कोरोना व्हायरस : भारतात कोरोना संसर्ग फेब्रुवारीपर्यंत आटोक्यात येईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा 'पीक' (peak) येऊन गेला आहे का? आता पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाचा देशातला संसर्ग आटोक्यात येईल?
देशातल्या काही शास्त्रज्ञांच्या मते याचं उत्तर होकारार्थी आहे. नवीन गणितीय प्रारुपाच्या आधारे त्यांनी म्हटलं आहे की, भारतात सप्टेंबर महिन्यातच संसर्गाचा उच्चांक गाठला गेला होता आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोना आटोक्यात येईल. आता हे प्रारुप मांडताना चार गोष्टी गृहीत धरल्या गेल्या आहेत- लोक मास्क वापरतील, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं टाळतील, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल आणि हात सतत धुतील.
भारतात आतापर्यंत कोव्हिड-19 चे जवळपास 75 लाख रुग्ण आढळले असून 1 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र जागतिक आकडेवारीचा विचार करता इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचं प्रमाण 10 टक्केच आहे.
भारतातील कोव्हिड-19 रुग्णांचा केस फॅटलिटी रेट (CFR) किंवा मृत्यूदर हा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. जागतिक आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाणही नीचांकी आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला. या महिन्यात देशात कोरोनाचे दहा लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आढळले. त्यानंतर मात्र कोरोनाचे रुग्ण आढळण्याचा आलेख कमी होत गेला.
गेल्या आठवड्यात भारतात कोरोनाचे दिवसाला सरासरी 62 हजार रुग्ण आढळत होते आणि 784 जणांचा मृत्यू झाला होता. बऱ्याचशा राज्यात दररोज होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी होत आहे. देशात दिवसाला सरासरी एक लाख चाचण्या होत होत्या.

या नवीन गणितीय प्रारुपाचा अभ्यास करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या सात शास्त्रज्ञांपैकी एक आहेत डॉ. गगनदीप कांग. त्या स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या फेलो म्हणून निवड झालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
या प्रारूपामध्ये लोकांना संसर्ग होण्याचं प्रमाण, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण, मृत्यूदर आणि ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं ठळकपणे दिसून येत आहेत अशा रुग्णांचं प्रमाण याचा अभ्यास केला गेला. ज्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाची लक्षणं दिसून आली नाहीत, अशा रुग्णांचं प्रमाणही या अभ्यासात लक्षात घेतलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
जर मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केला गेला नसता, तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आतापर्यंत एक कोटी 40 लाखांहून अधिक झाली असती आणि आतापर्यंत 26 लाखांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले असते. मृतांचा हा आकडा सध्याच्या आकडेवारीच्या 23 पट आहे.
शास्त्रज्ञांनी बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये अभ्यास केला. स्थलांतरित मजुरांचे लोंढे या दोन्ही राज्यांमध्ये आल्याने कोरोना संसर्गावर काय परिणाम झाला, हे त्यांनी अभ्यासलं. स्थलांतरित मजुरांच्या परतण्याचा कोरोना संसर्गावर फारसा परिणाम झाला नसल्याचा निष्कर्ष समोर आला.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबादमध्ये प्रोफेसर असलेले माथुकुमल्ली विद्यासागर सांगतात, "आपल्याकडे जून महिन्यातच 'पीक' आला असता. आपल्या रुग्णालयांवर याचा ताण पडला असता आणि लोकांमध्ये घबराट पसरली असती. लॉकडाऊननं कोरोनाचा कर्व्ह फ्लॅट करण्यात मदत केली."
प्रोफेसर विद्यासागर रॉयल सोसायटी ऑफ लंडनचेही फेलो आहेत.
पण आता आपल्याकडे सणासुदीचे दिवस आहेत. या काळात लोक एकत्र येतात, आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करू शकतात. त्यामुळे एखादा 'सुपरस्प्रेडर' आणि लोकांच्या एकत्र येण्यामध्ये वाढ झाली, तर दोन आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचं चित्र बदलू शकतं. केरळमध्ये असंच काहीसं झालं. इथे ओणम सणानंतर कोरोनाच्या संसर्गात वाढ झालेली पाहायला मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
जर लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर कोरोनाचा स्पाइक पाहायला मिळेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. लोकांनी खबरदारी घेतली नाही तर ऑक्टोबरमध्ये 26 लाख रुग्णसंख्येचा टप्पा गाठत देशात कोरोना संसर्गाचा 'पीक' येऊ शकतो.
प्रोफेसर विद्यासागर म्हणतात, "जर लोकांनी सुरक्षाविषयक उपाययोजनांचं पालन केलं, तरच आमचे निष्कर्ष योग्य ठरतील. आमच्यामते देशात सप्टेंबरमध्येच कोरोनाचा 'पीक' येऊन गेला आहे. पण आपण हलगर्जीपणा करणं योग्य नाहीये. जे झालं ते झालं, आता काही वाईट घडणार नाही असं मानणं मनुष्यस्वभाव आहे."

कोरोना संसर्गाची अजून एक लाट?
पण साथीच्या रोगाचा अभ्यास करणाऱ्या अनेक डॉक्टरांच्या मते देशात संसर्गाची अजून एक लाट येऊ शकते. उत्तर भारतात थंडीच्या दिवसात असलेल्या स्मॉगमुळे कोरोना संसर्गाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
ते सांगतात की, संसर्गाचं कमी होणारं प्रमाण आणि घटता मृत्यूदर हा आशादायी संकेत आहे. मात्र कोरोनाचं संकट संपलंय असं म्हणणं खूप घाईचं ठरेल.
युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमध्ये बायोस्टॅटिस्टिक्स आणि एपिडेमियॉलॉजीच्या प्रोफेसर असलेल्या डॉक्टर भ्रमर मुखर्जी सांगतात, "भारतात संसर्गाची पहिलीच लाट सुरू आहे, असं वाटतंय."

प्रदूषणामुळे थंडीच्या दिवसांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं. प्रदूषणामुळं लोकांना श्वसनासंबंधीचे आजारही अधिक प्रमाणात होतात.
त्या सांगतात की, या काळात अँटीबॉडी सर्वे करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. जिथे संसर्गाचं प्रमाण कमी होतं अशा शहरांवर आणि गावांवरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अशी ठिकाणं विषाणुच्या संसर्गासाठी अधिक अनुकल असतात.
डॉक्टर मुखर्जी सांगतात, "जगभरात जे चित्र समोर आलं, त्यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये की, संसर्गाची अजून एखादी लाट येऊ शकते. पण ती कधी हे सांगता येणार नाही. त्यामुळे रुग्णालयांच्या क्षमतेच्या तुलनेत संसर्गाचं प्रमाण कमी ठेवणं हे अतिशय आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्यासंबंधीच्या सूचनांचं पालन करणंही गरजेचं आहे."
त्यामुळे कोरोनाचं प्रमाण कमी झालं असलं तरी तज्ज्ञांच्या मते संकट अजूनही टळलेलं नाहीये. त्यामुळेच मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























