IPL 2020: इशांत शर्मा आयपीएलबाहेर

इशांत शर्मा, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, Delhi Capitals

फोटो कॅप्शन, इशांत शर्मा
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दिल्ली कॅपिटल्स संघाला दुखापतींमुळे एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्मा दुखापतीमुळे यंदाच्या हंगामातील उर्वरित मॅचेस खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

काही दिवसांपूर्वीच अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राच्या हाताला दुखापत झाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला होता.

विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतला दुखापत झाल्याने दिल्लीला संघात बदल करावे लागले होते.

7 ऑक्टोबरला दुबईत संघाच्या सराव सत्रादरम्यान इशांतला डाव्या बरगडीत त्रास जाणवला. फिजिओ आणि डॉक्टरांच्या तपासणीनंतर इशांतच्या मसल टिअर झाल्याचं स्पष्ट झालं.

दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने इशांत हंगामातील उर्वरित मॅचेस खेळू शकणार नाही. यंदाच्या हंगामात इशांत केवळ एक मॅच खेळू शकला.

स्पर्धेचा निम्मा टप्पा बाकी असल्याने दिल्लीचा संघ इशांतऐवजी बदली खेळाडू संघात समाविष्ट करून घेण्याची शक्यता आहे.

इशांतने आयपीएल स्पर्धेत 90 मॅचेस खेळल्या असून, त्याच्या नावावर 72 विकेट्स आहेत. इशांतने पाच विकेट्स घेण्याची करामत केली आहे. दिल्लीपूर्वी इशांतने डेक्कन चार्जर्स, कोलकाता नाईट रायडर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायझर्स हैदराबाद संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.

अमित मिश्रा आणि इशांत शर्मा अशी अनुभवी बॉलर्सची जोडगोळी स्पर्धेबाहेर गेल्याने दिल्लीला योजना पुन्हा एकदा नव्याने आखाव्या लागणार आहेत.

3 ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत स्वत:च्या बॉलिंगवर कॅच घेताना मिश्राच्या बोटाला दुखापत झाली. बॉलिंग टाकण्याच्या उजव्या हातालाच ही दुखापत झाली. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याचं एक्सरे चाचण्यांमध्ये स्पष्ट झालं.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलच्या दीडशे मॅचेसमध्ये मिश्राच्या नावावर 160 विकेट्स आहेत.

अमित मिश्रा, दिल्ली कॅपिटल्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमित मिश्रा

स्पर्धेचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये अमित मिश्राचा समावेश होतो. आयपीएल स्पर्धेत तब्बल तीन हॅट्ट्रिकचा दुर्मीळ विक्रम मिश्राच्या नावावर आहे.

2008 मध्ये रवी तेजा, प्रग्यान ओझा, आरपी सिंग यांना आऊट करत त्यानं विक्रम केला होता. 2011 मध्ये रायन मॅकलरेन, मनदीप सिंग आणि रायन हॅरिस यांना आऊट करत धमाल उडवून दिली होती. 2013 मध्ये भुवनेश्वर कुमार, राहुल शर्मा आणि अशोक दिंडा यांना आऊट करत मिश्राने अनोखा विक्रम नावावर केला.

दिल्लीच्या ताफ्यात रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, संदीप लमाचीने, ललित यादव हे फिरकीपटू आहेत. मात्र तरीही त्यांना मिश्राची उणीव भासणार आहे. दिल्लीने अद्याप तरी बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.

ऋषभ पंतच्या मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये तो खेळू शकला नाही. ऋषभच्या ऐवजी राखीव भारतीय कीपर नसल्याने दिल्लीला ऑस्ट्रेलियाच्या अलेकस् कॅरेला घ्यावं लागलं. अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू खेळू शकतात. या नियमामुळे शिमोरन हेटमायरला वगळावं लागलं. दिल्लीच्या बॅटिंगपैकी दोनजण संघाबाहेर गेल्याने खेळावर परिणाम झालेला पाहायला मिळाला.

दुखापतीमुळे पंत किमान आठवडाभर खेळू शकणार नसल्याचं दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं.

राजस्थानकडून दिल्लीकडे आलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेला संधी मिळाली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)