निवेदिता सराफ कोव्हिडमधून बऱ्या झाल्यावरची पहिली मुलाखत

निवेदिता सराफ

फोटो स्रोत, ZeeMarathi

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अभिनेत्री निवेदिता सराफ कोव्हिडवर मात करून 'अग्गबाई सासूबाई' मालिकेच्या सेटवर परतल्या आहेत.

कोरोनाचा सामना त्यांनी कसा केल? बबड्याचं वागणं त्यांना पटतं का? निवेदिता आणि आसावरीमध्ये किती साम्य आहे? अशा अनेक प्रश्नांची त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलास उत्तरं दिली आहेत.

आपल्याला कोव्हिड झाल्याचं निदान झालं, तेव्हा कुठला विचार मनात येत होता? कशाची काळजी वाटत होती का?

मला सर्वांत आधी सांगावसं वाटतं की आपण आधी 'कोरोना' या नावानं घाबरून जातो. काही बाबतीत ते घाबरण्यासारखे असेलही पण घाबरून न जाता धीर ठेवला, सकारात्मकरित्या पाहिलं तर त्याच्यावर नक्कीच उपाय करू शकतो.

होम क्वारंटाईन वाटतं तितकं सोपं नाही. पहिल्यांदा मला कळलं तेव्हा मलाही पोटात धस्स झालं. पण आपल्याला आता त्याचा सामना करायला हवा. शूटिंगचे पण प्रॉब्लेम होणार होते. मला घरात माझे पती अशोक बद्दल खूप चिंता वाटत होती की त्यांना काही त्रास तर होणार नाही. पण नशीबानं त्यांची आणि माझ्या घरात काम करणाऱ्या सवितामावशी आणि सरू दोघींची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यांच्या जोरावरच मी सगळ करत असते. आमच्या युनिटमध्येही सगळ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

मला काय बुद्धी झाली आणि मी टेस्ट करायचं ठरवलं. मला बाकी काही लक्षणं नव्हती. फक्त सर्दी झाली होती थोडीशी, तापही आला नव्हता. मी असं म्हटलं असतं की नंतर करते टेस्ट तर मी कदाचित खूप जणांना संसर्ग दिला असता. आता मला कसा संसर्ग झाला हा प्रश्न आत राहू देत. माझ्या बाजूचे सगळे निगेटिव्ह आलेत तर मी पॉझिटिव्ह कशी आले कारण मी घर शूटिंगशिवाय कुठे जात नाही, आम्ही सेटवरतीही खूप काळजी घेतो, तरीही झाला संसर्ग.

कोरोनानं तुम्हाला काय शिकवलं आहे, या काळात तुम्ही काय केलंत?

चौदा दिवस एका खोलीत राहणं सोपं नाही. तुम्हाला ती खोली स्वतः साफ करावी लागते. दिवसातून दोनदा खोली धुवून पुसून घ्यायची, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, वाळत घालायचे, बाथरूम धुवायचं, स्वच्छता हा खूप मोठा भाग आहे. तुम्हाला सतत स्वतःच्या भवतालचा परिसर साफ ठेवावा लागतो.

मला फक्त टीव्ही, व्हीडियो पाहायचे नव्हते. माझ्याकडे खूप छान छान पुस्तकं होती तर मी पुस्तकं वाचली, संगीत ऐकलं. सकाळी सकाळी मुलाचा व्हीडियो कॉल असायचा. तो विचारायचा, मी येऊ का. त्याला म्हटलं, अरे तू आलास तर तुला आधी क्वारंटाईनमध्ये टाकतील, तोवर माझं संपलंही असेल. पण सतत सगळे माझ्याशी फोनवरून संपर्कात होते. आम्ही घरून शूटिंगही करत होतो त्यानीही मनाला उभारी मिळाली. एकटं राहणं कठीण आहे कारण मला माणसांची सवय आहे.

