विशाखा काळे: कोरोना काळातल्या परिस्थितीला कंटाळून लोककलावंताने संपवलं आयुष्य #5मोठ्याबातम्या

विशाखा काळे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, विशाखा काळे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. पुणे : लोककलावंत विशाखा काळेनं 21 व्या वर्षीच संपवलं आयुष्य

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यात एकही कार्यक्रम होऊ शकला नाही. हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून लोककलावंत आणि नृत्यांगना विशाखा काळेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. विशाखाने राहत्या घरीच आत्महत्या केली. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

विशाखाला चित्रपटांमध्ये करिअर करायची इच्छा होती. पण तिचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला. त्यात तिच्या चेहऱ्याला जखम झाली आणि बरेच दिवस घरी बसावं लागलं.

विशाखाचे वडील अंध आहेत. आई एका शाळेत नोकरी करायची पण आता घर विशाखावरच अवलंबून होतं. वेगवेगळे स्टेज शो आणि लोककलांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन विशाखा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. पण कोरोनामुळे सगळी परिस्थिती पालटली. गेल्या 6 महिन्यात एकही कार्यक्रम होऊ शकलेला नाही. हाती असलेला पैसा संपत चालला आणि यामुळे कंटाळून विशाखाने टोकाचं पाऊल उचलल्याचं न्यूज 18 लोकमतच्या बातमीमध्ये आहे.

महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरवगाथा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून विशाखा काळे लावणी सादर करत होती.

गुप्तेश्वर पांडे

फोटो स्रोत, FACEBOOK/GUPTESHWAR PANDEY

2. बिहार निवडणूक : गुप्तेश्वर पांडेंना तिकीट नाहीच

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जेडीयूनं 115 जणांची उमेदवार यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

बिहार निवडणुकीच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून व्हीआरसी घेतल्यावर राजकारणात प्रवेश करण्याच्या अटकळी गुप्तेश्वर पांडे यांनी वारंवार फेटाळून लावल्या होत्या. पण जेडीयूमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. पण, जेडीयूच्या 115 उमेदवारांमध्ये पांडे यांचं नाव कुठेच नाही.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ठाकरे सरकार, आणि मुंबई पोलिसांवर कडाडून टीका करुन गुप्तेश्वर पांडे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. एकंदरितच त्यांना जेडीयूकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात होतं.

3. महाराष्ट्र मास्कच्या किमती कमी करणारं पहिलं राज्य

सामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. एन-95 मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण 19 ते 50 रुपयांपर्यंत उपलब्ध होईल, तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल बुधवारी राज्य शासनाला सादर केला.

समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

4.हाथरस : 'उत्तर प्रदेशात दंगे भडकावण्यासाठी 100 कोटी रुपयांची देवाणघेवाण'

उत्तर प्रदेशात हाथरसमधील कुटंबीयांना न्याय द्यायच्या नावाखाली जातीय दंगली भडकवण्यासाठी 100 कोटी रुपये हवालामार्फत आल्याचा पुरावा सापडल्याचं ईडीनं म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

महिला अत्याचार

फोटो स्रोत, iStock

यापैकी 50 कोटी रुपये मॉरिशसहून आल्याचंही ईडीनं म्हटलं आहे.

जस्टिस फॉर हाथरस या नावाच्या वेबसाईटवर ईडी नियंत्रण ठेवून आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून विदेशातून निधी गोळा केला जात आहे, यावरही ईडीचं लक्ष आहे. या वेबसाईटच्या अडमिनविरुद्ध Prevention of Money Laundering Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.

5. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे प्रमाण वाढणार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुढचे 7 दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

मुंबई पाऊस

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/AFP/Getty Images

परतीचा मान्सून 8 आक्टोबर रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता होती. मात्र हवामानातील बदलामुळे परतीचा मान्सून अद्यापही उत्तर भारतात असतानाच आता दुसरीकडे 9 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत 10 ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण वाढेल आणि ही स्थिती पुढचे 6 ते 7 दिवस राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)