्षरता, लोकसंख्यावाढ असे प्रश्न इथे आहेत. त्यामुळं इथलं भावविश्वही वेगळं आहे. दुसरं म्हणजे लोकांना जे माहीत नाही ते त्यांना माहिती असायलाच हवं असंही काही नाही. ही मी तक्रार करत नाहीये.

पण जगभरातच विचारांचं ध्रुवीकरण आणि सोशल मीडियावर जे होत आहे, त्याचा परिणाम तुला तिथल्या किंवा इथल्या फिल्म्सवर होताना तुला दिसतो का?

मी जागतिक सिनेमाचा किंवा कलेचा जाणकार नाही. पण मी माझी निरीक्षणं किंवा एक कलाकार म्हणून माझ्या भावना मांडतो आहे. जगभरातच सगळ्या गोष्टींचा अतिरेक दिसून येतो आहे. उजव्या विचारसरणीची राजसत्ता आणि टोकाची विचारसरणी यांत सत्याचं महत्त्व राहिलेलं नाही. म्हणतात ना, की आपण आता पोस्ट ट्रूथ जगात वावरतो आहोत. त्यामुळेच मला प्रश्न पडतो, की या अशा जगात, कलेची भूमिका नेमकी काय आहे.

कारण कला हे फक्त समाजसुधारणा किंवा शिक्षणाचं माध्यम नाही. ती कुणाचा प्रसार करणारी नसावी आणि ती फक्त पोकळ मनोरंजन करणारीही नसावी असं मला वाटतं.

पण अमेरिकेसारख्या देशात, जिथे लोकशाही कदाचित आजवरच्या सर्वात कठीण परीक्षेतून जाते आहे, तिथेही एक गोष्ट त्यांच्याकडे आहे. विचारांचं स्वातंत्र्य. तुम्हाला तिथे समाजात मोठ्या स्थानावर असलेले लोकही सत्तेत असलेल्यांच्या धोरणांवर उघडपणे बोलताना दिसतात आणि त्यांच्या चुकांवर टीका करताना दिसतात. अमेरिकन समाजात बाकी काही उणीवा असतील, पण त्यातली ही एक ताकद मला जाणवते.

एक कलाकार म्हणून भारतातील परिस्थितीची जाणीव आहे. तसंच आपण सेल्फ सेन्सॉरशिप करत असल्याचंही जाणवतंय. तुम्ही विचारांच्या पातळीवरच स्वतःला आळा घालू लागता, कारण होणाऱ्या विरोधाला कोण तोंड देणार, ट्रोलिंगला किंवा बाकी हल्ल्यांना कुठे उत्तर देत बसणार? प्रश्न फक्त तुमचाच नाही, तर तुमच्या प्रियजनांच्या सुरक्षिततेचाही असतो. त्यामुळे हे बोलणं योग्य ठरेल की नाही, अशा मर्यादा आपण घालून घेत असतो.

'जगभरात सगळीकडेच सध्या सगळेजण तोलूनमापून राजकीय पवित्रा घेत असल्याचं पहायला मिळतंय. पण इथे तो वेगळ्याच पातळीवर आहे.

पण अनेकदा युरोपियन, अमेरिकन फिल्म्स किंवा वेबसीरीजमध्ये तिथल्या वास्तवाचं बेधडक चित्रण होतं. वर्णद्वेष, किंवा 'मी टू' चळवळ अशा प्रश्नांवर तिथले सिने कलाकार ठोस भूमिका घेताना दिसतात. भारतात मात्र सध्या वेगळंच चित्र आहे, एक कलाकार म्हणून याकडे तू कसं पाहतो?

कलाकार काही समाजापेक्षा वेगळे असतात किंवा त्यांना काही जास्त कळतं असं मला वाटत नाही. असं काही नसतं, हे आतापर्यंत आपल्याला दिसून आलं आहे. दोन देशांत अशी तुलना करणं चुकीचं ठरेल. पण अगदी सर्वात ताकदवान देशालाही वर्णद्वेष, लिंगभेद अशा समस्यांनी ग्रासलेलं आहे. मग आपण नेमके कुठे आहोत?

जेव्हा कथित कलाकार राजकीय शक्तींच्या हातचं बाहुलं बनतात आणि कुणाचा प्रचार करतात, तेव्हा वाईट वाटतंच. हे एकाच बाजूपुरतं मर्यादितही नाही. हे सगळीकडेच होतंय आणि त्या वादाला काही अर्थही नाही.

जेव्हा दोन्ही बाजूंनी द्वेष सांडत असतो, अशा बेजबदार चर्चेनं काही साध्य होत नाही. कधीकधी हे तोंडदेखलं आणि दाखवण्यापुरतंही असतं किंवा लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा तो प्रयत्न असतो. हे चिंताजनक तर आहेच, तसंच मीडिया त्याला जे महत्त्व देतो आणि लोक त्यावर जी प्रतिक्रिया देतात त्यामुळे मूळ समस्यांकडेही दुर्लक्ष होतं. आपण त्या प्रश्नांविषयी बोलत नाही, कारण एक यंत्रणाच जणू आपल्याला त्यापासून परावृत्त करते आहे.

तू या सगळ्यावर कोर्ट या सिनेमातून भाष्य केलं होतं. आपल्या न्यायव्यवस्थेची एक फारशी चर्चिली न जाणारी बाजू कोर्टनं उजेडात आणली आणि मग तशा काही घटना घडल्यावर लोकांनी कोर्टची आठवण काढली होती.

