संभाजीराजे छत्रपती छगन भुजबळांना म्हणतात, 'तुमच्या ज्येष्ठत्वाचा आदर करतो पण...'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
आरक्षणाच्या प्रश्नावर एकीकडे मराठा संघटना आक्रमक झाल्या असतानाच एमपीएससीची परीक्षा रद्द केल्यामुळे मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिल्याचं चित्र आहे.
याच विषयावर बीबीसी मराठीनं राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधला होता. या मुलाखतीत एमपीएससीच्या परीक्षेबाबत त्यांची भूमिका, ओबीसीचं आरक्षण यावर भुजबळ यांनी भाष्य केलं.
मराठा आरक्षणाबाबत आग्रही असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्यावर या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी टीका केली.
छगन भुजबळ यांनी या मुलाखतीत संभाजीराजे यांनी ऑगस्ट 2018 मध्ये राज्यसभेत केलेल्या एका भाषणाचा संदर्भ दिला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्यांनी म्हटलं, "नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटवर बोलताना संभाजीराजेंनी म्हटलं होतं की, मराठा ही 'सुपीरिअर कास्ट' आहे. ही लढवय्यी आणि उच्च जात आहे. मराठ्यांसाठी महाराष्ट्रात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गांतर्गत (एसईबीसी) आरक्षण मागत आहोत."
संभाजीराजेंच्या भाषणातील हा मुद्दा सांगून भुजबळ यांनी म्हटलं की, तुम्ही असंही बोलता आणि तसंही बोलता.
"मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. ओबीसींच्या कोणत्याही संघटनेचा मराठा आरक्षणाला विरोध नाहीये. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीये," असंही भुजबळ यांनी म्हटलं.
"संभाजीराजेंनी राजधर्म पाळावा. राजधर्म हेच सांगतो की, तुम्ही निर्णय घेताना सर्व घटकांचा विचार करून भूमिका मांडली पाहिजे," असंही छगन भुजबळ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
संभाजीराजेची नाराजी कशामुळे?
आता याच मुलाखतीचा संदर्भ देत संभाजीराजे यांनी छगन भुजबळांवर नाराजी व्यक्त केली आहे.
छगन भुजबळ यांनी आपल्या राज्यसभेतील ज्या भाषणाचा संदर्भ दिला होता, तो अर्धवट असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, YUVRAJ SAMBHAJIRAJE CHHATRAPATI/FACEBOOK
यासंदर्भात संभाजीराजे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये संभाजीराजे यांनी लिहिलं आहे, "कोणीतरी दुसऱ्याने पाठवलेला अर्धवट मॅसेज वाचून छगन भुजबळांनी मी संसदेत केलेल्या भाषणावर भाष्य केलं. बीबीसी मराठीवर त्यांची मुलाखत होती, त्यात त्यांनी माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढल्याचे दिसून येते. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या घटना दुरुस्ती बिलावर मी ते भाषण केलं होतं. ज्यामध्ये मराठा समाजावर कशाप्रकारे अन्याय झाला, हे मी सिद्ध केलं होतं."
"आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं, त्यात मराठा समाजाचासुद्धा समावेश होता. 1967 पर्यंत मराठा समाजाचा ओबीसी(इंटर मीडियेट क्लास) च्या राष्ट्रीय यादी (central list) मध्ये समावेश होता आणि अचानक 1968 मध्ये अचानक मराठा जातीला वगळण्यात आले.
1967 मध्ये एका जीआरच्या अनुषंगाने मराठा, माळी आणि तेली या जातींना वगळले होते. त्यानंतर 1968 मध्ये फक्त मराठा समाजाला बाहेर ठेऊन माळी आणि तेली जातींना आत घेतलं गेलं. मी कुणाही जातीच्या विरोधात नाही पण शाहू महाराजांची आरक्षणाची मूळ भावना काय होती, हेच मी बोललो," असं संभाजीराजे यांनी लिहिलं आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
संभाजीराजे छत्रपती यांनी आपलं संपूर्ण भाषणही शेअर केलं आहे.
माझ्या भाषणातील केवळ एक-दोन शब्द सुटे काढून, तेही दुसऱ्याने पाठवलेले वाचून मला सल्ला देण्याचा प्रयत्न केला, असं म्हणून एका जबाबदार मंत्रिमहोदयांकडून मला ही अपेक्षा नसल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं.
तुमच्या ज्येष्ठत्वाचा आदर करतो, पण कृपया महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका, असं संभाजीराजेंनी म्हटलं.
दरम्यान, बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण हे राजकारणाच्या पलिकडचं असल्याचं म्हटलं होतं.
"एकदा मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांनी एकत्र यावे आणि समाजाला दिशा द्यावी. कोर्टाची स्थगिती कशी थांबवता येईल हे बघितलं पाहीजे. दोघांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून बोलण्यापेक्षा एकत्र येऊन मार्ग काढावा," असं त्यांनी म्हटलं होतं.
संभाजीराजे छत्रपती कोण आहेत?
शाहू महाराज दुसरे यांचे संभाजीराजे आणि मालोजीराजे हे दोन पुत्र आहेत. त्यापैकी मालोजीराजे छत्रपती यांनी 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवून विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं.
संभाजीराजे छत्रपती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1971 रोजी झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर आणि राजकोट येथे झाले आहे. त्यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यश आले नाही.

रायगडवरावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन करणे त्याचप्रमाणे मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत आग्रही भूमिका घेत असल्यामुळे ते अनेकदा चर्चेत येतात. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत.
नुकत्याच नवी मुंबईत नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यासपीठावर छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे या दोघांसाठी खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. संभाजीराजे या बैठकीला पोहोचले पण उदयनराजेंची अनुपस्थितीची चर्चा झाली.
ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने याबाबत बोलताना म्ह णाले, "दोन्ही राजांचे वेगळे स्वभाव आहेत. संभाजी राजे हे कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात असतात. लोकांमध्ये रमतात.
उदयनराजेंची काम करण्याची पद्धत यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे ते फार प्रसारमाध्यमांमधली चर्चा टाळण्यासाठी काही मोजक्याच ठिकाणी हजेरी लावतात. त्यामुळे उदयनराजे यांना संभाजीराजे नको आहेत असं वाटत नाही"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























