अर्णब गोस्वामी यांना पोलिसांची नोटीस, 'पूछता है भारतसाठी अटक का करू नये?' : #5मोठ्याबातम्या

अर्णब गोस्वामी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांची नोटीस

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोस्वामी यांच्याविरोधात पोलिसांनी चाप्टर प्रक्रिया सुरू केली आहे.

त्यांच्या 'पूछता है भारत' या कार्यक्रमात समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये, असा प्रश्न मुंबई पोलिसांनी अर्णब यांना नोटीसमध्ये विचारला आहे.

पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीवर अर्णब गोस्वामी यांना यापुढे प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. तसंच, 10 लाख रुपये जामिनासाठी भरावे लागणार आहेत. जामीनदार अर्णब यांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणारे हवेत, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

वरळी न्यायालयाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 11 अन्वये ही नोटीस बजावली आहे. अर्णब यांना 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता न्यायालयात समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

2. राज्यात साडेबारा लाख सदोष RTPCR किट वितरित - राजेश टोपे

राज्यात कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी वितरीत करण्यात आलेले किट्स खराब निघाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात पाठवण्यात आलेल्या किट्सपैकी सुमारे साडेबारा लाख RTPCR किट सदोष आढळले आहेत. हे किट्स राज्य सरकारने GCC Biotech Ltd कंपनीकडून खरेदी केले होते. हे किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.

राजेश टोपे

फोटो स्रोत, Getty Images

सदोष किट्स वितरित केल्याचं आढळून आल्यानंतर GCC Biotech Ltd या कंपनीच्या किट्सचा वापर थांबवण्यात आला असून त्यांच्यावर सदोष किट्सचा पुरवठा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

3. नाथाभाऊंना राजकारण कळतं, ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत - फडणवीस

नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते आमच्यासोबत राहावेत, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण अधिक कळतं, त्यामुळे ते पक्षांतरासारखा चुकीचा निर्णय कधीच घेणार नाहीत, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. सकाळने याबाबत बातमी दिली आहे.

यावेळी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना, खडसे यांना अद्याप भेटलो नसून त्यांच्याशी आपण योग्य वेळी चर्चा करू, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

4. मला सतत देशद्रोही बोलाल, तर मी भाजपात प्रवेश करीन - कन्हैय्या कुमार

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असताना ते वाईट होते, त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हापासून ते भाजपाचे झाले. त्याप्रमाणे तुम्ही मला सतत देशद्रोही म्हणाल, तर मी भाजपात प्रवेश करीन, ज्यांना हे शिव्या देतात, त्यांना पाच मिनिटांनंतर काका म्हणायला सुरुवात करतात, असं वक्तव्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांनी केलं.

कन्हैय्या कुमार

फोटो स्रोत, Twitter

कन्हैय्या कुमार यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आपल्या भाषणात ते वरील वाक्य बोलताना दिसत आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून राजकारण तापलं आहे. कन्हैय्या कुमार यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं असून ते भाकपसाठी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरले आहेत.

दरम्यान बेगूसराय जिल्ह्यातील बखरी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले असता त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.

5.हिंदू राष्ट्रासाठी महंत परमहंस दास यांचं बेमुदत उपोषण

अयोध्यातल्या तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे. यासाठी ते बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

सोबतच, मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट करावे, त्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठवण्यात यावे, पाकिस्तान-बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

परमहंस यांनी यापूर्वीही राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस बेमुदत उपोषण केलं होतं. राम मंदिर उभारणीसंदर्भात आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता. ही बातमी अमर उजालाने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)