You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: धोनी-शार्दूलच्या नाराजीमुळे पॉल रायफेल यांनी वाईडचा निर्णय बदलला?
सांघिक प्रदर्शनाच्या बळावर चेन्नईने हैदराबादला नमवलं मात्र या मॅचमध्ये सगळ्यात चर्चेत राहिला अंपायर पॉल रायफल यांनी न दिलेला वाईड.
चेन्नईने दिलेलं 168 रन्सच्या आव्हानासमोर हैदराबादने केन विल्यमसनचा अपवाद वगळता नियमित अंतरात विकेट्स गमावल्या.
हैदराबादच्या इनिंग्जमध्ये 19वी ओव्हर सुरू झाली तेव्हा जिंकण्यासाठी 12 बॉल 27 रन्स हव्या होत्या. ऑलराऊंडर रशीद खानने शार्दूल ठाकूरच्या पहिल्या बॉलवर दोन रन धावून पूर्ण केल्या. आता समीकरण 11 बॉल 25 असं झालं.
रशीद खानची षटकार खेचण्याची ताकद ओळखून धोनीने फिल्डिंग सजवली होती. डीप पॉईंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आले होते. शार्दूल आऊटसाईड ऑफस्टंप बॉल टाकणार हे नक्की दिसत होतं. त्याने बॉल टाकला. रशीदने तो मारण्याचा प्रयत्न केला. तो वाईड देण्यात आला. समीकरण 11 बॉल 24 असं झालं.
या वाईडनंतरही धोनीने रशीदसाठीची फिल्डिंग बदलली नाही. शार्दूलने पुढचा बॉलही ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. रशीदने अक्रॉस जात मारण्याचा प्रयत्न केला. अंपायर पॉल रायफल यांनी वाईड देण्यासाठी हात फैलावायला सुरुवात करताच शार्दूल आणि पाठोपाठ धोनीने नाराजी प्रकट केली. बॉलर-कॅप्टनची नाराजी पाहून रायफेल यांनी हात न फैलावता मागे घेतले. त्यामुळे शार्दूलने टाकलेला हा बॉल वैध ठरला. समीकरण 10 बॉल 24 झालं.
पॉल रायफर आंतरराष्ट्रीय अंपायर आहेत आणि आयसीसीच्या एलिट पॅनल अंपायर्समध्ये त्यांचा समावेश आहे. अंपायरिंगपूर्वी अनेक वर्ष फास्ट बॉलर म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. खेळाडूंच्या दबावासमोर अंपायर्सनी झुकायला नको अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मॅन ऑफ द मॅच अंपायरला द्यायला हवा असंही काहींचं म्हणणं आहे.
आंतराष्ट्रीय अंपायरकडून अशी अपेक्षा नाही असं काही नेटिझन्सचं म्हणणं आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये जायचं आहे. त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त मॅचेस जिंकणं आवश्यक आहे. यासाठी या मॅचमध्ये त्यांनी अंपायरवर दबाव आणला असं काही हैदराबाद संघाच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
या वाईडमुळे मॅचचा निर्णय बदलला असता का? हे सांगता येणं कठीण आहे. पण तो बॉल वाईड ठरला असता तर हैदराबादला एक अतिरिक्त रन आणि एक अतिरिक्त बॉल खेळायला मिळाला असता. पण तसं झालं नाही. शार्दूलच्या त्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन निघाल्या आणि त्याच ओव्हरमध्ये रशीद खान आऊट झाला आणि मॅचचं पारडं चेन्नईच्या बाजूने झुकलं.
चेन्नईने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताना 167 रन्सची मजल मारली. सॅम करनला सलामीला बढती देण्यात आली. त्याने 31 रन्सची खेळी केली. वॉटसनने 42 तर रायुडूने 41 रन्सची खेळी केली. धोनीने 13 बॉलमध्ये 21 तर रवींद्र जडेजाने 10 बॉलमध्ये 25 रन्स केल्या.
हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांना झटपट गमावलं. त्यानंतर केन विल्यमनसचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. रशीद खान मैदानात असेपर्यंत हैदराबादला आशा होती. 19व्या ओव्हरमध्ये रशीद आऊट झाला आणि हैदराबादच्या आशा मावळल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)