निवेदिता सराफ

फोटो स्रोत, ZeeMarathi

अशोकला मोठं श्रेय द्यायला हवं कारण तो सकारात्मक होता आणि माझ्या बाजूनं उभा होता. माझे मेहुणे डॉक्टर आहेत, काही सहकलाकार जे यातून बरे झाले आहेत, सुबोध आहे, त्यांच्याशी मी बोलायचे.

चौदा दिवसांनी टेस्ट निगेटिव्ह आली, तेव्हा ठरवलं की कामाला सुरूवात करायची. पहिले मी स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाक केला.

हे म्हणजे प्रत्यक्ष जगण्यातही तुमच्यामध्ये थोडीशी आसावरी आहे का? दोघींमध्ये काय साम्य आणि काय वेगळं आहे?

आसावरीला स्वयंपाक करायला आवडतो तशी मलाही आवड आहे. म्हणजे लोकांना जेऊ-खाऊ घालायला खूप आवडतं मला. त्याच्यात मला आनंद मिळतो. मी अपसेट झाले की बेकिंग करते. इतकं मला हे आवडतं.

दुसरं म्हणजे आसावरीसाठी कुटुंब सर्वस्व आहे. तसं आयुष्यभर मीही करिअर किंवा इतर कशापेक्षा सर्वप्रथम घराला प्राधान्य दिलं ही दोन साम्यस्थळं आहेत पण बाकी मी आसावरीपेक्षा खूप वेगळी आहे.

एक तक्रार मात्र आसावरीची सगळे करतात की ती बबड्यावर खूप प्रेम करते आणि अनेकांना बबड्याचा राग येतो. मग निवेदितांना त्यांच्यावर बबड्याचा राग येतो का?

हो निश्चितच. खूपच येतो, थोडाथोडा नाही भरपूर राग येतो आणि आसावरीनं असं करू नये असं वाटतं.

पण तीच गंमत आहे. आपण एखादी व्यक्तीरेखा जेव्हा साकारतो ना, तेव्हा कधीकधी ती व्यक्तीरेखा मनाला पटत नसते. पण जे समोर लिहून आलेलं आहे, ते स्वतःला पटवून देऊन मग प्रेक्षकांना पटवून द्यायचं असतं. हे कलाकार म्हणून एक खूप मोठं आव्हान असतं.

आसावरीचं बबड्याविषयीचं वागणं मला निवेदिता म्हणून अजिबात पटत नाही. तिने असं करायला नको असं खूप प्रकर्षानं वाटतं. पण ती व्यक्तीरेखा तशी आहे की तिचं मुलावर आंधळं प्रेम आहे.

दुसरं म्हणजे कधीकधी अशा व्यक्ती आपल्या आसपासही असतात. दुसऱ्याला हे सांगणं सोपं असतं, की तुम्ही तुमच्या मुलांशी कसं वागलं पाहिजे. किंवा या प्रसंगात ना, या बाईनं असं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. दुसऱ्याला सल्ला देणं यासारखी सोपी गोष्ट जगात दुसरी कुठलीच गोष्ट नाही.

पण जेव्हा ते तुमच्या आयुष्यात घडतं, एखाद्या घरातला मुलगा चुकीच्या वळणाला लागतो. आईवडील आपल्या मुलांवर वाईट संस्कार करत नसतात, पण कधी कधी संगतीनं मुलं बिघडतात. घरी मात्र ते आपली चांगलीच बाजू दाखवतात. प्रत्येक आईवडील सुरुवातीला डिनायलमध्येच असतात- माझा मुलगा नाही तसा असं त्यांना वाटतं.

आसावरीचं डिनायल हा तिच्या व्यक्तीरेखेचा मोठा भाग आहे. तुमच्या घरात असं मूल असेल, तुमचं मुल जेव्हा कधी चुकतं, तुम्ही मार्ग दाखवायचा प्रयत्न करता, तरी ते ऐकत नाही तेव्हा हे म्हणणं सोपं आहे की तुम्ही त्याला टाकून द्या. पण तसं कितीजण करू शकतात हे मला माहीत नाही.

