You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020: टेवाटिया-परागची कमाल; हैदराबादवर सनसनाटी विजय
राहुल टेवाटिया आणि रायन पराग या दोघांनी विजिगीषु वृत्ती दाखवत हैदराबादविरुद्ध राजस्थानला थरारक विजय मिळवून दिला.
संथ खेळपट्टीवर चिवटपणे बॅटिंग करत या दोघांनी राजस्थानला अविश्वसनीय विजय मिळवून देत पराभवाची मालिका थांबवली.
159 रन्सचा पाठलाग करताना राजस्थानची अवस्था 78/5 अशी झाली होती. मात्र रायन पराग-राहुल टेवाटिया जोडीने 7.5 ओव्हर्समध्ये 85 रन्सची भागीदारी करत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
परागने 26 बॉलमध्ये 52 रन्सची खेळी करताना 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. टेवाटियाने 28 बॉलमध्ये 45 रन्स करताना 4 चौकार आणि 2 षटकार खेचले.
वैयक्तिक कारणांमुळे न्यूझीलंडला असलेला बेन स्टोक्स युएईत आला. सहा दिवसांच्या क्वारंटीन प्रक्रियेनंतर लगेचच स्टोक्सला अंतिम अकरात खेळवण्यात आलं.
स्टोक्सला सलामीला पाठवण्याचा निर्णय अपयशी ठरला. स्टोक्स (5), जोस बटलर (16), स्टीव्हन स्मिथ (5), संजू सॅमसन (26), रॉबिन उथप्पा (18) असे मोठे खेळाडू तंबूत परतल्याने राजस्थानचा आणखी एक पराभव होणार अशी चिन्हं दिसू लागली. मात्र पराग-टेवाटिया जोडीने हार मानली नाही. रशीद खानच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टेवाटियाने जोरदार हल्ला चढवला. नटराजन आणि खलीलच्या बॉलिंगवर आक्रमण करत त्यांनी आव्हानात्मक लक्ष्य पेललं.
तत्पूर्वी अवघड अशा खेळपट्टीवर हैदराबादने 158 रन्सची मजल मारली. मनीष पांडेने 54 रन्सची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने 48 रन्स केल्या. केन विल्यमसनने 22 रन्स करत हैदराबादला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला.
राजस्थानने या मॅचसाठी तीन बदल केले. महिपाल लोमरुरच्या जागी रायन परागला खेळवण्याचा निर्णय त्याने सार्थ ठरवला. राजस्थानने या मॅचमध्ये स्टोक्स-बटलर जोडीला सलामीला पाठवलं. सात मॅचमध्ये त्यांची ही चौथी सलामीची जोडी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)