चैतन्य ताम्हाणे

फोटो स्रोत, ALBERTO PIZZOLI/getty images

ही निश्चितच अभिमानाची गोष्ट नाही. तसं काही घडावं असं मी ठरवलेलं नव्हतं. माझा तो अजेंडा नव्हता. पण जे मी दाखवलं तेही एक सूक्ष्म वास्तव होतं.

कोर्टनं तुझ्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढवल्या. आता 'द डिसायपल'मध्ये लोकांना नेमकं काय पाहता येणार आहे?

हा एक खूप नाजूक, संवेदनशील चित्रपट आहे. ही कहाणी एका अशा कलाकाराची आहे, जो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या एका विशिष्ट परंपरेत अडकला आहे. असुरक्षिततेची भावना, संघर्ष ही त्याच्यापुढची आव्हानं आहेत, आणि आपण सगळेही सध्यच्या वेगानं बदलत्या जगात त्याच आव्हानांचा सामना करतो आहोत. भांडवलशाही, अतिआधुनिक जगात जुळवून घेताना आपल्या मूल्यांवर प्रश्नचिन्हं उभं करतो आहोत. परंपरा आणि आधुनिकतेमधला तणाव आणि समाजातलं आपलं स्थान यांवर भाष्य करतो आहोत.

गेल्या काही वर्षांत शास्त्रीय संगीताचा नव्यानं शोध घेण्याचे अनेक प्रयोग समोर आले आहेत, 'कट्यार काळजात घुसली' किंवा 'बंदिश बँडिट'नं आताच्या पिढीला शास्त्रीय संगीताकडे पुन्हा खेचलं आहे. पण कला अशी आधुनिक होत असली, तरी त्यातल्या अभिजात-बहुजन, स्त्री-पुरुष अशा भेदभावाविषयी तुला काय वाटतं?

या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला फिल्ममधूनच मिळेल. अशा एखाद्या परंपरेवरील चित्रपट करताना स्वाभाविकपणे तुम्ही असे भेदाभेद किंवा विभागणी याही गोष्टींचा विचार करताच. मी अधिक काही सांगण्यापेक्षा हा चित्रपट पाहून तुम्हीच तुमचा निष्कर्ष काढा.

देशातली राज्यातली राजकीय परिस्थिती सध्या खूप गुंतागुंतीची आहे. ती पाहून तुला राजकीय चित्रपट करावासा वाटतो का?

प्रत्येक कला राजकीय असते. कोर्टमध्येही राजकारण होतं, 'द डिसायपल'मध्येही वेगळं राजकारण आहे. ते कलेचं राजकारण आहे, व्यक्तीस्वातंत्र्यांचं आणि काही प्रमाणात वर्ग, जात आणि धर्माचं राजकारणही आहे.

पण शब्दश: राजकारणाविषयी बोलायचंच झालं, तर हे सगळं पाहून मला काही कल्पना जरूर सुचतात आणि मला त्यावर काहीतरी करावंसं वाटतं. पण ते अधिक व्यापक रुपात असेल. म्हणजे आज सत्तेत असलेला पक्ष उद्या सत्तेत असेलच असं नाही. राजकीय परिस्थितीनुसार घटनाही बदलत जातात. पण या सगळ्याचा एका मोठ्या कालखंडात समाजावर, संस्कृतीवर काय परिणाम होतो, यात मला जास्त रस आहे. हे किती थेटपणे मांडलं जाईल माहीत नाही, पण एका संकल्पनेच्या स्वरुपात ते असेल.

एक तक्रार आहे तुझ्याविषयी की तू सहसा मुलाखती देत नाहीस, हा अलिप्तपणा ठरवून राखला आहेस, की तुझा स्वभाव तसा आहे?

आता तुम्हाला मुलाखत देतोय ना. मला वाटतं, मला जे मांडायचं आहे, ते मी माझ्या कामातनं केलं पाहिजे. आपण खूप जास्त बोललो, स्वतःला गांभीर्यानं घेतलं तर त्याचा फायदा होत नाही असं मला वाटतं. मला गांभीर्यानं घेण्यापेक्षा लोकांनी माझ्या कामाला जास्त गांभीर्यानं घ्यायला हवं. त्यातच सगळी उत्तरं दडली आहेत.

'द डिसायपल'चा पुढचा प्रवास कसा आहे, आम्हाला ती फिल्म कधी पाहायला मिळेल आणि चैतन्यकडून पुढे कुठले प्रोजेक्ट पाहायला मिळतील.

डिसायपल पाहता येणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण माझं सगळं मी त्या फिल्ममध्ये ओतलंय, गेल्या चार वर्षांची मेहनत आहे.. डिसायपल आता खूप फेस्टिव्हल्ससाठई जाते आहे जर्मनी, पोलंड, इजिप्त, स्पेनमध्ये त्याचे स्क्रीनिंग होत आहेत, भारतात फिल्म कधीयेईल यांची मला आणि प्रोड्यूसरला सर्वात उत्सुकता आहे. पण हे कसं आणि कधी हीईल याची काहीच माहीती नाही. माझी एवढीच आशा आहे की जेव्हा ही फिल्म येईल तेव्हा लोकांनी पैसे देऊन ती पाहावी.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)