निवेदिता सराफ

फोटो स्रोत, ZeeMarathi

तुम्ही आसावरीची भूमिका निभावली तशी नीना गुप्ता यांनी बधाई हो मध्ये उतारवयात मातृत्व स्वीकारणाऱ्या आईची भूमिका केली होती. आसावरीही आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर एक नवी सुरुवात करते. अशा स्त्रियांना स्क्रीनवर आणि प्रत्यक्ष जगण्यात स्वीकारण्याइतका आपला समाज परिपक्व आहे का?

मला वाटतं हा बदल घडतो आहे. ही सीरियल झी मराठीचं खूप मोठं धाडस होतं. निलेश मयेकरांची ही कल्पना होती. एक आई आहे टिपिकल मिडल क्लास बाई आहे, कोणाची तरी सून आहे तिच्या आयुष्यात दुसरा चान्स येणं, तो तिनं घेणं आणि त्याकडे प्रेक्षकांनी सकारात्मक पाहणं हा समाजमानसातल्या बदललेल्या रुपाचीच प्रचीती आहे.

आपल्याकडे पुरुषांना सगळ्या बाबतीत सूट मिळते. एखाद्या पुरुषाची बायको तो तरुण असताना गेली तर त्याला दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात मुली सांगून येतील. पण तेच एका स्त्रीच्या बाबतीत झालं तर ती कसं असं करू शकते असं ठरवलं जातं. या सगळ्या गोष्टींना छेद देणारी ही मालिका आहे.

आणि बघा ना, आयुष्याच्या वाटेवर तेव्हाच साथीची, संगतीची गरज असते जेव्हा मुलं त्यांच्या त्यांच्या व्यापात बिझी होऊन जातात. अशा वेळी तुम्ही एकटं असणं, तुम्हाला कोणाचा तरी आधार असणं कुणाशी तरी मनातलं शेअर करणं याची सर्वांत जास्त गरज असते. तरुणपणी नाही ती वाटत तेवढी, कारण तेव्हा आपण तरूण असतो, त्या वेगात धावत असतो. पण त्या वयात आधाराची गरज असते.

निवेदिता सराफ

फोटो स्रोत, ZeeMarathi

तुम्ही आता न्यू नॉर्मल लाईफ सुरू केलं आहे, पण जे सध्या कोव्हिडचा सामना कर आहेत, त्यांना काय सल्ला द्याल?

सर्वांत आधी म्हणजे घाबरून जाऊ नका. मी जर माझ्या या वयात बरी होऊ शकते, तर तुम्हीही बरे होऊ शकता. मनाची उभारी ठेवणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. मला ताप नव्हता, पण बीएमसीनं सांगितल्याप्रमाणे मी व्यवस्थित दिवसातून तीनदा थर्मामीटरनं ताप मोजायचे, ऑक्सिजन आणि पल्सची नोंद करायचे. एक तक्ता दिला होता त्यात ते लिहून ठेवायचे. म्हणजे काही होत नाही तर जाऊ दे असं करू नका. ज्या सूचना तुम्हाला डॉक्टर्सनी दिल्या असतील त्या पाळा.

तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. मी पॉवर योगा करते, तर डॉक्टरना विचारलं की ते मी करू शकते का. त्यांनी परवानगी दिल्यावरच व्यायाम करा. आपल्या मनाला प्रसन्न ठेवणंही गरजेचं आहे. नशीबानं मला स्वयंपाक करून देणारं कोणीतरी होतं. माझ्यामुळे कुणाला त्रास होणार नाही ना असं अपराधी वाटतं, पण नीट काळजी घेतली तर त्रास होणार नाही.

प्रत्येक पेशंटचा अनुभव वेगळा आहे. या आजाराला एका पॅरामीटरमध्ये बसवता येत नाही. त्यामुळे तुमच्या डॉक्टरना विचारून त्यांच्या सूचना पाळल्या पाहिजेत. आणि रुग्णाच्या बाजूनं बाकीच्या कुटुंबियांनी उभं राहायला हवं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)